पुन्हा कोरोना रिपोर्टचा गोंधळ आणि पुन्हा तोच मनस्ताप; आठवडा उलटूनही संभ्रमावस्‍था

अरुण मलाणी
Tuesday, 29 September 2020

कोरोनासदृश लक्षणे दिसू लागल्‍याने बागलाण तालुक्‍यातील महिलेला जिल्‍हा रुग्णालयात दाखल केले होते. एक आठवडाभरात रुग्णालयातील कारभार, कोरोनाविषयक रिपोर्टचा गोंधळ यामुळे महिला रुग्णासह नातेवाइकांना मनस्‍तापाला सामोरे जावे लागले आहे.

नाशिक : कोरोनासदृश लक्षणे दिसू लागल्‍याने बागलाण तालुक्‍यातील महिलेला जिल्‍हा रुग्णालयात दाखल केले होते. एक आठवडाभरात रुग्णालयातील कारभार, कोरोनाविषयक रिपोर्टचा गोंधळ यामुळे महिला रुग्णासह नातेवाइकांना मनस्‍तापाला सामोरे जावे लागले आहे. शुक्रवारी (ता.१८) या संदर्भात जिल्‍हा प्रशासनाकडे दाद मागायला पोचलेल्‍या रुग्णाच्या नातेवाइकांना न्‍याय मिळालाच नाही. परंतु उलट पोलिस ठाण्यात बसून सायंकाळ काढावी लागली. 

आठवडा उलटूनही संभ्रमावस्‍था, जिल्‍हा रुग्णालयातील अजब प्रकार 
मयूर अलई यांनी सांगितले, की नामपूर (ता. बागलाण) येथील महिला रुग्णाला ९ सप्‍टेंबरला रुग्णवाहिकेतून जिल्‍हा रुग्णालयात आणण्यात आले. बऱ्याच प्रतीक्षेनंतर तिला दाखल केले गेले. रुग्णालयात व्‍यवस्‍था नसल्‍याने नातेवाइकांमार्फत जेवणाची सुविधा करण्यात आली. आठ दिवसांहून अधिक काळ उलटला असताना, रुग्ण महिलेचा मुलगा चेतन अलई आईच्‍या डिस्‍चार्जची चर्चा करण्यासाठी गेला असता, रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह असल्‍याने, घरी नेण्याचा सल्‍ला संबंधित परिचारिकेने दिला. तर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी डॉ. धूम यांच्‍याकडे गेलो असता, स्‍वॅबचा अहवाल आला नसून, तुम्‍ही तुमच्‍या जबाबदारीवर रुग्णाला घरी नेऊ शकतात, असा अजब खुलासा त्यांनी केला. ही गोष्ट ऐकल्‍यानंतर अलई यांच्‍यासह नातेवाईक सुन्न झाले. आठवडाभराचा कालावधी उलटूनही अहवाल प्राप्त न झाल्‍याचा अजब प्रकार घडल्‍याचे सांगण्यात आले.

हेही वाचा >  मुख्यमंत्र्यांना दिली चक्क खोटी माहिती; जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

कोरोना रिपोर्टचा गोंधळ अन्‌ रुग्णासह नातेवाइकांचा मनस्‍ताप 

या संदर्भात चेतन व मयूर अलई जिल्‍हाधिकारी कार्यालयात पोचले. निवासी उपजिल्‍हाधिकारी यांची भेट घेत घडलेला प्रकार सांगण्याचा प्रयत्‍न केला. परंतु तेथे त्‍यांची आपबीती ऐकण्याऐवजी गैरवर्तणूक करण्यात आल्‍याचा आरोप श्री. अलई यांनी केला. न्‍याय मिळत नसल्‍याने कार्यालयात उपोषणास बसत असताना, सरकारवाडा पोलिसांना पाचारण करण्यात आले. यातून अलई यांना सायंकाळ पोलिस ठाण्यात बसून काढावी लागली. मात्र जिल्‍हा रुग्णालय व प्रशासनाच्‍या कारभाराविषयी अत्‍यंत निराशाजनक अनुभव असल्‍याचे त्‍यांनी या वेळी सांगितले. 

हेही वाचा > 'रेमडेसिव्हिर'च्या काळ्या बाजाराला जिल्हाधिकाऱ्यांकडून चाप; मेडिकलबाहेर फलक लावण्याचे निर्देश

संबंधितांची जिल्हा रुग्णालयाविषयी तक्रार होती. त्वरित जिल्हा रुग्णालयात दूरध्वनी केला. डॉक्टरांची बैठक सुरू असल्याने तेथील श्री. गांगुर्डे यांच्याशी चर्चा केली. मी संबंधितांशी बोललो आहे. आपण जिल्हा रुग्णालयात जा, इतके स्पष्ट सांगितले तरीही आम्हाला जिल्हा रुग्णालयात जायचं नाही, त्यांच्या विरोधात इथंच उपोषणाला बसणार, अशी भूमिका घेतली. कुणी जर आंदोलनच करायचे असे ठरवून आले असेल, तर काय करणार? - भागवत डोईफोडे, निवासी उपजिल्हाधिकारी  
 

 संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Confusion of Corona Report nashik marathi news