VIDEO : जीवनावश्‍यक सेवांसाठी इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर "मिशन व ऍक्‍शन मोडमध्ये" - जिल्हाधिकारी

suraj-mandhre.jpeg
suraj-mandhre.jpeg

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरचे काम आता पूर्णत: मिशन व ऍक्‍शन मोडमध्ये सुरू असून, जिल्ह्यातील सर्व जीवनावश्‍यक व अत्यावश्‍यक सेवा लॉकडाउनमध्ये सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी रविवारी (ता. 29) दिली. 

जिल्हाधिकारी सूरज मांढरे : अत्यावश्‍यक सेवांचा प्रशासनाकडून आढावा 
कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी 600 डॉक्‍टर व 1200 नर्स यांना व्हेंटिलेटर हर्साळणी, नियोजनबद्ध कृती आराखडा (SOP) आणि या काळात घेण्यात येणारी अत्यावश्‍यक काळजी या महत्त्वाच्या घटकांचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. आयएमएचे जिल्हास्तरीय प्रतिनिधी व मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या एसएमबीटी वैद्यकीय महाविद्यालयमार्फत तज्ज्ञ मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याबाबत नियोजन करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले. देवळाली कॅम्पमधील बेम्स स्कूल येथे 200 खाटांचे क्वारंटाइन हॉस्पिटल तयार करण्यासाठी नियोजन करण्यात येत असून, दातार लॅब एजन्सी, आयसीएमआर संचालकांसमवेत क्वारंटाइन टेस्टिंगबाबत चर्चा सुरू आहे. पाच हजार एन-95 मास्क, 50 हजार थ्री लेअर मास्क, एक हजार एक्‍स-रे फिल्म्स मुंबई येथून मागविण्यात आल्या आहेत. 

जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा 
बारामती येथून चार हजार 385 क्विंटल साखर मागविण्याबाबत संबंधित साखर कारखान्याचे व्यवस्थापन व ट्रान्स्पोर्टर यांच्याशी संपर्क साधून नियोजन करण्यात आले आहे. सर्व तालुक्‍यांना एप्रिलमध्ये मनमाड येथून धान्यवाटपाचे नियोजन करण्यात आले असून, त्याबाबत संबंधित व्यवस्थापकांशी सातत्याने संपर्क करण्यात येत आहे. साठेबाजी वाढू नये, यासाठी धान्य वितरण अधिकाऱ्यांना शहरातील दुकानांच्या तपासणीचे सनियंत्रण करण्याचे आदेश दिले असून, मालेगाव व पेठ येथील कामगारांना धान्यवाटप करण्यासाठी संबंधित पुरवठा निरीक्षकांमार्फत खात्री करून त्यांना स्वयंसेवी संस्थांमार्फत धान्यवाटप करण्याचे निर्देश दिले आहेत. घाऊक व किरकोळ व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी समन्वय साधून शेजारील जिल्ह्यातून (ठाणे, धुळे, लातूर, अकोल इत्यादी) डाळी, गोडेतेल माविण्याबाबत नियोजन करण्यात येत आहे. 

18 संस्थांतर्फे दहा हजार जणांना अन्नदान 
सकल जैन संघटना यांच्यामार्फत दुपारी सातपूर, उपनगर, द्वारका ते पाथर्डी पूल, म्हसरूळ, सिडको येथील एक हजार 650 लोकांना, तसेच रॉबिनहूड आर्मी, वेलकम सहकार्य मित्रमंडळ, श्री नबीन भाई, तपोवन मित्रमंडळ, गुरुद्वारा, शिंगाडा तलाव, गुरुद्वारा देवळाली, अमिगो ट्रान्स्पोर्ट साजीदभाई, लक्ष्मीनारायण संस्थान, वुई फाउंडेशन यांच्यामार्फत नाशिक शहरातील विविध ठिकाणी पाच हजार लोक असे सर्व मिळून एकूण सहा हजार 650 लोकांना अन्नदान करण्यात आले. सकल जैन संघटनेमार्फत नवीन सिडको येथे जिल्हा रुग्णालय रक्तपेढीकरिता 54 व्यक्तींनी, जनकल्याण रक्तपेढीमार्फत 60 व्यक्तींनी रक्तदान केले असून, 34 व्यक्ती व संस्थांनी मदतीसाठी सहभाग दर्शविला आहे. दहा हजार लोकांना 18 संस्थांमार्फत अन्नदान करण्यात येणार आहे. घोटी येथे सहा संस्थांमार्फत 800 पेक्षा जास्त स्वयंसेवक उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. दोन संस्थांमार्फत 52 हजार मास्क व एक रुग्णवाहिका उपलब्ध करणार असून, एक संस्था 274 लोकांच्या राहण्याची व्यवस्था करणार आहे, तर दहा वाहनांसह तातडीची हेलिकॉप्टर सेवाही उपलब्ध होणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. 

