मनसेला चार महिन्यांनतर अचानक जाग का? नागरिकांकडून सवाल उपस्थित

MNS.png
MNS.png

नाशिक : शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युवा कार्यकर्त्यांनी महापौर सतीश कुलकर्णी यांना च्यवनप्राश देऊन फिट राहण्याचा सल्ला देताना कोरोना हॉटस्पॉट भागाला भेट देण्याचा सल्ला दिला. मात्र गेल्या चार महिन्यांपासून आतापर्यंत मनसे कार्यकर्ते कुठे गेले होते, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे. 

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव अडचणीचा
जून व जुलैत शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून दररोज दीडशे ते दोनशे रुग्ण आढळत आहेत. कोरोना नियंत्रणासाठी सहाजिकच महापालिका प्रशासनावर मोठ्या प्रमाणात दबाव वाढत आहे. प्रशासनाबरोबरच महापालिकेतील सत्ताधारी भाजपलाही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव अडचणीचा ठरत आहे. या वातावरणात खासगी रुग्णालयांनी मोठ्या प्रमाणात दुकानदारी सुरू करून रुग्णांची आर्थिक लूट चालविली आहे. याविरोधात महापालिकेतील विरोधी पक्ष म्हणून अजय बोरस्ते यांनी ठोस भूमिका घेत अडचणीच्या काळात रुग्णांची लूट थांबविण्यासाठी पुढाकार घेऊन तक्रारीसाठी हेल्पलाईन सुरू केली.

खासगी रुग्णालयांमधील लूट थांबविण्याची मागणी

शिवसेना आक्रमक होत असल्याने प्रशासनाने तातडीने रुग्णालयांमध्ये भरारी पथकांची नियुक्ती करून बिले तपासण्याचा निर्णय घेतला. परंतु इतर पक्षांच्या नेत्यांनी फक्त बघ्याची व निवेदने देण्यापलीकडे ठोस काम केले नाही. शहरात कॉंग्रेस अस्तित्वहीन आहे. पालकमंत्री छगन भुजबळ दोन दिवसांनी बैठका घेऊन प्रशासनाला सूचना करत आहे. भाजप सत्तेत असल्याने उलट राग व्यक्त होण्याची भीती नेत्यांमध्ये आहे. आमदारांच्या माध्यमातून कधी जिल्ह्याच्या सीमा बंद करण्याचा तर कधी सीआरएफ तैनात करण्याचा सल्ला दिला गेला. राज्य शासनाने "पुनश्‍च हरिओम' चा नारा दिला असताना त्याउलट भूमिका घेत भाजपच्या आमदारांनी पंधरा दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केली. या परिस्थितीत मनसे आतापर्यंत कुठे दिसली नाही. गेल्या दोन दिवसांत मनसे कोरोना प्रादुर्भावात आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. मनसेच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून थेट पालकमंत्र्यांवर निशाणा साधत खासगी रुग्णालयांमधील लूट थांबविण्याची मागणी केली. 

नेते घरात, कार्यकर्ते मैदानात 
मनसेच्या कार्यकर्त्यांनी महापौर कार्यालयासमोर च्यवनप्राश भेट देण्याचे उपहासात्मक आंदोलन केले. या आंदोलनात नगरसेवक किंवा शहरातील प्रमुख पदाधिकारी गायब झाले. मनसेचा आकार दिवसेंदिवस कमी होत असताना जे कार्यकर्ते उरले त्यांच्यातही एकवाक्‍यता दिसून येत नाही. कोरोनासंदर्भात दोन दिवसांपू्र्वी झालेल्या पत्रकार परिषदेचे परस्पर निरोप देण्यात आल्याने त्या पदाधिकाऱ्यांचे पक्षात वाढते वजन मोठ्या नेत्यांना सहन न झाल्याने त्यातूनही वाद निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com