अखंडित वीजपुरवठ्यासाठी राबताय शेकडो हात!...'वर्क फ्रॉम होम'साठी त्यांचाही हातभार

wireman.jpg
wireman.jpg

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरकारने लॉकडाउन घोषित केल्याने सर्वांनाच घरात राहावे लागत आहे. अशावेळी सर्वच घरी बसून असताना अखंडित वीजपुरवठा मिळावा, यासाठी महावितरणचे हजारो हात न डगमगता राबत आहेत. वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यापासून ते वीजबिल वाटप करण्यापर्यंत सर्वच कामे अगदी चोख करण्यात येत आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अनेक खासगी कंपन्या तसेच सरकारी आस्थापनांतील कर्मचाऱ्यांना घरी बसून "वर्क फ्रॉम होम' करण्याच्या सूचना आहेत. महावितरणच्या स्थानिक पातळीवर अधिकाऱ्यांनी प्रभावी नियोजन केल्याने आणि क्षेत्रीय अभियंते, तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे वीजपुरवठा सुरळीत ठेवणे महावितरणला शक्‍य झाले आहे. 

नागरिक घराबाहेर पडू नये म्हणून रात्रंदिवस काम

वीज ही अत्यावश्‍यक बाब असल्याने तिचा अखंडित पुरवठा ठेवण्यासाठी महावितरणने आपल्या कार्यप्रणालीत महत्त्वाचे बदल केले आहेत. लॉकडाउन घोषित करण्यात आले, त्या दिवसांपासून राज्यात विजेची मागणी तशी घटलीय. कारण शेकडो कंपन्या आणि सरकारी आस्थापना बंद आहेत. मात्र दुसरीकडे या सर्व कार्यालयांतील लाखो कर्मचारी, कामगार, नागरिक घरी आहेत आणि त्यामुळे घरगुती विजेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे, अशी परिस्थिती निर्माण होईल याची जाणीव असलेल्या महावितरणने कुठेही वीज खंडित होऊ नये, यासाठी आधीपासूनच दक्षता घेतली. जिल्ह्यात दोन हजार 200 प्रकाशदूत तैनात आहेत. तर 600 यंत्रचालक (ऑपरेटर) 24 तास काम करत आहेत. वीजपुरवठा खंडित झाल्यास नागरिक घराबाहेर पडतील, यासाठी हे कर्मचारी रात्रंदिवस काम करत आहेत. 

अशी घेत आहेत काळजी 

कर्मचाऱ्यांकडून सॅनिटायझर, मास्कचा वापर करूनच कामे केली जात आहेत. नाशिक जिल्ह्यातील वीजपुरवठा खंडित होऊ नये, यासाठी कर्मचारी 24 तास काम करत आहेत. कुठे काही अडचण आल्यास किंवा वीज खंडित झाली तर कर्मचारी कार्यतत्परता राखत त्वरित समस्यांचे निवारण करत आहेत. काम करताना सामाजिक अंतर राखले जात आहे. महावितरणने लघुदाब वीजग्राहकांना 'ऑनलाइन' बिल भरण्यासाठी www.mahadiscom.in ही वेबसाईट व मोबाईलची सेवा उपलब्ध केली आहे. चालू व मागील वीजबिल पाहणे आणि त्याचा ऑनलाइन भरणा करण्यासाठी नेटबॅकींग, क्रेडिट/डेबीट कार्डासह मोबाईल व कॅश कार्डसचा पर्याय उपलब्ध केला आहे. 

नागरिकांना घरात ठेवण्यासाठी 24 तास वीजपुरवठा सुरळीत ठेवणे गरजेचे आहे. संचारबंदी असल्याने नागरिकांना घरात टीव्ही, फॅन, मोबाइल चार्जर, वीज गरजेची आहे. यासाठी वायरमनपासून तर अभियंत्यांपर्यंत सर्वच तत्परतेने 24 तास काम करत आहेत. तसेच नागरिकांना वीजबिलदेखील ऑनलाइन भरण्याची सोय करून देण्यात आली आहे. - विकास आडे, जनसंपर्क अधिकारी, महावितरण नाशिक परिमंडळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com