विद्यार्थ्यांसाठी 'एमकेसीएल'तर्फे ऑनलाइन परीक्षा सराव; ३१ ऑक्‍टोबरपर्यंत संधी उपलब्‍ध

अरुण मलाणी
Saturday, 3 October 2020

ही सुविधा ३१ ऑक्टोबरपर्यंत उपलब्ध असेल. सध्या संकेतस्थळावर विद्यापीठनिहाय पदवी अभ्यासक्रमातील विषयांसंबधित चाचण्या ठेवण्यात आलेल्या नाही. आकलन, उपयोजन, विश्लेषण, संश्लेषण व निर्णयक्षमता तसेच भाषिक व तार्किक कौशल्ये आदी तपासणाऱ्या सर्वसाधारण क्षमता-चाचण्या ठेवल्‍या आहेत.

नाशिक : सध्याची कोरोनाची परिस्‍थिती लक्षात घेता अंतिम वर्ष, अंतिम सत्रातील परीक्षा वस्‍तूनिष्ठ बहुपर्यायी स्‍वरूपात घेतली जाणार आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना संगणक किंवा स्‍मार्टफोनवरील ऑनलाइन परीक्षांचा सराव नसल्‍याने विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. या पार्श्वभुमीवर महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एमकेसीएल) यांच्‍यातर्फे अभिरूप (मॉक) ऑनलाइन परीक्षेची विनामुल्‍य सराव सुविधा उपलब्‍ध केली आहे. 

सराव सुविधा संकेतस्थळावर उपलब्ध

एमकेसीएलद्वारे अभिरूप (मॉक) ऑनलाईन परीक्षेच्‍या सराव सुविधा mockexams.mkcl.org या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेली आहे. गेल्या तीन दिवसात राज्यातील २६ हजार विद्यार्थ्यांनी सुविधेचा लाभ घेतला असल्‍याचे एमकेसीएलने कळविले आहे. इच्छुक विद्यार्थी संगणक किंवा स्मार्टफोनद्वारे संकेतस्थळावर जुजबी माहिती देऊन नोंदणी करू शकतात. त्याद्वारे मिळालेल्या लॉगीन व पासवर्डचा वापर करून कितीही वेळा ऑनलाईन परीक्षेचा सराव करता येणार आहे. ही सुविधा ३१ ऑक्टोबरपर्यंत उपलब्ध असेल. सध्या संकेतस्थळावर विद्यापीठनिहाय पदवी अभ्यासक्रमातील विषयांसंबधित चाचण्या ठेवण्यात आलेल्या नाही. आकलन, उपयोजन, विश्लेषण, संश्लेषण व निर्णयक्षमता तसेच भाषिक व तार्किक कौशल्ये आदी तपासणाऱ्या सर्वसाधारण क्षमता-चाचण्या ठेवल्‍या आहेत. त्यामुळे सर्व विद्यापीठांच्या सर्व अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षेबाबत माहिती मिळेल. विद्यार्थ्यांच्या संगणक किंवा स्मार्टफोनमधील कॅमेऱ्याचा विशिष्ट पद्धतीने उपयोग करून परीक्षेदरम्यान विद्यापीठाकडून पर्यवेक्षण कसे केले जाऊ शकते, याचीही झलक विद्यार्थ्यांनी त्यांचा कॅमेरा सुरू ठेवल्यास मिळू शकेल. 

हेही वाचा > तीन तास मातृत्व धोक्यात; देवदूतांच्या समयसूचकतेने वाचले प्राण!

संकेतस्‍थळ केवळ सरावासाठी 

विद्यापीठांचे विषयनिहाय सराव प्रश्नसंच सार्वजनिक आखत्यारीत (पब्लिक डोमेनमध्ये) पुनर्वितरणासाठी उपलब्ध झाल्यास ते सुद्धा विद्यार्थ्यांच्या लॉगीनमध्ये वेळोवेळी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यातून विद्यार्थ्यांना त्यांचाही सराव करता येईल. या संकेतस्थळावर परीक्षेसाठी केवळ सराव सुविधा उपलब्ध असून कोणत्याही विद्यापीठाची औपचारिक अंतिम परीक्षा घेतली जाणार नाही, असे एमकेसीएलतर्फे स्‍पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांनी संकेतस्थळाला भेट देत विनामूल्य सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन सुभाष पाटील यांनी केले आहे. 

हेही वाचा > लिफ्ट देणे आले अंगाशी; दहीपूल तरुण खून प्रकरणाचा झाला खुलासा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: For college students Online exam practice by MKCL nashik marathi news