heavy rain yeola.jpg
heavy rain yeola.jpg

ढगाळ हवामान अन् पावसाचे पडसाद; कांद्यासह डाळिंब, भाजीपाल्याप्रमाणे रब्बी पिके संकटात 

नाशिक:ढगाळ हवामान व अधूनमधून हजेरी लावणाऱ्या पावसामुळे कांद्यासह डाळिंब अन् भाजीपाल्याप्रमाणेच रब्बी पिकेही संकटात सापडली आहेत. भाताचे नुकसान झाल्याने आदिवासी पट्ट्यात चिंता वाढली आहे. आर्द्रता आणि गारठ्याला ढगाळ हवामानाची जोड मिळाल्याने पिकांवरील रोगकीडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. भातशेतीची हानी झाली आहे. ऐन हंगामात हातातोंडाशी आलेले पीक जमीनदोस्त झाले. त्यातच करपा, तुडतुड्या या रोगाने भातशेती नष्ट झाली आहे. आदिवासी शेतकऱ्यांनी पीकविमा उतरवला असला, तरी नुकसानभरपाईची शाश्‍वती नाही. त्यातच भाताला मिळालेल्या कवडीमोलने शेतकऱ्यांचे दिवाळे निघाले. 

भातशेती आतबट्ट्याचा धंदा 
अवकाळीमुळे भातशेती आतबट्ट्याचा धंदा बनलाय. उत्पादन खर्चात वाढ झाली असताना, भाताला चांगला भाव नसल्याने शेतकरी कर्जबाजारी झाले. अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांवर जमीन विकून पोट भरण्याची वेळ आली आहे. भातशेतीचा एकरी खर्च २५ हजारांच्या पुढे गेला आहे. प्रत्यक्षात दहा ते पंधरा हजारांवर समाधान मानावे लागते. सरासरी एकरी उत्पन्न दहा क्विंटल मिळत असून, किमान भाव दोन हजार रुपये मिळाल्यास उत्पन्न २० हजारांपर्यंत पोचते. एकरी भातशेतीचा खर्च रुपयांमध्ये असा ः बियाणे- दोन हजार, मशागत- तीन हजार, खते-५०० ते दोन हजार, आवणीची मजुरी- दहा हजार, निंदणी मजुरी- तीन हजार, सोंगणी व इतर- पाच हजार. 

हेही वाचा - धक्कादायक! तपोवन परिसरात आढळला युवतीचा विवस्त्र मृतदेह; परिसरात खळबळ
सर्वाधिक फटका कांद्याला 
मालेगाव : मालेगावसह कसमादे परिसरात तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. अधूनमधून रिमझिम पाऊस पडत आहे. पारा घसरल्याने हुडहुडी भरली आहे. या ढगाळ वातावरणाचा व बिगरमोसमी पावसाचा सर्वाधिक फटका कांदा पिकाला बसत आहे. कांद्यावर करपा व मावा रोगाचा प्रादुर्भाव जाणवू लागला आहे. मोठा पाऊस अथवा गारपीट झाल्यास पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. कसमादे पट्ट्यात उन्हाळ कांदा लागवडीची धूम आहे. सद्यःस्थितीत हरभरा व गव्हाला धोका नसला, तरी आणखी काही दिवस असेच वातावरण राहिल्यास रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. ढगाळ वातावरण आणि बिगरमोसमी पाऊस सुरू राहिल्यास डाळिंब, पेरू, पपई, शेवगा आदी पिकांनाही त्याचा फटका बसणार आहे. 

हेही वाचा - दुर्दैवी! एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा
कांदारोपांवर फवारण्या सुरू 
देवळा : शेतकऱ्यांनी कांदा पीक व रोपे वाचवण्यासाठी फवारण्या सुरू केल्या आहेत. देवळा तालुक्यात साडेबारा हजार हेक्टर क्षेत्रावर कांदालागवड झाली असून, दीड हजार हेक्टर क्षेत्रावर कांदारोपे आहेत. या अवकाळी पावसामुळे हे लाल सोने कसे वाचवावे, या विवंचनेत शेतकरी आहेत. कसमादे भागातील कांदा हे प्रमुख नगदी पीक आहे. सध्या तर जिकडेतिकडे उन्हाळ कांद्याची लागवड सुरू आहे. दोन दिवसांपासून ढगाळ व पावसाळी वातावरणामुळे कामात खंड पडला असून, रोपे वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. महागडी बियाणे घेऊन व दुबार-तिबार पेरणी करत रोपे तयार केली आहेत. त्यामुळे या पिकावर साऱ्यांनीच लक्ष केंद्रित केले आहे. 

शेतकऱ्यांना पुन्हा आर्थिक भुर्दंड 
आधीच कांदा बियाणे, मजुरी, खते यावर खर्च करत कांदालागवड केलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा फवारणीच्या औषधांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. या वातावरणामुळे करपा, भुरी, मावा व बुरशीजन्य रोगांचे आक्रमण होऊ लागले आहे. रोगकीड व्यवस्थापन करण्यासाठी खर्च वाढणार आहे. 

यंदा सर्वदूर अवकाळी पावसाने व रोगाने भातशेती अगदी भुईसपाट केली आहे. पावसाचा हंगाम होऊन गेल्यानंतरही ही पिके शेतात पडून होती. एकीकडे पाऊस सुरू आणि खाली बळीराजा भात झोडत होता. पण कृषी विभागाकडून पंचनामे कधी झाले तेच समजले नाही. शेतकऱ्यांनी निसर्गाच्या व रोगाच्या कचाट्यातून वाचलेली भातपिके वाचवली असताना कृषी विभागाने पंचनामे केलेले नाहीत. - बाळासाहेब धुमाळ, शेतकरी संघटनेचे नेते 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com