'या' धरणासाठी मिळणार अकराशे कोटी - मुख्यमंत्री 

सकाळ वृत्तसेवा 
Friday, 31 January 2020

मुख्यमंत्र्यांनी नगर जिल्ह्याच्या प्रश्‍नांसंबंधी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. निळवंडे धरणाच्या कालव्यांचे काम बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित आहे. राज्य सरकारने हे काम करण्यास प्राधान्य दिले असून, दोन वर्षांत प्रलंबित कामे पूर्ण होण्यातून 189 गावांतील 25 हजार हेक्‍टर क्षेत्राला सिंचनासाठी लाभ होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. 

नाशिक : नगर जिल्ह्यातील दीर्घकाळ प्रलंबित प्रश्‍नांची सोडवणूक केली जाईल. तसेच निळवंडे धरणाची कामे पूर्ण करण्यासाठी आवश्‍यक अकराशे कोटी रुपयांची तरतूद उपलब्ध करून देण्यात येईल. येत्या दोन वर्षांत ही कामे पूर्ण केली जातील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (ता. 30) येथे सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर जिल्हा आढावा बैठकीत ते बोलत होते. 

कालव्यांचे काम बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित

मुख्यमंत्र्यांनी नगर जिल्ह्याच्या प्रश्‍नांसंबंधी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. निळवंडे धरणाच्या कालव्यांचे काम बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित आहे. राज्य सरकारने हे काम करण्यास प्राधान्य दिले असून, दोन वर्षांत प्रलंबित कामे पूर्ण होण्यातून 189 गावांतील 25 हजार हेक्‍टर क्षेत्राला सिंचनासाठी लाभ होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. 

कृषिपंपांचे अर्ज निकाली काढले जाताहेत 
कृषिपंपांना वीजपुरवठा करण्यासाठीचे सप्टेंबर 2018 पर्यंतचे अर्ज निकाली काढण्यात येत आहेत. नवीन अर्जासाठी "पोर्टल' सुरू करण्यात आलेले आहे. त्यामुळे आगामी काळात कार्यवाही वेगाने होईल. शिवाय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नाशिक आणि नगर येथील उपकेंद्र सुरू करण्याची मागणी आहे. त्याचा निर्णय एका आठवड्यात घेऊन शासन निर्णय आठवडाभरात काढला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी विविध प्रश्‍न मांडले. 
 
शिर्डी विमानतळाचे अद्ययावतीकरण 
शिर्डी विमानतळ अद्ययावतीकरणाची मागणी आहे. इथल्या "नाइट लॅंडिंग' आणि इमारत विस्तारीकरणासंबंधी निर्णय लवकर घेतला जाईल. शिर्डीला येणाऱ्या भाविकांची सोय होण्यासाठी आवश्‍यक कार्यवाही केली जाईल, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, की श्रीरामपूर येथे 220 केव्ही उपकेंद्र सुरू करण्याची मागणी आहे. त्यासंबंधी सरकार निर्णय घेऊन निविदा काढणार आहे. श्रीरामपूर औद्योगिक वसाहतीमध्ये आवश्‍यक सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात येईल. कोपरगाव येथे न्यायालयाची इमारत 135 वर्षे जुनी आहे. इथे नवीन इमारतीचा प्रस्ताव मागवून घेऊन कार्यवाही केली जाईल. शिवाय प्रत्येक विभागात जाऊन जिल्हानिहाय प्रलंबित प्रश्‍नांसंबंधी लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांची बैठक घेऊन जे प्रश्‍न तत्काळ सोडविणे शक्‍य आहे, अशा प्रश्‍नांवर लगेच मार्ग काढला जात आहे. संवादानेच प्रश्‍न लवकर निकाली निघतील. 

गोदावरी खोऱ्यातील पाण्यासाठी बैठक 
पश्‍चिमवाहिनी नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्यासाठी राज्यस्तरावर पुन्हा आढावा बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल. त्यासाठीचा सविस्तर प्रकल्प अहवाल केंद्राकडे पाठविला जाईल. त्यास मंजुरी प्राप्त करून घेण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी नगर शहरविकासासाठी औद्योगिक वसाहत विस्तारीकरणाची गरज असून, परिसरात जमिनीची उपलब्धता पाहून विस्तारीकरण केले जाईल, असा शब्द दिला. 

हेही वाचा > 'ज्यांना' संकटग्रस्त अबला 'तो' समजत होता...त्या तर चक्क...विश्वास नांगरे पाटलांचा फंडा यशस्वी! 

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री दादा भुसे, मुख्य सचिव अजोय महेता, प्रधान सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील यांच्यासह आमदार राधाकृष्ण विखे-पाटील, डॉ. सुधीर तांबे, लहू कानडे, आशुतोष काळे, डॉ. किरण लहामटे, मोनिका राजळे आदी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी लोकप्रतिनिधींकडून त्यांच्या मतदारसंघातील आणि नगर जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्‍नांची माहिती घेतली.

हेही वाचा >  PHOTO : ह्रदयद्रावक! "आई मला भुक लागलीय" अडीज महिन्याचा तान्हुला शोधतोय आईला.. कारण...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chief minister Uddhav Thackarey on Nilwande Dam nashik marathi news