'उपाययोजना अभावी वाहतुकीचा चक्का जाम'...ट्रकचालक कोरोनाबाधीत आढळल्याने ट्रान्स्पोर्ट उद्योग चिंतेत!

 truck.jpg
truck.jpg

नाशिक : लॉकडाउनमध्ये ट्रक वाहतुकीला चालना मिळावी म्हणून केंद्रीय गृहमंत्रालयाने शिथिलता आणली. प्रत्यक्षात मात्र 70 टक्के चालक गावाकडे रवाना झाल्या आहेत, तर अत्यावश्‍यक सेवेसह दहा ते 15 टक्के ट्रकची चाके देशातील रस्त्यावरून धावताहेत. अशातच पानिपत ते ग्वाल्हेर या 400 किलोमीटरच्या प्रवासात ट्रकचालक पॉझिटिव्ह आढळल्याने ट्रान्स्पोर्ट उद्योगाची चिंता वाढली. 

वाहतुकीचा चक्का जाम

ऑल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष बलमलकित सिंह यांनी "पॅरा मस्डिकल स्टाफ'प्रमाणे चालकाचा पन्नास लाखांचा विमा उतरविण्यात यावा, दोनशे किलोमीटर अंतरावर ट्रकचे सॅनिटायझेशन करून चालकाची थर्मल स्क्रिनिंग करण्यात यावी, अशा विविध मागण्या केंद्रीय रस्ते वाहतूक सचिवांपर्यंत पोचविल्या होत्या. प्रत्यक्षात मात्र त्यावर अद्याप उपाययोजना झालेल्या नसल्याने वाहतुकीचा चक्का जाम स्थितीत असल्याची माहिती श्री. सिंह यांनी दिली. वाहतूक सुरळीत करत असताना कोरोनाबाधित चालक होण्याची भीती वाटत होती; ही भीती पानिपत ते ग्वाल्हेरच्या प्रवासात पॉझिटिव्ह आढळलेल्या चालकामुळे खरी ठरल्याचे श्री. सिंह यांनी म्हटले आहे. 

मालवाहतूक सुरळीत करणे जिकीरीचे 

श्री. सिंह म्हणाले, की उद्योग-व्यवसाय सुरू करण्यासाठी शिथिलता देण्यात आली आहे. प्रत्यक्षात मात्र अटी-शर्तींमुळे कारखानदारीची चाके वेगाने धावतील, अशी स्थिती सध्या दिसत नाही. उद्योग सुरू होऊन उत्पादन झाल्यावर त्याची वाहतूक होणार आहे. अशातच देशामध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढते आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक सुरू होण्याची चिन्हे दिसत नाही. त्यामुळे गावाला गेलेले चालक पुन्हा कामावर कसे यायचे, हा प्रश्‍न आहे. त्याचबरोबर अजूनही जागेवर उभ्या असलेल्या ट्रकसोबत असलेले 15 टक्के चालक सार्वजनिक वाहतूक सुरू झाल्यावर गावाकडे जाण्याची शक्‍यता आहे. ही सारी परिस्थिती पाहिल्यावर मालवाहतूक सुरळीत करणे जिकीरीचे होणार आहे. 

 वाहतूकदारांची कार्यालये बंद 

ट्रक वाहतूक सुरळीत होण्यासाठी वाहतूकदारांची कार्यालये सुरू होणे आवश्‍यक आहे. पण सद्यःस्थितीत सार्वजनिक वाहतूक बंद असल्याने कार्यालयांमध्ये मनुष्यबळ कसे येणार, हा प्रश्‍न आहे. त्यामुळे अजूनही अनेक वाहतूकदारांची कार्यालये बंद आहेत. काही वाहतूकदार लेखाविषयक कामे करण्यासाठी कार्यालयांत येत आहेत.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com