भाजपमध्ये 'या' जिल्ह्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्‍यता...हालचाली गतिमान.. 

bjp flags 1.jpg
bjp flags 1.jpg

नाशिक : महापालिकेत बहुमताने सत्तेत आलेल्या भाजपचा कार्यकाळ पूर्ण होत असताना नाराज नगरसेवकांची संख्या वाढली असून, यातून पक्षाशी थेट बंडखोरी करून नगरसेवकपद धोक्‍यात घालण्यापेक्षा महापालिकेत "ब' गट स्थापन करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. त्यातूनच नगरसेवक आता थेट उघड भूमिका घेत असल्याचे बोलले जात आहे. महापालिकेत भाजपचा "ब' गट स्थापन झाल्यास दोन वर्षांत सत्तेच्या अनेक पदांपासून मुकले जाण्याची शक्‍यता आहे. 

नाराज नगरसेवकांकडून थेट भूमिका;

2014 मध्ये भाजपच्या विजयाचा वारू जोरदार उधळल्यानंतर इतर पक्षांतील अनेक नाराजांनी भाजपची वाट धरली. 2017 मधील महापालिकेची निवडणूक जवळ येत असताना इतर पक्षातील निम्म्याहून अधिक नगरसेवकांनी भाजपचे कमळ हाती घेतले. काही स्वतःहून, तर अनेकांना पक्षप्रवेशासाठी रेड कार्पेट टाकण्यात आले. त्यातून महापालिकेत ज्यांनी नगरसेवक होण्याची स्वप्ने पाहिली नसतील अशांना या पदावर काम करण्याची संधी मिळाली. विधानसभा, विधान परिषद व महापालिकेच्या सत्तेतील पदांच्या निवडणुकांमधून अन्याय होत असल्याची व प्रामाणिक काम करणाऱ्यांना संधी मिळत नसल्याची भावना दृढ झाली. पदे सोडाच केंद्र, राज्यात व महापालिकेत सत्ता असूनही प्रभागामध्ये विकासकामे करता न आल्याची खंत महासभेतही अनेकांनी बोलून दाखविली. या सर्वांचा एकत्रित परिणाम आता दिसू लागला आहे. त्यातून नाराजांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत मोट बांधून "ब' गट स्थापन करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. आगामी काळात भाजपमध्ये मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्‍यता निर्माण झाल्याने पदाधिकाऱ्यांच्या पायाखालची वाळू घसरताना दिसत आहे. 

श्रेष्ठींना नाही वेळ.. मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्‍यता  
पदे मिळत नाहीच, परंतु म्हणणे ऐकून मांडायचे असेल तर स्थानिक पातळीवर नेतृत्व नाही. एक तर मुंबई किंवा जळगाव गाठावे लागते. तेथेही पदाधिकारी भेटत नसल्याने म्हणणे मांडायचे कोणाकडे, असे ब गट स्थापन करणारे नगरसेवक व पदाधिकारी व्यक्त करत असून, त्यातून "ब' गट स्थापनेचा विचार प्रबळ झाला आहे. भविष्यातील राजकीय परिणामांचा विचार न करता येत्या चार-पाच दिवसांत "ब' गटाला मूर्त स्वरूप मिळण्याची शक्‍यता आहे. 

शिवसेनेतही सुंदोपसुंदी 
सत्ताधारी भाजपमध्ये नाराजांचा मोठा गट तयार झाला असून, शिवसेनेतही वातावरण आलबेल आहे असे नाही. विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते व गटनेते विलास शिंदे यांच्या विरोधातही शिवसेनेत मोठी नाराजी निर्माण झाली आहे. काही दिवसांत बोरस्ते यांच्या विरोधात नगरसेवक, पदाधिकारी उघड भूमिका घेत आहेत. सुधाकर बडगुजर यांच्या नेतृत्वाखाली सेनेतील नाराजांची टीम तयार होत असताना बडगुजर यांना शांत करण्यासाठी स्थायी समिती सदस्यत्व दिल्याचे बोलले जात आहे. सत्यभामा गाडेकर यांच्या नेतृत्वाखाली महिला नगरसेवकांनी बंड करू नये म्हणून त्यांना सदस्यत्व बहाल करण्यात आल्याचे बोलले जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com