"ऑक्सिजनअभावी रुग्णांची हेळसांड नको"; पालकमंत्री छगन भुजबळ यांचे निर्देश

विनोद बेदरकर
Friday, 18 September 2020

पुरेसे मनुष्यबळ, वैद्यकीय अधिकारी, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, बेड उपलब्ध असूनही नागरिकांना सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारींचे वेळोवेळी मूल्यमापन व्हावे. ऑक्सिजनच्या तुटवड्याबाबत वारंवार चर्चा होते. त्याविषयी नियमितपणे लोकांना माहिती दिली नाही, तर भीतीचे वातावरण कायम राहील.

नाशिक : जिल्ह्यात प्रत्येक रुग्णाला पुरेसा ऑक्सिजन मिळेल, याचे नियोजन करावे. कुठल्याही रुग्णांची ऑक्सिजनअभावी गैरसोय होणार नाही. तसेच कोरोनाग्रस्तांना दुप्पट ऑक्सिजन लागेल, अशा पद्धतीने नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले. 

ऑक्सिजनअभावी रुग्णांची हेळसांड नको 

ते म्हणाले, की पुरेसे मनुष्यबळ, वैद्यकीय अधिकारी, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, बेड उपलब्ध असूनही नागरिकांना सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारींचे वेळोवेळी मूल्यमापन व्हावे. ऑक्सिजनच्या तुटवड्याबाबत वारंवार चर्चा होते. त्याविषयी नियमितपणे लोकांना माहिती दिली नाही, तर भीतीचे वातावरण कायम राहील. सध्या जिल्ह्यात एक हजार रुग्णांसाठी २४ ते २५ टन ऑक्सिजनची गरज आहे, तर ४३ टन ऑक्सिजन उपलब्ध आहे. ऑक्सिजनचा पुरवठा वैद्यकीय कारणासाठीच झाला, तर सध्याचा साठा पुरेसा उपलब्ध आहे. त्यामुळे वैद्यकीय कारणासाठीच ऑक्सिजनचा पुरवठा होईल. याचे प्रशासनाने व्यवस्थापन करावे.  ऑक्सिजन वाहतुकीसाठी अन्न व औषध प्रशासनमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी रोज दोन टॅंकर पुरवण्याचे आश्‍वासन दिल्याचे भुजबळ यांनी सांगितले. 

हेही वाचा > जिवलग मित्रांची 'ती' सहल शेवटचीच! कोरोना काळात पर्यटनस्थळ बंदी नावालाच; प्रशासनाची भूमिका संशयास्पद 

जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन सेंटर 
कोरोनाग्रस्तांना दुप्पट ऑक्सिजन लागेल. या अंदाजाने भविष्याचे नियोजन करावे. जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन सेंटरसाठी तत्काळ ई-निविदा काढून काम सुरू करावे. कुठल्याही रुग्णाला ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही, याची दक्षता घ्यावी. ऑक्सिजन बेड व व्हेंटिलेटरची संख्या वाढविण्याचे नियोजन करावे. अनलॉक काळात नागरिकांनी मास्क व सोशल डिस्टन्सिंगचा वापर करावा. जिल्ह्यात ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ या मोहिमेसाठी प्रत्येक विभागाने पुढाकार घ्यावा. महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळवून द्यावा आदी सूचना केल्या. 

हेही वाचा > धक्कादायक! जिल्हा रुग्णालयात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; कुटुंबियांचा आक्रोश 

मोबाईल टॉवर जोडणी 

पालकमंत्र्यांनी जिल्हा शिक्षण समन्वय समितीची बैठक घेतली. त्यात ऑनलाइन शिक्षणासाठी ग्रामीण-आदिवासी भागात नेटवर्कची समस्या असल्याने मोबाईल टॉवरच्या जोडणीला प्राधान्य देण्याचे निर्देश दिले. खासगी शाळेतील ज्ञानदानाचा आढावा घ्यावा. आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांच्या जागेवर नव्याने आलेल्या शिक्षकांनाही तत्काळ रुजू करुन घेण्याच्या सूचना दिल्या. तर मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी जिल्हा परिषदेला ३२७ अतिरिक्त वर्गखोल्यांची मागणी असून एक हजार ७६५ वर्गखोल्यांची १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून 
दुरुस्तीचे नियोजन असल्याचे सांगितले.  

नियोजन भवनात कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस आयुक्त दीपक पांडे, महापालिका आयुक्त कैलास जाधव, प्रभारी जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड आदी उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: care for oxygen deficient patients said chhagan bhujbal nashik marathi news