एसटीकडून शहर बससेवा बंद? कोरोनाच्या निमित्ताने महापालिकेवर दबावाचे प्रयत्न 

विक्रांत मते
Monday, 12 October 2020

महापालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून राज्य परिवहन महामंडळाची बससेवा स्वतःच सुरू करण्याच्या महापालिकेच्या हालचाली आहेत. एसटी प्रशासनाने तोट्याचे कारण देत महापालिकेने बससेवा सुरू करण्याची मागणी केली होती.

नाशिक : कोरोना लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर राज्य परिवहन महामंडळाकडून देखील बस बंद करण्यात आल्या. सध्या आचके खात सेवा सुरू असली तरी नाशिक शहरात मात्र आता कायमस्वरूपी एसटीला लाल झेंडा मिळण्याची शक्यता आहे. महापालिकेची बससेवा सुरू करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याने कोरोनाचे निमित्त साधून एसटीकडून शहर बससेवा बंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. 

एसटीची शहर बससेवा बंदच्या हालचाली 
महापालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून राज्य परिवहन महामंडळाची बससेवा स्वतःच सुरू करण्याच्या महापालिकेच्या हालचाली आहेत. एसटी प्रशासनाने तोट्याचे कारण देत महापालिकेने बससेवा सुरू करण्याची मागणी केली होती. त्या पत्राचा आधार घेत २०१७ मध्ये बससेवा सुरू करण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून ठेवण्यात आला. ‘ग्रॉस कॉस्ट कटिंग’ या तत्त्वावर प्रस्ताव मंजूर केला. पहिल्या टप्प्यात दीडशे डिझेल, पन्नास इलेक्ट्रिक बस चालविल्या जाणार आहेत. बससेवेचे संचलन करण्यासाठी दोन कंपन्या निश्‍चित करण्यात आल्या, तर तिकीट वसुलीसाठी मक्तेदार नियुक्तीची प्रक्रिया सुरू आहे. महापालिकेने बससेवा सुरू करण्याची तयारी ९० टक्के पूर्ण झाली असून, टर्मिनस उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नाशिक शहरात चालविली जाणारी बससेवा एसटी महामंडळाने बंद केली आहे. 

कोरोनाच्या निमित्ताने महापालिकेवर दबावाचे प्रयत्न 
शासनाकडून आदेश येत नाहीत तोपर्यंत सेवा सुरू होणार नसल्याचे सांगितले जात असले तरी लॉकडाउनमुळे एसटी तोट्यात आल्याने तो तोटा काही प्रमाणात भरून काढण्यासाठी नाशिकला बससेवा सुरू करायची नाही, या निर्णयाप्रत एसटीचे प्रशासन आहे. एसटीने बससेवा सुरू न केल्यास महापालिकेकडून संपूर्ण ताकदीनिशी तांत्रिक बाबी पूर्ण करून बससेवा आपोआप सुरू होऊन एसटीचे दायित्व यानिमित्ताने संपुष्टात आणण्याचे प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. एसटीच्या स्थानिक अधिकाऱ्यांशी यासंदर्भात चर्चा केली असताना त्यांनी कानावर हात ठेवत महामंडळाकडून सेवा सुरू करण्यासंदर्भात जे काही आदेश येतील त्याची अंमलबजावणी होईल, असे स्पष्ट केले. 

हेही वाचा >  अशी ही माणुसकी! रस्त्यात सापडलेले पन्नास हजार केले परत; प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक

तोटा भरून काढण्यासाठीच 
शहरात २०१७ मध्ये परिवहन मंडळातर्फे रोज २०८ व एकूण ८९१.३२ किलोमीटर वाहतूक सेवा पुरविली जात होती. महापालिकेकडून बससेवा सुरू होणार असल्याने टप्प्याटप्प्याने सेवेचा विस्तार कमी करण्यात आला. एसटीने २०१७ मध्ये १०८.७१ कोटी रुपयांचा शहरात तोटा असल्याचे दर्शविले होते. मार्च महिन्यापूर्वी म्हणजे लॉकडाउन जाहीर होण्यापूर्वी एसटीच्या शहरात १४० बस धावत होत्या. आता नव्याने सेवा सुरू करण्यासाठी बसची दुरुस्तीसह अन्य खर्च करावा लागणार असल्याने त्यापेक्षा कोरोनाचे निमित्त साधून सेवाच बंद करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे सांगितले जात आहे.  

हेही वाचा > हाउज द जोश : 69 वर्षीय 'आजी'ने हरिहर किल्ला केला सर; तोही अवघ्या चार तासांत! पाहा VIDEO

संपादन - ज्योती देवरे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: City bus service from ST closed nashik marathi news