
नाशिक : (देवळाली कॅम्प) बिबट्याने नाशिक तालुक्यातील दारणेपूर्वेकडील टापूत आतापर्यंत तीन बळी घेतले आहेत. माणसाचे रक्त तोंडाला लागलेला हा नरभक्षक बिबट्या चिमुरड्यांचा काळ बनून फिरतो आहे. त्यामुळे आतापर्यंत "बिबट्या पकडा' म्हणणारे लोक "पकडा नव्हे माराच' म्हणू लागले आहेत. चिमुरड्यांच्या नरडीच्या घोटाला टपून बसणाऱ्या या नरभक्षक बिबट्याच्या दहशतीविरोधात आक्रोश मोठा आहे. गावोगावच्या नागरिकांच्या भावना...
हे कुठले पर्यावरणप्रेम?
दारणेच्या पूर्व भागातील सगळा टापू रोज रात्री मृत्यूच्या छायेखाली वावरतो. दारासमोरील चिमुरडे बिबट्या ओढून नेऊ लागला आहे. दोनवाडेत दाराच्या उंबऱ्यातून ज्येष्ठाला ओढून नेले. आता थेट घरात पोचलेल्या बिबट्याला मारायचे नाही का? घरात येऊन तो चिमुरडे ओढून नेणार? तरी त्याला मारायचे नाही हे कुठले पर्यावरणप्रेम. जर बिबट्याने हल्ला केलाच तर स्वसंरक्षणार्थ त्याला मारायला नको का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. सायंकाळ झाली घरातील बाळगोपाळ कोंडून ठेवण्याची वेळ आली आहे. जित्राबांच्या सुरक्षेसाठी "जागते रहो'चा पहारा द्यावा लागतो. दोनवाडे-भगूरपासून तर नाणेगाव शेवगेदारणा आणि थेट पळसेपर्यत नाशिक कारखान्याच्या दारणेच्या पूर्वेकडील टापू हे या नरभक्षक बिबट्याचे कार्यक्षेत्र आहे. त्यामुळे या टापूतील भावना तीव्र आहेत.
सोडू नकाच...
बिबट्या नरभक्षक झाला आहे. त्याला ठारच मारले पाहिजे. वन विभाग पकडलेला बिबट्या दुसरीकडे नेऊन सोडतो. एकदा पिंजऱ्यात अडकलेला बिबट्या दुसऱ्यांदा सहसा पिंजऱ्यात अडकत नाही. त्यामुळे पिंजरा लावण्याने समाधान वाटत असले तरी बिबट्या पकडला जातोच असे नाही. त्यामुळे बिबट्याला ठारच केले पाहिजे. - अशोकराव ठुबे, माजी सरपंच, दोनवाडे
कायमच फरपट
माणसांचे जीव घेणाऱ्या बिबट्याला वन विभागाने ठारच केले पाहिजे. कारण पकडून तो सोडला तर दुसरीकडे तो असेच हल्ले करून लेकराबाळांचे जीवच घेणार. बिबट्याच्या दहशतीत वन विभागाचे शेतकऱ्यांना काहीच सहकार्य नसते. पिंजऱ्यात सावज ठेवण्यासाठी वर्गणी काढावी लागते. त्यामुळे त्याला ठार केलेच पाहिजे. - ज्ञानेश्वर शिंदे, माजी सरपंच, नाणेगाव
दुःखाची कल्पना करून बघा...
नरभक्षक बिबट्याला जेरबंद करून वन विभाग दुसऱ्या भागात सोडतो. ज्या भागात सोडला तेथेही तो बिबट्या पुन्हा माणसांवरच हल्ले करीत राहील. लहान मुलांवर नजर ठेवून तो झडप घालतो. हेच तीनदा अनुभवास आले आहे. ज्यांच्या घरचे जीव गेले त्यांच्या दुःखांची कल्पना केली किंवा ज्या कुटुंबावर बितते तेव्हा बिबट्याच्या दहशतीचा अंदाज येतो त्यामुळे अशा नरभक्षक बिबट्याला आता ठारच केले पाहिजे. - संतोष जुंद्रे
नरभक्षक बिबटे पाळणार का?
बिबट्याचा उच्छाद इतका वाढला आहे, की तो पुन्हा या भागात येणारच नाही याची व्यवस्था वन विभागाने केली पाहिजे. वन्यजीवांचे जतन केले पाहिजे. पण नरभक्षक झाल्यावर काय करायचे, हा प्रश्न आहेच. नरभक्षक बिबट्यांविषयी प्रेम असेल त्यांनी सांभाळावे. पण लहान लेकरांचे जीव जातायत त्यांना आता आळा घाला. - सागर कासार, शेवगेदारणा
नरडीचा घोट घेणारे प्रेम काय कामाचे?
