world cancer day : कर्करोगात 'या' कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020

कर्करोग म्हटले, की अजूनही काळजात धस्स होतं... आपण आता जगणारच नाही, असा समज होऊन बसतो. परंतु, आता प्रभावी उपचारपद्धतींमुळे कर्करोग निश्‍चित बरा होतो आणि आपण पूर्वीसारखेच आनंदी आयुष्य जगू शकतो, असा विश्‍वास कर्करोगाशी लढून बऱ्या झालेल्या रुग्णांनी व्यक्त केला. विशेषत: कर्करोगाशी लढताना कुटुंबाचा संपूर्ण पाठिंबा आणि हॉस्पिटलचे सहकार्य लाभल्यास लवकर बरे होता येते, अशीच भावना यानिमित्ताने अधोरेखित झाली. 

नाशिक : कर्करोग म्हटले, की अजूनही काळजात धस्स होतं... आपण आता जगणारच नाही, असा समज होऊन बसतो. परंतु, आता प्रभावी उपचारपद्धतींमुळे कर्करोग निश्‍चित बरा होतो आणि आपण पूर्वीसारखेच आनंदी आयुष्य जगू शकतो, असा विश्‍वास कर्करोगाशी लढून बऱ्या झालेल्या रुग्णांनी व्यक्त केला. विशेषत: कर्करोगाशी लढताना कुटुंबाचा संपूर्ण पाठिंबा आणि हॉस्पिटलचे सहकार्य लाभल्यास लवकर बरे होता येते, अशीच भावना यानिमित्ताने अधोरेखित झाली. 

स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक 

पुरुषांपेक्षा स्त्रियांभोवती कर्करोगाचा विळखा वाढत असून, बदललेल्या जीवनशैलीमुळे स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक आहे. अनेकांना चाळिशीपूर्वीच याचे निदान होत असल्याचे चित्र आहे. कर्करोगग्रस्त रुग्णांमध्ये 50 टक्के स्त्रिया असून, त्यातही सर्वाधिक महिला स्तनाच्या कर्करोगाने त्रस्त आहेत. दर तेराव्या मिनिटाला स्तनाच्या कर्करोगाने एका महिलेचा मृत्यू होतो. काही वर्षांपूर्वी महिलांमध्ये गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोकादेखील मोठ्या प्रमाणात होता. मात्र, स्वच्छता, सॅनिटरी नॅपकिनचा वापर, हायजिन, लसीकरण यांसारखे अनेक पर्याय उपलब्ध झाल्याने आता गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका कमी झाला आहे. चुकीची आणि तणावपूर्ण जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, व्यसनाधिनता, झोपेतील अनियमितता, कमी वयात मासिक पाळी सुरू होणे, रजोनिवृत्तीतील विलंब, तिशीनंतरची गर्भधारणा आदींमुळे स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका अधिक संभवतो. सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे स्तन वाचवून या कर्करोगावर उपचार करणे शक्‍य झाले आहे. 

स्तनाच्या कर्करोगाची कारणे

- जास्त वजन असणे 
- आयुष्यात गर्भवती न राहिलेल्या, तसेच पस्तीशीनंतर गर्भवती होणे 
- स्तनपान करण्यास असमर्थ असणे किंवा अल्पकाळ स्तनपान करणे 
- सातत्याने मद्यपान करणे 
- मासिक पाळीच्या वेळी होणारा त्रास टाळण्यासाठी इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन संप्रेरकांचा समावेश असलेला औषधोपचार घेणे 

स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे

- स्तनांच्या आकारात बदल होणे 
- स्तनांमध्ये गाठ झाल्याचे जाणवणे 
- स्तनांच्या त्वचेच्या रंगात बदल होणे 
- स्तनाग्रांतून स्त्राव बाहेर पडणे 

60 टक्के महिला रुग्ण स्तनाच्या आणि गर्भाशयाच्या कर्करोगाने त्रस्त 

रोज जवळपास 20 ते 25 कर्करोगाचे रुग्ण दाखल होत असतात. यामध्ये 10 ते 15 महिला रुग्ण असतात. यामध्ये जवळपास 60 टक्के महिला रुग्ण स्तनाच्या आणि गर्भाशयाच्या कर्करोगाने त्रस्त आहेत. उशिरा लक्षात आल्याने अनेकींचा कर्करोग तिसऱ्या किंवा चौथ्या स्टेजला जाऊन पोचलेला असतो. -डॉ. राज नगरकर, ऑन्कोलॉजिस्ट  

हेही वाचा >  PHOTO : ह्रदयद्रावक! "आई मला भुक लागलीय" अडीज महिन्याचा तान्हुला शोधतोय आईला.. कारण...

मालेगावमध्ये करणार जनजागृती 

कर्करोगाचे निदान झाले, त्या दिवशी मोठा धक्का बसला. पती, बहीण, मुले सर्व रडत होते. पण, मीच म्हटले, "काय होतं, कॅन्सरच असेल ना?, मी लढेन त्याच्याशी.' मलाही खूप रडू येत होतं; पण मी आवंढा गिळला अन्‌ त्रास सहन करत सर्वांना दिलासा दिला. स्तनाचा कर्करोग असल्याने काहीतरी बरेवाईट होणार, असे अनेक विचार येत होते. पतीच्या ओळखीतील एकाने नामको कॅन्सर हॉस्पिटलबद्दल सांगितले. जेवण जात नव्हते, पाण्याला चव लागत नव्हती. दिवसभर केस गळायचे. पण, डॉक्‍टरांनी धीर दिला. हळूहळू थोडे-थोडे जेवण सुरू केले. अनेक रात्री जागून काढल्या. पती, मुले यांनीही खूप त्रास सोसला. आता मी पूर्णत: बरी झाली आहे. स्तनाचा कर्करोग होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी, याबाबत लवकरच मालेगावमध्ये शिबिर घेऊन जनजागृती करणार आहे. -स्मिता साखला, मालेगाव 

हेही वाचा > "जागा तुझ्या बापाची आहे का?".. जागा तर माझीच...अन् बघता - बघता त्याने

सर्वांनीच दिला आत्मविश्‍वास 

ऑगस्ट 2017 मध्ये स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाले आणि धक्काच बसला. कारण मुले लहान आणि घरातील जबाबदारी सांभाळायची. त्यामुळे मोठे संकटच उभे राहिले. पुढे किमो आणि रेडिएशन घेतले. त्या वेळी मात्र खूप त्रास सहन करावा लागतो. पण, आता त्यावरही औषधोपचार उपलब्ध आहेत. मळमळणे, अशक्तपणा, जेवण न जाणे असे अनेक त्रास जाणवू लागतात. उपचार सुरू असताना त्रास तर झाला; पण हॉस्पिटलमधील वातावरण, त्यांचा प्रत्येक गोष्टीसाठी असणारा सकारात्मक प्रतिसाद यामुळे लवकर बरे होण्यास मदत झाली. पती, मुलगा, मुलगी, नणंद, मोठ्या जाऊबाई यांनी मला खूप समजून घेतले आणि मला आजार आहे हे जाणवूच दिले नाही. -राखी गोठी, नाशिक 

हेही वाचा > माझ्या मुलानेच मारले हो साहेब 'ती'ला!...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cancer is definitely cured nashik marathi news