नाशिकमध्ये प्रथमच ‘ब्लॅक राइस’ उत्पादनाचा प्रयोग; ११ एकरांत ३०० क्विंटलचे उत्पादन

महेंद्र महाजन
Monday, 23 November 2020

फायबर, मिनरल्स (आयर्न व कॉपर) आणि उत्कृष्ट गुणवत्तेचे वनस्पतीयुक्त प्रोटिन ‘ब्लॅक राइस’मधून मिळते. तांदळाच्या आवरणात सर्वाधिक गुणधर्मामुळे कर्करोगासह विविध आजारांसाठी हा तांदूळ गुणकारी मानला जातो.

नाशिक : देशात उत्तर-पूर्व राज्यांतील अनेक गुणधर्माच्या ‘ब्लॅक राइस’ उत्पादनाचा प्रयोग ब्रह्मा व्हॅली शिक्षण संकुलाचे प्रमुख राजाराम पानगव्हाणे यांनी त्र्यंबकेश्‍वला ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी यशस्वी केला आहे. त्यांनी ११ एकरांत ३०० क्विंटलचे उत्पादन घेतले. आंध्र प्रदेशातील बापटला कृषी विद्यापीठातून दोन लाखांची बियाणे आणून त्यांनी हा प्रयोग केला. 

पोषक मूल्याचा ‘ब्लॅक राइस’ खाण्याचा सल्ला

बापटला कृषी विद्यापीठात शिक्षण झालेले वरिष्ठ अधिकारी डॉ. मुरली यांनी श्री. पानगव्हाणे यांना ‘ब्लॅक राइस’च्या उत्पादनाचा सल्ला दिल्यानंतर जूनमध्ये २०० किलो बियाणे आणून हा प्रयोग राबविला. पूर्वी चीनमधील राजघराण्यांसाठी उत्पादित होणारा ‘ब्लॅक राइस’ भारतीय मॉलमध्ये विक्रीसाठी येतो. फायबर, मिनरल्स (आयर्न व कॉपर) आणि उत्कृष्ट गुणवत्तेचे वनस्पतीयुक्त प्रोटिन ‘ब्लॅक राइस’मधून मिळते. तांदळाच्या आवरणात सर्वाधिक गुणधर्मामुळे कर्करोगासह विविध आजारांसाठी हा तांदूळ गुणकारी मानला जातो. मधुमेही रुग्णांसाठी तांदूळ वर्ज्य मानला जात असला, तरीही डॉक्टर हृदयविकार प्रतिबंधात्मक पोषक मूल्याचा ‘ब्लॅक राइस’ खाण्याचा सल्ला देतात. वॉलमार्टसह इतर सुपर मार्केटमध्ये सेंद्रिय ‘ब्लॅक राइस’ला ३५० ते ४०० रुपये, तर विदेशात ८५० ते ९०० रुपये किलो, असा भाव या तांदळाला मिळतो. 

सेंद्रिय उत्पादन 

श्री. पानगव्हाणे यांनी ‘बीपीटी २८४१’ या ‘ब्लॅक राइस’ वाणाची लागवड केली. रासायनिक औषधे-खतांचा वापर टाळून एकराला दोन ट्रक शेणखत वापरले. एका ट्रकसाठी त्यांना आठ हजार रुपये खर्च आला. भात काढणीसाठी मोठे यंत्र वापरल्याने दहा टक्के नुकसान होत असल्याने कापणीसाठी तासाला ५०० रुपये भाड्याच्या स्वयंचलित यंत्राचा त्यांनी वापर केला. १३० ते १४० दिवसांत हा भात काढणीला येतो. 

हेही वाचा > ३० क्विंटल कांदा घेऊन तोतया व्यापारी फरारी; कधी थांबणार शेतकऱ्याची फसवणूक?

‘ब्लॅक राइस’ पिकावर परागीकरणाचा परिणाम होऊ नये म्हणून बापटला कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी मान्यता दिल्यानुसार ब्रह्मगिरी पर्वतरांगांच्या पायथ्याला उत्पादनासाठी शेतीची निवड केली. ‘ब्लॅक राइस’च्या माध्यमातून आदिवासी शेतकऱ्यांना आर्थिक फायदा व्हावा म्हणून दिंडोरी, त्र्यंबकेश्‍वर, इगतपुरी, पालघर, डहाणू येथील शेतकऱ्यांसमवेत करार पद्धतीने शेती करणार आहे. त्यासाठी ब्रह्मा सीडसची स्थापना केली आहे. - राजाराम पानगव्हाणे (ब्रह्मा व्हॅली शिक्षण संकुलाचे प्रमुख) 

हेही वाचा > लिफ्ट देण्याच्या बहाण्याने करायचे लूटमार; मुंबईतील संशयिताच्या नाशिक पोलिसांनी आवळल्या मुसक्या

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Black rice production experiment for first time in Nashik marathi news