
नाशिक : हवामान विभागाच्या अंदाजानुसार निसर्ग चक्रीवादळ बुधवारी (ता. ३) किंवा गुरुवारी (ता. ४) जून रोजी नाशिक जिल्ह्यात येण्याची शक्यता असून जिल्ह्यातील काही भागात नागरिकांना अतिवृष्टी, गारपीट व वादळाचा फटका बसू शकतो. त्यामुळे नाशिक शहर व जिल्ह्यातील नागरिकांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षिततेसाठी दोन दिवस घराबाहेर पडणे टाळावे असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
सूचनांचे पालन करावे
हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री छगन भुजबळ हे आपत्ती व्यवस्थापन मदत आणि प्रशासनाकडून परिस्थितीचा आढावा घेण्यात येत असून योग्य त्या उपाययोजना करण्याबाबत सूचना दिलेल्या आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे की, आयएमडी हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार निसर्ग चक्रीवादळ नाशिक जिल्ह्यात दाखल होऊन यामुळे जिल्ह्यात काही भागात अतिवृष्टी, गारपीट व वादळाचा फटका बसू शकतो. त्यामुळे या काळात नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करावे.
सुरक्षित स्थळी स्थलांतरीत व्हावे
या वादळाच्या पार्श्वभूमीवर अतिवृष्टीमुळे नागरिकांनी घरातच सुरक्षित रहावे, घराच्या बाहेर पडू नये. घर नादुरुस्त असल्यास किंवा पत्र्याचे असेल तर तात्काळ दुरुस्ती करावी व सुरक्षित स्थळी आवश्यक साधनसामुग्री सोबत घेवून स्थलांतरीत व्हावे, घराच्या भोवती वादळामुळे विजेचे खांब किंवा तारा, झाडे इ. पडण्याची शक्यता असल्यास अशा वस्तुंपासुन लांब रहावे. शेतकऱ्यांनी आपले पशुधन व अन्य पाळीव प्राणी यांना अगोदरच सुरक्षित स्थळी हलवावे किंवा आपल्या सोबत सुरक्षित करावे असे छगन भुजबळ यांनी सांगितले आहे. तसेच नागरिकांनी घरात प्रथोमोचार किट, लागणारी आवश्यक औषधे व आजारी रुग्णाची औषधे सुरक्षित जवळ ठेवावी. विद्युत वाहक तारा तुटल्याने व ट्रान्सफार्मर खराब झाल्यास पर्यायी व्यवस्था करावी. जनरेटर साठी इंधनाचा पुरवठा असावा.
अफवांवर विश्वास ठेवू नये
शेतकऱ्यांनी आपला शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा. विनाकारण घराबाहेर न पडता व कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. सद्यस्थितीत जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होम क्वारंटाइन असलेले नागरीक यांच्यासाठी सुरक्षित स्थळे निश्चित करावी व चक्रीवादळाचे पार्श्वभुमीवर त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्याबाबत नियोजन करावे तसेच अधिक माहितीसाठी व आवश्यक मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापन कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक संपर्क क्रमांक 0253-2317151 व 2315080 येथे संपर्क करावा असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.