एक हात बिबट्याच्या जबड्यात, तरीही चिमुकला थेट भिडलाच; 12 वर्षांच्या गौरवची धाडसी झुंज

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 4 November 2020

याचवेळी अचानकपणे शेतातील दुसऱ्या बाजूने त्याच्या समोरुन बिबट्या आला. साहजिकच गौरवदेखील बिबट्याला डोळ्यांपुढे काही फुटांवर बघून घाबरला. यावेळी तो शेतातून बाहेर जाणारच तेवढ्यात बिबट्याने झडप घेत त्याचा उजवा हात जबड्यात घेतला.

नाशिक : दुपारची वेळ...काळुंगे कुटुंबीय शेतात काम करत होते. सातवीत शिकणारा गौरवही मक्याची कणसे तोडून पाटीत टाकत होता. कामात गर्क असणारा गौरवाला अचानक समोर दिसला बिबट्या. बिबट्याने गौरवचा हात जबड्यात घातला. तोही जरा घाबरलाच. अन् नंतर घडले असे...

गौरवचा हात बिबट्याच्या जबड्यात...

सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली -घोटी रस्त्यालगत असलेल्या सोनांबे गावालगतच्या सोनारी गावात संजय काळुंगे यांचे कुटुंबीय राहतात. मंगळवारी (ता. 3) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास मक्याच्या शेतात मशागतीची कामे सुरु होती. शाळांना सध्या सुटी असल्याने संपुर्ण कुटुंब शेतीवरच होते. काही महिला, पुरुष शेतमजूर सोंगणी करत होते. तर काही मक्याची कणसे खुडत होती. यावेळी जनता विद्यालयात सातवीच्या वर्गात शिकणारा गौरव काळुंगे हा शाळकरी मुलगाही कणसे तोडून पाटीमध्ये टाकत होता. याचवेळी अचानकपणे शेतातील दुसऱ्या बाजूने त्याच्या समोरुन बिबट्या आला. साहजिकच गौरवदेखील बिबट्याला डोळ्यांपुढे काही फुटांवर बघून घाबरला. यावेळी तो शेतातून बाहेर जाणारच तेवढ्यात बिबट्याने झडप घेत त्याचा उजवा हात जबड्यात घेतला; मात्र हा पठ्ठयाही घाबरला नाही, त्याने दुसऱ्या हाताने बिबट्याच्या मानेला जोरजोराने बुक्के मारण्यास सुरुवात केली, त्यामुळे बिबट्याने जबड्यात घेतलेला गौरवचा हात सोडून पळ काढला आणि गौरवने दाखविलेल्या धाडसामुळे त्याचा प्रतिकार यशस्वी झाला.

कुटुंबियांचा उडाला थरकाप

गौरवचा रक्तबंबाळ हात बघून घरच्यांचा काळजाचा ठोकाच चुकला. त्याच्या आवाजाने आजुबाजुचे शेतमजूर, त्याचे वडील संजय, काका सोनांबेचे पोलीस पाटील चंद्रभान पवार आदींनी धाव घेतली. त्याला तत्काळ नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. बुधवारी (ता. ४) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास गौरवला डिस्चार्जही देण्यात आला. गौरवच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. असे असले तरीही हल्ला करण्याची ही पहिलीच घटना असल्याने गावात काही प्रमाणात भीतीचे वातावरण पसरले अहे. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक! अखेरच्या क्षणीही मैत्रीचा घट्ट हात कायम; जीवलग मित्रांच्या एकत्रच निघाल्या अंत्ययात्रा

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सिन्नर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण सोनवणे, वनपाल पंढरीनाथ आगळे यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच बुधवारी सकाळी त्वरित पिंजरा लावण्यात आला आहे. सोनारी शिवारात असलेली उसाची शेती अन‌् दारणेचे खोरे यामुळे या भागात बिबट्याचा वावर आहेच, नागरिकांनी खबरदारी घेत शेतीची कामे करावी व वनविभागाच्या सुचनांचे पालन करावे, असे आवाहन सोनवणे यांनी केले आहे.

हेही वाचा > धक्कादायक! रक्षकच जेव्हा भक्षक बनतो तेव्हा; पोलिस पतीसह पाच जणांकडून पत्नीचा छळ

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The leopard saw a 12-year-old boy and ran away nashik marathi news