घटस्थापनेच्या दिवशीच अख्ख्या गावाला शोक! देवीच्या दर्शनाची इच्छाही अपूर्ण; एकुलता एक 'समाधान'ही हिरावला

संतोष विंचू
Monday, 19 October 2020

एकुलत्या एक मुलासोबत गोरख सोनवणे हे मुखेडला आले होते. नवरात्रीचा पहिला दिवस म्हणून अख्ख्या गावात उत्साहाचे वातावरण होते. पण एक अशी दुर्दैवी घटना घडली. ज्यामुळे ऐन घटस्थापनेच्या दिवशीच संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले. या घटनेने उत्सवावर विरजन पडले असून गावात अचानक शोककळा पसरली आहे. 

मुखेड (जि.नाशिक) : एकुलत्या एक मुलासोबत गोरख सोनवणे हे मुखेडला आले होते. नवरात्रीचा पहिला दिवस म्हणून अख्ख्या गावात उत्साहाचे वातावरण होते. पण एक अशी दुर्दैवी घटना घडली. ज्यामुळे ऐन घटस्थापनेच्या दिवशीच संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले. या घटनेने उत्सवावर विरजन पडले असून गावात अचानक शोककळा पसरली आहे. 

अशी आहे घटना

गोरख पुजाबा सोनवणे हे मुसळगाव एमआयडीसीत नोकरीला आहेत. मुखेड येथे त्यांची एक हेक्‍टर शेतजमीन आहे. पारंपारिक धार्मिक विधी करण्यासाठी ते व त्यांचा दहावीत शिकणारा मुलगा समाधान याचासह येथील भवानी मंदिरात घटस्थापना करण्यासाठी आले होते. मुखेड-महालखेडा रस्त्यावर  भवानी मातेचे मंदिर आहे. परिसरातील शेतकरी ग्रामस्थांकडून या मंदिरात घटस्थापना केली जाते. गोरख सोनवणे हे भवानीमातेच्या मंदिरात पूजेसाठी थांबले होते. सोबत आलेला त्यांचा मुलगा समाधान सोनवणे (वय 15) देवीच्या पूजेसाठी पाणी आणण्यासाठी मंदिरालगत असणाऱ्या अरुण पगार यांची शेतजमीन गट नंबर 940 मधील शेततळ्यावर गेला होता. सुमारे अर्धा पाऊण तासाचा विलंब होऊन ही समाधान येत नसल्यामुळे गोरख सोनवणे हे तळ्यावर गेले. तळ्याच्या काठावर समाधानची चप्पल दिसून आली. त्यावेळी पाणी भरून घेताना समाधान पाण्यात पडला असावा अशी शंका आली. यावर त्यांनी माजी उपसरपंच रत्नाकर आहेर यांच्याकडे संपर्क साधून मदतीची मागणी केल्यावर यांच्यासह ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेतली. 

हेही वाचा > दुर्देवी! मुसळधार पावसात घेतला झाडाचा आसरा; मात्र नियतीने केला घात

घटस्थापनेला गालबोट

पट्टीच्या पोहणाऱ्या नवनाथ भवर या युवकास तळ्यात उतरवण्यात आल्यानंतर त्यांनी समाधानचे पार्थिव बाहेर काढले. दुर्दैवाची बाब म्हणजे समाधान हा गोरख सोनवणे यांचा एकुलता एक मुलगा होता. याप्रसंगी माजी सरपंच अनंता आहेर, पोलीस पाटील सुरेश वाघ, अरुण आहेर, महेश अनर्थे, विनायक आहेर आदींसह ग्रामस्थांनी हजर राहून मदत कार्यात सहभाग घेतला. पोलीस हवालदार गंभीरे, हेंबाडे पोलीस कॉन्स्टेबल लकडे हे पुढील तपास करीत आहे. नवरात्रीच्या पवित्र पावन सोहळ्याच्या प्रारंभालाच अशी दुर्दैवी घटना घडल्यामुळे ग्रामस्थांमध्ये दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा > दारूची नशा भोवली : अगोदरच मद्यधुंद असूनही आणखी दारूची हौस; नशेत केले कांड, चौघे थेट तुरुंगात!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: boy drowned in navratri festival nashik marathi news