"नाशिकच्याच नव्हे तर राज्याच्या शिरपेचात हा मानाचा तुरा..." : पालकमंत्री छगन भुजबळ

अरुण मलाणी
Friday, 21 August 2020

दत्तू भोकनळला अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्‍याबद्दल त्‍याचे राज्‍य शासनातर्फे अभिनंदन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

 नाशिक :  क्रीडा क्षेत्राशी निगडीत विविध पुरस्‍कारांची घोषणा होताच नाशिक जिल्‍ह्‍यासह उत्तर महाराष्ट्रात आंनंद व्यक्त केला जात आहे. हालाखीच्‍या परीस्‍थितीतून पुढे येत दत्तूने आंतरराष्ट्रीय स्‍तरावर छाप सोडलेला खेळाडू दत्तू भोकनाळ यांना  प्रतिष्ठेचा असा अर्जुन पुरस्‍कार जाहीर झाला आहे. ऑलिंम्‍पिकपटू कविता राउत-तुंगारनंतर नाशिक, उत्तर महाराष्ट्रात अर्जुन पुरस्‍काराला गवसणी घालणारा दत्तू हा दुसरा खेळाडू ठरला आहे. सध्या तो लष्करात कार्यरत आहे. 

दत्तू भोकनळला अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्‍याबद्दल त्‍याचे राज्‍य शासनातर्फे अभिनंदन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. दत्तूचा अर्जुन पुरस्कारापर्यंतचा प्रवास अतिशय संघर्षमय असा आहे. मोलमजुरी करत शिक्षण घेतले. पुढे सैन्यात दाखल होऊन तिथे रोइंग शिकला. त्यानंतर ऑलिम्पिक असो, आशियाई क्रीडा स्पर्धा असो किंवा इतर स्पर्धांमध्ये देशाचे नाव उंचावले आहे. रिओ ऑलम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व, आशियाई स्पर्धेतील सांघिक प्रकारात सुवर्ण असा त्याचा हा आलेख उंचावणारा आहे. यातून नवखेळाडूंना नक्कीच यातून प्रेरणा मिळेल. नाशिकच्याच नव्हे तर राज्याच्या शिरपेचात हा मानाचा तुरा यानिमित्ताने रोवला गेला असल्‍याची प्रतिक्रीया श्री. भुजबळ यांनी दिली आहे. 

हेही वाचा > अचानक सायरनचा तो धडकी भरविणारा आवाज..नागरिकांत घबराट अन् सुटकेचा निश्वास! काय घडले नेमके?

रोईंग खेळातील माझ्या योगदानाची दखल घेत, केंद्र शासनाने अर्जुन पुरस्‍कारासाठी निवड केल्‍याने त्‍यांचे आभार मानतो. आजवर घेतलेल्‍या कष्टाचे चीज झाले. कमी पाण्याचे गाव म्‍हणून ओळख असलेल्‍या चांदवड तालुक्‍याचे प्रतिनिधीत्‍व करतांना, रोईंग खेळात चांगली कामगिरी करत असल्‍याचे मनस्‍वी समाधान आहे. यापुढेदेखील २०२१ मध्ये ऑलिंम्‍पिकमध्ये सहभागी होत देशाला पदक मिळवून देण्याचे स्‍वप्‍न आहे. त्‍याअनुषंगाने सराव कमी पडू दिलेला नाही. 
-दत्तू भोकनळ, ऑलिंम्‍पिकपटू. 

हेही वाचा > शिवप्रेमींत हळहळ; शिवप्रेमी रितेशची किल्ल्यावरील 'ती' सेल्फी शेवटची ठरली, काय घडले?

संपादन - रोहित कणसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chaagan bhujabal congratulate dattu bhokanal nashik marathi news