Success Story : गटशेतीतून पिकविलेली तिखट मिरची थेट 'यूके'त! कमाई दोन ते अडीच लाख, ४५ शेतकऱ्यांच्या प्रयोगाला यश 

yeola success chillies.jpg
yeola success chillies.jpg

येवला (जि.नाशिक) : नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब, एकत्रित प्रयत्न अन्‌ प्रयोगशीलतेच्या माध्यमातून शेतीत यशाचा मार्ग सापडू शकतो, हे 
तालुक्यातील रास्ते सुरेगाव, देवळाणे, देवठाण, पिंपळगाव जलाल, बोकटे परिसरातील शेतकऱ्यांनी गटशेतीच्या माध्यमातून एकत्र येत दाखवून दिले आहे. ४५ शेतकऱ्यांनी गटशेतीच्या माध्यमातून पिकविलेली मिरची थेट यूकेला पाठविली असून, यातून एकरी दोन ते अडीच लाखांपर्यंत उत्पन्न त्यांनी मिळविले आहे. 

रास्ते सुरेगाव परिसरातील ४५ शेतकऱ्यांच्या प्रयोगाला यश 
दुष्काळी असलेल्या या तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीत बांबूपासून ते आद्रक अन्‌ पेरलेल्या कांद्यापर्यंत अनेक प्रयोग केले आहेत. यातील काही प्रयोग अपयशी ठरले असले, तरी मोठ्या प्रमाणात येथील प्रयोगांना यश आले असून, गटशेतीचा हा प्रयोगही इतरांना प्रेरणादायी असाच आहे. तालुका कृषी विभागातील कृषी पर्यवेक्षक भाऊसाहेब पाटोळे, कृषी सहाय्यक मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र येऊन राज्य शासनाच्या ‘पिकेल ते विकेल’ या धोरणांतर्गत विश्‍वंभर ॲग्रो प्रोड्यूसर कंपनी स्थापन केली. त्याची गटशेतीच्या माध्यमातून सुमारे ८० एकर क्षेत्रावर मिरची लागवडीचा यशस्वी प्रयोग केला. त्यात शेतकऱ्यांना आतापर्यंत १९० टनांपेक्षा जास्त मिरचीचे उत्पादन मिळाले असून, ही उत्पादित मिरची सध्या एक्स्पोर्ट कंपनीच्या माध्यमातून विदेशात विक्री होत असल्याने शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळत आहे. मिरचीची लागवड ते विक्रीपर्यंतचे व्यवस्थापन सामूहिकपणे करून शेतकऱ्यांनी खर्चात बचत साधली आहे. त्यातून त्यांचे अर्थकारण सुधारले आहे. शेतीसारखा उद्योग एकत्रितपणे केल्यास किती फायदेशीर ठरतो याचे उत्तम उदाहरण या शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे. 

प्रयोग तालुक्यातच नव्हे, तर जिल्ह्यासाठीदेखील आदर्श
नाशिक येथील खूशी एक्स्पोर्टच्या माध्यमातून ही मिरची युकेच्या बाजारात पोहोचली आहे. देवळाने येथील सागर साळुंके, रास्ते सुरेगाव येथील राजू डमाळे, पिंपळगाव जलाल येथील श्रावण भोरकडे यांच्या पुढाकारातून हा प्रयोग उभा राहिला आहे. विशेष म्हणजे हा भाग टंचाईग्रस्त असताना शेततळे आणि ठिबक सिंचनाचा वापर करून हा प्रयोग या ४५ शेतकऱ्यांनी यशस्वी केला आहे. ऑगस्ट, सप्टेंबरच्या दरम्यान मल्चिंग पेपरचा वापर करून मिरचीची लागवड झाली आहे. साधारण एकरी एक ते दीड लाखापर्यंत खर्च आला असून, पिकविलेली सुमारे १९० टन मिरची यूकेच्या बाजारात भाव खात आहे. या कंपनीसोबत ३० रुपये किलो दराने विक्रीचा करार झाला असून, एकरी १५ टन मिरची निघत असल्याने खर्च वजा जाता दोन ते अडीच लाखांपर्यंत उत्पन्न शेतकऱ्यांना मिळाले आहे. गटशेतीतून निर्यातीचा हा प्रयोग तालुक्यातच नव्हे, तर जिल्ह्यासाठीदेखील आदर्श ठरला आहे. 

या ४५ शेतकऱ्यांनी प्रतिकूलतेवर मात करून १५ टनांपर्यंत उत्पादन घेतले आहे. गटशेतीचा हा प्रयोग इतर शेतकऱ्यांनादेखील प्रेरणादायी आहे. शेतकऱ्यांनी एकत्रित येत दुष्काळी भागातही पाण्याचे योग्य नियोजन करून गटशेतीच्या माध्यमातून शेती केली तर शेतकऱ्यांचे उत्पन्न नक्कीच वाढेल. -भाऊसाहेब पाटोळे, कृषी पर्यवेक्षक, अंदरसूल  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com