मालेगावच्या 'या' गावांतही कोरोना वाढवतोय चिंता ...मात्र ग्रामस्थ सतर्क!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 मे 2020

मालेगाव शहरात कोरोनाने घट्ट बस्तान बसविले असताना, तालुक्‍याच्या ग्रामीण भागातही तो पसरू लागला आहे. आतापर्यंत या मोठ्या गावांसह सहा गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. दाभाडीतील सर्व 14 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, तर रावळगावमधील तिघांची प्रकृती सुधारत आहे. 

नाशिक : (मालेगाव) शहरात कोरोनाने घट्ट बस्तान बसविले असताना, तालुक्‍याच्या ग्रामीण भागातही तो पसरू लागला आहे. आतापर्यंत या मोठ्या गावांसह सहा गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. दाभाडीतील सर्व 14 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, तर रावळगावमधील तिघांची प्रकृती सुधारत आहे. 

महिन्यापासून गाव कडकडीत बंद

ग्रामीण भागात दाभाडीत सर्वप्रथम कोरोना रुग्ण आढळले. रुग्णसंख्या 14 वर गेली असली, तरी सध्या सर्व रुग्ण ठणठणीत झाले. मात्र अत्यावशक सेवा वगळता महिन्यापासून गाव कडकडीत बंद आहे. रावळगाव येथे मृत महिलेचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर गावातील 23 जणांची तपासणी करण्यात आली. यातील 20 जणांचे निगेटिव्ह, तर तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तिघांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून, त्यांना लवकरच घरी सोडले जाणार आहे. पाच दिवसांच्या बंदनंतर गावातील अत्यावश्‍यक सेवा व किराणा दुकाने सुरू करण्यात आली. ग्रामपंचायतीकडून 15 दिवसांत तीन वेळा जंतुनाशक फवारणी करण्यात आली. 

ग्रामस्थ पुरती खबरदारी घेताय

लोणवाडे येथील दोन्ही रुग्णांची प्रकृती सुधारत आहे. गावातील 19 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला. ग्रामस्थ पुरती खबरदारी घेत आहेत. चंदनपुरी येथील दोन्ही रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. गावात स्वच्छता व फवारणी करण्यात येत आहे. श्री खंडेरायाचे देवस्थान असल्याने येथे विशेष दक्षता घेतली जात आहे. मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. बाहेरील कोणत्याही व्यक्तीला गावात प्रवेश दिला जात नाही. टेहेरे येथे एक रुग्ण आढळल्यानंतर गावात आवश्‍यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. वजीरखेडे येथील एका मृत महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. ही महिला मुंबई येथील असून, तिचे वजीरखेडे हे माहेर आहे. 

हेही वाचा > हुश्श...'त्या' आरोग्य कर्मचाऱ्याच्या संपर्कातील नातेवाइकांचे रिपोर्ट निगेटिव्ह!

ग्रामीण भागातील रुग्ण झपाट्याने बरे होत आहेत. बाहेरील व्यक्ती गावात आल्यास तत्काळ आरोग्य विभागाला कळवावे. तसेच कोणताही त्रास होत असल्यास नजीकच्या आरोग्य केंद्रात तपासणी करावी. - डॉ. शैलेशकुमार निकम, तालुका आरोग्याधिकारी  

हेही वाचा > कधी संपणार 'या' वाड्यांची शोकांतिका?...अजूनही मूलभूत सुविधांचा अभाव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Concerns about growing corona in rural Malegaon nashik marathi news