शिरसगाव प्राथमिक आरोग्य केंद्र प्रकरण : आरोग्य विभागाला कारणे दाखवा नोटीस 

कुणाल संत
Thursday, 28 January 2021

शिरसगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिरात केंद्रात केवळ दहा खाटांची व्यवस्था असतानाही एकाच दिवसात ४२ महिलांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यानंतर केंद्रात कुठलाही प्रकारची व्यवस्था करण्यात आली नाही.

नाशिक : शिरसगाव (ता. त्र्यंबकेश्‍वर) प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियानंतर रुग्णांची गैरसाेय झाल्याच्या प्रकरणात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांसह सर्वांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. 

चौकशी करून कारवाई करण्याची मागणी
शिरसगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिरात केंद्रात केवळ दहा खाटांची व्यवस्था असतानाही एकाच दिवसात ४२ महिलांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यानंतर केंद्रात कुठलाही प्रकारची व्यवस्था करण्यात आली नाही. जिल्हा परिषद सदस्य रूपांजली माळेकर यांनी हे प्रकरण उघडकीस आणत या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर बनसोड यांनी अतिरिक्त जिल्हा आरोग्याधिकारी यांना या प्रकरणाची चौकशी करत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. 

हेही वाचा > अखेर गूढ उकललेच! म्हणून केली रिक्षाचालकाने 'त्या' गर्भवती महिलेची हत्या

कारणे दाखवा नोटीस बजाविल्या
अतिरिक्त जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांनी २५ जानेवारीला अहवाल सादर केला. त्यात म्हटले आहे, की याठिकाणी स्वत:हून महिला शस्त्रक्रिया करण्यासाठी आल्या होत्या. शस्त्रक्रियानंतर महिलांना बेड देण्यात आले. परंतु, रुग्णांसमवेत आलेल्या नातेवाइकांची मोठी गर्दी होती. या अहवालावर श्रीमती बनसोड यांनी शस्त्रक्रियेनंतर आरोग्य विभागाने इतर सुविधा पुरविणे गरजेचे असल्याचे ठरवून तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांसह इतर सर्व संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजाविल्या आहेत. 

हेही वाचा > वाढदिवशीच दोघा मित्रांवर काळाची झडप; 'तो' प्रवास ठरला अखेरचाच 

व्यवस्थेत बदल करणार 
शिरसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला रुग्णांची झालेल्या गैरसोयीची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून नवीन नियमावली करणार असल्याचे श्रीमती बनसोड यांनी सांगितले. तीन वर्षांत आदिवासी क्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्रात झालेल्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचा आढावा घेतला असता ठराविक काळात याठिकाणी मोठ्या प्रमाणात शस्त्रक्रिया होत असल्याने याठिकाणी सर्जनची संख्या, इतर सर्व सुविधांमध्ये वाढ करत पूर्ण नियोजन करून शस्त्रक्रिया करण्यात येईल. त्यासाठी तालुका आरोग्याधिकाऱ्यांच्या जबाबदारीतही वाढ करणार असल्याचे श्रीमती बनसोड यांनी सांगितले.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: case of Shirasgaon Notice to Department of Health nashik marathi news