1,291 खाटांचे विलगीकरण कक्ष 
नाशिक शहरात पाच ठिकाणे निश्‍चित करून सद्यःस्थितीत 20 खाटांचा विलगीकरण कक्ष व 348 खाटांचा अलगीकरण कक्ष तयार करण्यात आलेला आहे. पुढील संभाव्य परिस्थितीला अनुसरून एक हजार 291 खाटांचा विलगीकरण व पाच हजार खाटांचा अलगीकरण कक्ष नियोजित करण्यात आला आहे. मालेगाव शहरातदेखील सात ठिकाणे निश्‍चित करून सद्यःस्थितीत 73 खाटांचा विलगीकरण कक्ष व 285 खाटांचा अलगीकरण कक्ष तयार करण्यात आला आहे. 

43 शेतकरी गटांमार्फत भाजीपाला व फळे सुविधा 
शहरात महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या जागांवर भाजीपाला व फळे उपलब्ध करून देण्याची व्यवस्था नाशिक जिल्ह्यातील 43 शेतकरी गटांमार्फत करण्यात आली आहे. या बाजारतळांवर समन्वय अधिकारी म्हणून कृषी विभागाकडून सहा अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून, फळे, भाजीपाला उपलब्ध करून देणाऱ्या शेतकरी गटांची व वाहतूक व्यवस्थेची माहिती वाहन क्रमांकासह संकलित करण्यात येत आहे. कीटकनाशके, खते, बियाणे यांची प्रत्येकी 42 केंद्रे सुरू आहेत. तसेच प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी 210 वाहतूकदारांना शेतमाल वाहतुकीसाठी परवानगी दिली आहे. निफाड ऍग्रो डीलर्स असोसिएशनच्या सभासदांची कृषी सेवा केंद्रे सकाळी दहा ते दुपारी तीनपर्यंत सुरू ठेवण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी मांढरे सांगितले. 

 जिल्ह्यात 46 औषधी विक्रेत्यांची 24 तास सेवा 
ऑक्‍सिजन सिलिंडर निर्मिती करणाऱ्या कंपन्यांची यादी तयार करण्यात आली आहे. तसेच रक्तपेढ्यांची यादी, 24 तास सुरू असलेल्या मेडिकल स्टोअर्सची यादी मोबाईल क्रमांकासह तयार असून, त्यामध्ये नाशिक शहरातील 25 व ग्रामीण भागातील 21 स्टोअर्सचा समावेश आहे. नाशिक विभागातील दहा औषध उत्पादकांना हॅंड सॅनिटायझर उत्पादनाचे परवाने मंजूर करण्यात आले असून, आठ डिस्टिलरी ऑपरेटर्सना तात्पुरत्या स्वरूपात हॅंड सॅनिटायझर उत्पादनाचे परवाने मंजूर करण्यात आले आहेत. तसेच जिल्ह्यातील 15 बाजार समित्यांपैकी लासलगाव बाजार समितीसह पाच बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव प्रक्रिया सुरू आहे. 

चेकपोस्टवर 46 हजार प्रवाशांची तपासणी 
जिल्ह्यात 29 ठिकाणी चेकपोस्ट कार्यरत असून, एकूण 17 हजार 742 वाहनांमधील 46 हजार 761 प्रवाशांची आतापर्यंत तपासणी करण्यात आली आहे. तपासणीदरम्यान निफाड येथील चेकनाक्‍यावर काठमांडू येथून प्रवेश करीत असलेल्या नागरिकांची तपासणी केली असता 38 प्रवासी सिन्नर, निफाडचे 15, नाशिक दोन, देवळा एक, बागलाण नऊ, येवला 14, इगतपुरी दोन अशा एकूण 81 प्रवाशांना होम क्वारंटाइन करण्याबाबतचे स्टॅम्पिंग करण्यात आले आहे. जिल्ह्यात कलम 144 भंगाची एकूण 611 प्रकरणे घडलेली असून, त्यामध्ये एफआयआर दाखल करून 71 व्यक्तींना अटक करण्यात आलेली आहे. तसेच एक वाहनदेखील जप्त करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com