esakal | Diwali 2020 : लॉकडाउनचे नैराश्‍य झुगारून नागरिक दिवाळीत रस्त्यावर! सर्वत्र सकारात्मक ऊर्जा
sakal

बोलून बातमी शोधा

diwali and corona.jpg

लॉकडाउनच्या सात-आठ महिन्यांपासून आलेले नैराश्‍य आजच्या तेजोपर्वात झाकाळले गेले व सर्वत्र सकारात्मक ऊर्जा दिसून आली. ‘घरात, व्यवसायात सदैव लक्ष्मीचा वास असू दे’ अशी प्रार्थना करत शहर व उपनगरांत लक्ष्मीपूजनाचा मोठा उत्साह दिसून आला. 

Diwali 2020 : लॉकडाउनचे नैराश्‍य झुगारून नागरिक दिवाळीत रस्त्यावर! सर्वत्र सकारात्मक ऊर्जा

sakal_logo
By
दत्ता जाधव

नाशिक : आठ महिन्यांपासून लॉकडाउनमुळे घराघरांत बंदिस्त असलेल्या नागरिकांसाठी दिवाळी म्हणजे जणू बंधमुक्त होण्याचे पर्व ठरले. कोरोनामुळे अनेक महिने घरात स्‍वतःला कोंडून घेतलेल्या नागरिकांनी तीन दिवसांपासून रस्त्यावर अक्षरशः गर्दी केली. 

बंधन झुगारत साचलेपण बाहेर

पहाटेच्या फटाके वाजण्यापासून तर खरेदीतील उत्साह आणि रात्री लक्ष्मीपूजनाच्या जल्लोषापर्यंत सर्वत्र हा बंधन झुगारत साचलेपण बाहेर पडताना दिसत होता. पहाटेची आतषबाजी आणि घरोघरी सडारांगोळीपासून पदोपदी हा उत्साह दिसून येत होता. लॉकडाउनच्या सात-आठ महिन्यांपासून आलेले नैराश्‍य आजच्या तेजोपर्वात झाकाळले गेले व सर्वत्र सकारात्मक ऊर्जा दिसून आली. ‘घरात, व्यवसायात सदैव लक्ष्मीचा वास असू दे’ अशी प्रार्थना करत शहर व उपनगरांत लक्ष्मीपूजनाचा मोठा उत्साह दिसून आला. 

खरेदीदारांचा उत्साह टिकून 
गुरुवारच्या वसुबारसेपासून दिवाळीचा उत्साह दिसू लागला. तीन-चार दिवसांपासून हा उत्साह खरेदीदारांच्या गर्दीच्या रूपाने रस्‍त्यावरही पाहायला मिळत आहे. बाजारात पाय ठेवायलाही पुरेशी जागा नाही, अशी अनेक प्रमुख चौकातील स्थिती आहे. मेन रोड, शालिमार, रविवार पेठ, सराफ बाजार, दहीपूल, कानडे मारुती लेन या मुख्य बाजारपेठेत पाय ठेवायलाही जागा नव्हती. सराफी पेढ्यांमध्येही उत्साह होता. दीपावलीनिमित्त अनेक व्यावसायिकांनी दागिन्यांच्या घडणावळीत मोठी सूट दिली होती. दोन दिवसांच्या तुलनेत थंडीही काहीशी कमी झाल्याने खरेदीसाठी उशिरापर्यंत 
उत्साह होता. 

हेही वाचा > अरेच्चा! लासलगावचा कांदा ‘कौन बनेगा करोडपती’वर; लासलगावचे नाव पुन्हा प्रकाशझोतात 

नरक चतुर्दशीनिमित्त अभ्यंगस्नान 
अधिकमासामुळे यंदा लक्ष्मीपूजन व नरक चतुर्दशी एकाच दिवशी आल्याने यादिवसाला अधिक महत्त्व आहे. याचदिवशी भगवान श्रीकृष्ण आणि भगवतीने नरकासुराचा वध केल्याची आख्यायिका आहे. त्यामुळेच दीपोत्सवाच्या या पर्वात नरक चतुर्दशीच्या अभ्यंगस्नाला मोठे महत्त्व होते, त्यासाठी पहाटे ५ वाजून ३१ मिनिटांनंतरचा मुहूर्त साधत अनेकांनी अभ्यंगस्नानाचा आनंद लुटला. या वेळी सुगंधित तेले, सुवासिक उटण्यांबरोबरच पारंपरिक पूजाविधीही पार पडले. 

हेही वाचा > विवाहितेच्या अंगावरील स्त्रीधन काढून अपहार प्रकरणी गुन्हा दाखल 

खतावणीपूजनही 
दीपोत्सव पर्वातील अमावस्या हा दिवस सर्वांत शुभ मानला जातो. त्यामुळे या मुहूर्तावर खतावणी पूजनालाही महत्त्व आहे. त्यामुळे सकाळी आठ ते साडेनऊ व सायंकाळी ६.५४ ते साडेसात आणि त्यानंतर ९ वाजून ६ मिनिटे ते १०.४२ यावेळेत अनेकांनी लक्ष्मीपूजन करत आरोग्याबरोबरच व्यवसायवृद्धीसाठी लक्ष्मीला साकडे घातले.