
नाशिक : अनेक वर्षांपासून सुरू होणार म्हणून वाट पाहणाऱ्या नाशिककरांची शहर बससेवेची इच्छा लवकरच पूर्ण होणार असून, २६ जानेवारीपासून पूर्ण क्षमतेने बससेवा सुरू करण्याची तयारी महापालिका प्रशासनाने केली आहे. या संदर्भात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आयुक्त कैलास जाधव यांनी आढावा घेतला. पहिल्या टप्प्यात पन्नास बस सुरू केल्या जाणार आहेत. प्रायोगिक तत्त्वावर १ जानेवारीपासून सेवा सुरू होईल.
पहिल्या टप्प्यात दोनशे बस सुरू
राज्य परिवहन महामंडळाने तगादा लावल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेला बससेवा सुरू करण्याच्या सूचना २०१८ मध्ये दिल्या होत्या. त्यानुसार महापालिकेने कारवाई केली. सुरवातीला शहरात सहाशे बस चालविण्याचे नियोजन होते. परंतु तोटा अधिक वाढत असल्याने ग्रॉस कॉस्ट कटिंग या तत्त्वानुसार चारशे बस सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र प्रवाशांचा प्रतिसाद व महापालिकेला होणारा तोटा लक्षात घेऊन पहिल्या टप्प्यात दोनशे बस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
प्रशासनाने हालचाली गतिमान
बससेवेसाठी महापालिकेचे इन्फ्रास्ट्रक्चर राहणार असून, बस पुरविण्यासाठी ठेकेदार कंपन्यांची नियुक्ती, ऑपरेटर, चालक व वाहकांची नियुक्ती महापालिका करणार आहे. तिकीटवसुली ठेकेदारामार्फत केली जाणार असून, किलोमीटरमागे बस कंपन्यांना नफा दिला जाणार आहे. शंभर सीएनजी, पन्नास डिझेल, तर पन्नास इलेक्ट्रॉनिक बस चालविल्या जातील. दिवाळीत शहर बससेवा सुरू होण्याची शक्यता होती, परंतु लॉकडाउनमुळे विलंब झाला. नागरिकांची वाढती मागणी लक्षात घेऊन बससेवा सुरू करण्यासाठी प्रशासनाने हालचाली गतिमान केल्या आहेत. बस पुरविणाऱ्या ठेकेदारांचेही आर्थिक नुकसान होत असल्याने कायदेशीर अडचण निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून प्रशासनाने पाऊल उचलले आहे.
विभागनिहाय जबाबदारी निश्चित
बससेवा सुरू करण्याच्या तयारीचा भाग म्हणून विभागनिहाय जबाबदारी निश्चित करण्यासाठी बैठक घेतली जाणार आहे. पायाभूत सुविधा, नियंत्रक, परिवहन सेलची नियुक्ती आदी विभागांसाठी जबाबदारी निश्चित करून सेवा सुरू करण्याचा आढावा घेतला जाणार आहे.
बससेवा सुरू करण्यासाठी विभागप्रमुखांची बैठक घेऊन जबाबदारीचे वाटप केले जाणार आहे. १ जानेवारीपासून प्रायोगिक तत्त्वावर, तर २६ जानेवारीपासून पूर्ण क्षमतेने शहर बससेवा सुरू करण्याचे प्रयत्न आहेत.
-कैलास जाधव, आयुक्त, महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.