मोसंबी लागवडीचा प्रयोग यशस्वी! लिंबूवर्गीय फळपीक कसमादेत येण्याच्या आशा

मोठाभाऊ पगार
Thursday, 8 October 2020

आगामी काळात या फळधारणेच्या प्रमाणात वाढ होणार असल्याने चांगली उत्पादकता मिळणार, असा विश्वास या थोरात कुटुंबीयांनी ‘सकाळ’कडे व्यक्त केला. सध्या त्यांच्या बागेत १५०-२०० च्या आसपास झाडे आहेत. पारंपरिक पिकांऐवजी नवनवीन फळपिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढू लागल्याने अशा फळबागा पाहण्यासाठी शेतकरी भेट देत आहेत.

नाशिक / देवळा : डाळिंबावरील रोगांचा मुकाबला करणे दिवसेंदिवस अवघड होऊ लागल्याने देवळा परिसरातील काही शेतकऱ्यांनी मोसंबी या फळ पिकाची लागवड करत पर्याय शोधण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. त्यामुळे विदर्भ-मराठवाड्यातील हे लिंबूवर्गीय फळपीक कसमादेत येण्याच्या आशा वाढल्या आहेत. 

विदर्भ-मराठवाड्यातील लिंबूवर्गीय फळपीक कसमादेत येण्याच्या आशा 
कसमादे हा भाग फळबाग लागवडीत अग्रेसर आहे. या पट्ट्यात डाळिंबाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जायचे. मात्र, गेल्या पाच-सात वर्षांपासून डाळिंबावर तेल्या, प्लेग व इतर अनेक रोगांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने उत्पादन घेणे अवघड झाले. या पार्श्वभूमीवर डाळिंबाला पर्याय म्हणून शेतकरी इतर फळपिकांची लागवड करू लागले आहेत. त्यात पिंपळगाव (वा.) (ता. देवळा) येथील नानाजी थोरात व विशाल थोरात या शेतकऱ्यांनी मोसंबी लागवडीचा प्रयोग केला आहे. त्यांनी गेल्या वर्षी काही रोपे नागपूर नर्सरी येथून, तर काही घरीच तयार केली. एलएनके नागपूर जातीच्या मोसंबीची रोपे आणत १५ बाय १५ या अंतरावर लागवड केली. वातावरण व हवामान अनुकूल मिळाल्याने येथे मोसंबीची बाग फुलली आहे. काही झाडांना फळे लगडू लागल्याने या शेतकऱ्यांचा उत्साह वाढला आहे. 

मोसंबी लागवडीचा प्रयोग यशस्वी 
आगामी काळात या फळधारणेच्या प्रमाणात वाढ होणार असल्याने चांगली उत्पादकता मिळणार, असा विश्वास या थोरात कुटुंबीयांनी ‘सकाळ’कडे व्यक्त केला. सध्या त्यांच्या बागेत १५०-२०० च्या आसपास झाडे आहेत. पारंपरिक पिकांऐवजी नवनवीन फळपिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढू लागल्याने अशा फळबागा पाहण्यासाठी शेतकरी भेट देत आहेत. मोसंबी हे फळपीक सी व्हिटॅमिनयुक्त औषधी असून, प्रतिकारशक्ती वाढवणारे आहे. त्वचा, केस, डोळे यांसाठी ते फायदेशीर आहे. वजन कमी करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. त्यामुळे आता मोसंबीला मागणी वाढू लागली आहे. 

हेही वाचा > चेष्टामस्करीने गेला तरुणाचा जीव! काँप्रेसरने भरली गुदद्वारात हवा; नऊ दिवसांनंतर घटनेचा खुलासा
 

डाळिंबाला पर्याय म्हणून आम्ही शेतकरी नवनवीन प्रयोग करून इतर फळपिके अजमावून पाहत आहोत. आपल्या भागात लिंबू चांगली येतात तर मग मोसंबीपण येऊ शकते, हा तर्क काढत आम्ही मोसंबी लावली. स्थानिक बाजारपेठेत मोसंबीला मागणी राहील, अशी आशा वाटते. -नानाजी खैरनार, पिंपळगाव (वा.) (ता. देवळा) 

हेही वाचा >  भावनिक मेसेज वाचून मदत करायला जात असाल तर सावधान! बातमी तुमच्यासाठी

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Citrus cultivation experiment successful nashik marathi news