VIDEO : वीजनिर्मिती केंद्राच्या चिमण्या जमीनदोस्त; पन्नास वर्षांपासूनचे साक्षीदार हळहळले 

नीलेश छाजेड
Wednesday, 14 October 2020

येथील वीज केंद्रात एकूण पाच संच आहेत. त्यातील दोन संच कालबाह्य झाल्याने २०११ मध्ये हे दोन संच कायमचे बंद करण्यात आले होते. संच कायमचे बंद झाले, नऊ वर्षांनंतर यावर हातोडाही पडला

नाशिक/एकलहरे : देशात टॉप २५ मध्ये स्थान मिळविणाऱ्या नाशिक औष्णिक केंद्रातील टप्पा एकमधील रशियन बनावटीच्या दोन चिमण्या बुधवारी (ता. १४) जमीनदोस्त करण्यात आल्या. चाळीस वर्षांहून अधिक काळापासून अखंडित वीजनिर्मिती करणाऱ्या चिमण्या जमीनदोस्त होताना बघून जुन्या कर्मचारी अभियंत्यांना भावना अनावर झाल्या. 

 

संच १९६७-६८ पासून देशासाठी कार्यरत

येथील वीज केंद्रात एकूण पाच संच आहेत. त्यातील दोन संच कालबाह्य झाल्याने २०११ मध्ये हे दोन संच कायमचे बंद करण्यात आले होते. संच कायमचे बंद झाले, नऊ वर्षांनंतर यावर हातोडाही पडला; पण या संचाच्या जागी ज्या बदली संचास प्रशासकीय मान्यता देण्यात आली त्या ६६० मेगावॉटच्या प्रकल्पास मात्र चालना मिळालीच नाही. वीजनिर्मिती केंद्राचे संच पाडून त्याचे भंगार देण्यात जितकी घाई केली जाते प्रत्यक्षात नवे संच सुरू करण्याबाबत मात्र अजिबात घाई केली जात नाही. त्यामुळे आहे त्या यंत्रणांचे भंगार विकण्यातील घाई आणि नवे सुरू करण्यातील दिरंगाई, हा कायमच एकलहरेत चर्चेचा आणि टीकेचा विषय राहिला आहे. आज या संचांचे धुराडे (चिमणी) जमीनदोस्त केले असून, हे संच १४० मेगावॉट क्षमतेचा पहिला संच १९६७-६८ पासून देशासाठी कार्यरत होते. आज या चिमण्या जमीनदोस्त होताना पाहताना कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. 

हेही वाचा > एकुलती एक चिमुरडी झाली पोरकी! बाप अपराधी तर आई देवाघरी; सातपूरमधील दुर्दैवी घटना

मी १९९५ ते २००० स्टेज एक येथे कंत्राटी कामगार म्हणून काम केले. २००१ ला अप्रेंटीस केली. आज जेव्हा चिमणी पडली गेली, खूप वाईट वाटले. कारण एक भावनिक नातं तयार झाले होते. नाशिकसाठी भूषण असलेल्या वीजनिर्मिती केंद्रातील दोन चिमण्या आज भुईसपाट झाल्या. 
-प्रभाकर रेवगडे (तंत्रज्ञ २) 

हेही वाचा > धक्कादायक! आजोबांचे हातपाय बांधून नातूने फेकले नाल्यात; अंगावर काटा आणणारी करतूत 

२५ वर्षांपासून या वीज केंद्रात रोजंदारी कामगार म्हणून काम करीत आहे . जर या संचाच्या जागी नवीन बदली संचाचे काम झाले नाही, तर माझ्यासारखे हजारो कामगार देशोधडीला लागतील. सरकारने याचा विचार करावा. 
-भरत फणसे (कंत्राटी कामगार) 

 

संपादन - रोहित कणसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chimney of the power plant was demolished nashik marathi news