मोहगाव बाभळेश्वर ही दोन गावे शहरालगत आहेत तरीही या भागात शंभर टक्के शेती व्यवसाय आहे. ग्रामस्थांनी कायमच वन्यजीवांची परिस्थिती टिकविली आहे. मात्र आता हे वन्यप्रेम जर नरडीचा घोट घेत असेल तर त्याचा विचार केलाच पाहिजे. - अर्जुन टिळे, ग्रामस्थ, मोहगाव
प्राणिसंग्रहालय उभारा पण बिबटे आवरा
वन विभाग प्राण्यांना जेरबंद करून जंगलात सोडतो. रक्ताला चटावलेले बिबटे जातील तेथे उच्छाद मांडतात. त्यामुळे बिबट्यांना मारायचे नसेल तर एखादे प्राणिसंग्रहालय करावे, तेथे पाळावे. चांदगिरीजवळ वन विभागाची पावणेदोनशे एकर जमीन आहे, तेथे प्राणिसंग्रहालय उभारा पण आता लोकांच्या अंगणापर्यंत येणारे बिबटे आवरा. - नंदू कटाळे, माजी उपसरपंच व सदस्य, चांदगिरी
हे नाकर्तेपणाचे बळी
वन्यजीवांपासून संरक्षणासाठी ग्रामपंचायतीतर्फे पत्रव्यवहार करूनही कोणतीच खबरदारी घेतली जात नाही. दोन दिवसांपूर्वी पंचक्रोशीतील दोनवाडे गावातील वृद्धाचा गेलेला बळी लक्षात घेऊन नरभक्षक बिबट्याचा कायमचा बंदोबस्त झाला पाहिजे. बाभळेश्वरच्या चिमुरडीचा बळी वन विभागाचा नाकर्तेपणा आहे. - भास्कर टिळे, ग्रामस्थ
जीव चालले बंदोबस्त करा
गेल्या काही महिन्यांपासून ही बिबट्याची दहशत आहे. गावोगावचे लोक तक्रारी करून त्रस्त आहेत. आता चिमुरड्याचा बळी घेतला आहे. त्यामुळे बिबट्याचा बंदोबस्त करावा. - प्रभाकर धात्रक, हिंगणवेढे
शेती, जिवाशी खेळ
सततच्या बिबट्याच्या हल्ल्यामुळे शेती करणे अवघड झाले आहे. रात्री पिकांना पाणी देणे जिवाशी खेळणे झाले आहे. 50 टक्के शेतकरी रानात व शेतात राहतात. नरभक्षक बिबट्यांच्या बंदोबस्तासाठी कायमस्वरूपी व्यवस्था उभारली पाहिजे. - विश्वास कळमकर, जाखोरी
मोबदला द्या
बिबट्याच्या हल्ल्यात प्राण गमवावे लागलेल्या सगळ्या कुटुंबांना वन विभागाने नुकसानभरपाई दिली पाहिजेच पण त्याशिवाय यापुढे हल्ले होणार नाहीत याची कायमस्वरूपी व्यवस्था झाली पाहिजे. बिबट्याचे हल्ले रोखण्यासाठी ठोस अशी उपाययोजना करावी. - सागर जाधव, सामाजिक कार्यकर्ता
ठार करण्याचे आदेश द्यावेत
सध्या सर्वत्र कोरोना महामारीने तसेच नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आणलेले आहे अन् अशातच दहीवड शिवारातील शेतकऱ्यांनी जिवापाड जपलेल्या गुराढोरांवर बिबट्याने धुमाकूळ घातलेला आहे. शासन-प्रशासनाने या गोष्टीची दखल घेऊन त्वरित बिबट्याची उपाययोजना करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी ही विनंती. - संजय दहीवडकर, देवळा
पिंजरे उपलब्ध करून द्या
ग्रामीण भागात सतत बिबट्याचा वावर वाढत आसल्याने शासनाने यावर उपाययोजना करावी. हे बिबटे नरभक्षक झाल्याने ग्रामस्थांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. गावोगावी पिंजरे उपलब्ध करून द्यावेत. याबाबात जनजागृती करून ग्रामस्थांनी काळजी घेतली पाहिजे. - अजित गायधनी, सरपंच, पळसे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.