
नाशिक : शहराचे सौंदर्य तेथील वास्तूंवर अवलंबून असते. एखादी इमारत उभी करण्यात अभियंत्यांप्रमाणेच आर्किटेक्टची भूमिकाही महत्त्वाची असते. अत्यंत कौशल्यपूर्ण अशा आर्किटेक्चर शाखेतील शिक्षणातून चांगले करिअर घडविता येऊ शकते. तर डिझायनिंग क्षेत्रात इंटिरिअर डिझायनिंग, प्रोडक्ट डिझाइनसह सेट डिझाइन अशा तीन शाखांमध्ये करिअरचा मार्ग खुला आहे. आपल्यातील कल्पकता आणि मेहनत घेण्याच्या तयारीतून उज्ज्वल करिअर होऊ शकते.
आर्किटेक्चर शाखेतील पदवी अभ्यासक्रम बॅचलर ऑफ आर्किटेक्चर (बी. आर्क.) कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर अंतर्गत व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न आहे. पाच वर्षे कालावधीच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी बारावी विज्ञान शाखेतून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित (पीसीएम) ग्रुपसह बारावीत पन्नास टक्के गुण असणे आवश्यक आहे. यंदा कोरोनाच्या परिस्थितीमुळे किमान टक्केवारीच्या अटीत शिथिलता आणली आहे. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नॅशनल ॲप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर (नाटा) यांच्या प्रवेश परीक्षेद्वारे व जेईई मेन्स परीक्षेच्या माध्यमातून प्रवेशाची संधी उपलब्ध आहे. पदवी शिक्षणानंतर नोकरी, स्वतःचा व्यवसाय करण्याच्या संधी उपलब्ध असून, इच्छुक विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवीचे शिक्षण वेगवेगळ्या विषयांतून घेता येऊ शकते. आर्किटेक्चरची भूमिका अत्यंत महत्त्वाची व जबाबदारीपूर्ण असते. त्यामुळे अहोरात्र मेहनत घेण्याची तयारी व स्वतःमध्ये तितक्या क्षमता विकसित करणे महत्त्वाचे असते. दरम्यान, अन्य काही विद्यापीठांतूनदेखील हा शिक्षणक्रम उपलब्ध आहे.
डिझाइन क्षेत्रात पदवीची संधी
आर्किटेक्चरप्रमाणेच डिझाइन क्षेत्रातही बी. डिझाइन हा चार वर्षे कालावधीचा पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहे. कुठल्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण विद्यार्थी प्रवेशास पात्र असून, महाविद्यालय स्तरावर होणारी सीईटी परीक्षा प्रवेशासाठी महत्त्वपूर्ण ठरते. डिझाइन अभ्यासक्रमात इंटिरिअर डिझायनिंग, प्रोजेक्ट डिझाइन, सेट डिझाइन अशा तीन शाखांपैकी कुठल्याही शाखेतून पदवी शिक्षण घेता येते. प्रोडक्ट डिझाइन झालेल्या विद्यार्थ्यांना कुठल्याही स्वरूपाच्या उत्पादनाच्या डिझायनिंगच्या स्तरावर काम करण्याची संधी असते. तर, सेट डिझाइन शाखेतील विद्यार्थ्यांना भव्य लग्नसोहळ्यांपासून मालिका, चित्रपटचे सेट डिझाइनच्या क्षेत्रात करिअरची संधी उपलब्ध आहे.
चित्रकला चांगली असलेल्या विद्यार्थ्यांना आर्किटेक्चर किंवा डिझाइन क्षेत्रात करिअर करता येऊ शकते, हा गैरसमज आहे. विद्यार्थ्याची कल्पकता व त्यास मूर्तरूप देण्यासाठी मेहनत घेण्याच्या तयारीवर यश अवलंबून असते. आर्किटेक्चरप्रमाणे डिझाइन क्षेत्रातही चांगल्या करिअरच्या संधी असून, दोन्ही क्षेत्रांत कौशल्य विकासासोबत आवांतर वाचनातून ज्ञान आत्मसात करणे आवश्यक ठरते.
-भालचंद्र चावरे, प्राचार्य, एमईटी स्कूल ऑफ आर्किटेक्चर ॲन्ड इंटिरिअर डिझाइन.
संपादन - रोहित कणसे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.