शहर व तालुका आपले कुटुंब समजून आरोग्यसेवकांना सहकार्य करा - दादा भुसे 

प्रमोद सावंत
Saturday, 19 September 2020

शहर व तालुका आपले कुटुंब आहे, असे समजून सर्वपक्षीय, सर्वधर्मीय, सेवाभावी संस्था, संघटना व नागरिकांनी या मोहिमेस व घरोघरी सर्वेक्षणासाठी येणाऱ्या आरोग्यसेवकांना सहकार्य करावे, असे आवाहन कृषिमंत्री दादा भुसे, महापौर ताहेरा शेख यांनी शुक्रवारी (ता. १८) येथील पत्रकार परिषदेत केले. 

नाशिक / मालेगाव : शहर व तालुक्यात १६ सप्टेंबरपासून ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहीम सुरू झाली आहे. मोहिमेच्या माध्यमातून कोरोना संसर्गाचा अटकाव व रुग्णांचा शोध घेणे सुलभ होईल. शहर व तालुका आपले कुटुंब आहे, असे समजून सर्वपक्षीय, सर्वधर्मीय, सेवाभावी संस्था, संघटना व नागरिकांनी या मोहिमेस व घरोघरी सर्वेक्षणासाठी येणाऱ्या आरोग्यसेवकांना सहकार्य करावे, असे आवाहन कृषिमंत्री दादा भुसे, महापौर ताहेरा शेख यांनी शुक्रवारी (ता. १८) येथील पत्रकार परिषदेत केले. 

दादा भुसे : ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहीम मालेगावात सुरू 
शासकीय विश्रामगृह व महापालिका सभागृहात पत्रकार परिषद झाली. या वेळी प्रांताधिकारी विजयानंद शर्मा, तहसीलदार चंद्रजित राजपूत, उपायुक्त नितीन कापडणीस, रोहिदास दोरकुळकर, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. सपना ठाकरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शैलेश निकम, गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे आदी उपस्थित होते. श्री. भुसे म्हणाले, की कोविडबाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यासाठी ट्रेस, ट्रॅक, ट्रीटमेंट या त्रिसूत्रीचा वापर करून प्रादुर्भाव रोखतानाच मृत्युदर कमी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्यात ही मोहीम राबवित आहोत. 

हेही वाचा > मनाला चटका लावणारी बातमी : मुलाचा विरह अन् आई-वडिलांसह तिघांची निघाली अंत्ययात्रा; परिसरात हळहळ

आरोग्यसेवकांना सहकार्य करावे 
मालेगाव शहरासाठी ३४१ पथक असतील, तर तालुक्यातील १४१ गावांसाठी १६८ पथक असतील. प्रत्येक पथकात शिक्षक, आरोग्यसेवक-सेविका, आशा वर्कर्स, कर्मचारी अशा चौघांच्या मदतीला स्थानिक स्वयंसेवक असतील. हे पथक घरोघरी सर्वेक्षण करेल. पथकाला थर्मामीटर, ऑक्सिमीटरसह सर्व साहित्य पुरविले आहे. शहरातील साडेसहा लाख लोकसंख्येतील एक लाख दहा हजार ४८९ कुटुंबांची ३४१ पथकांमार्फत तपासणी होईल. एक पथक रोज ६५ ते ७५ घरांना भेटी देऊन तपासणी, सर्वेक्षण व जनजागृती करेल. लक्षणे आढळणाऱ्या नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्र, नागरी केंद्रात दाखल करण्यात येईल.

हेही वाचा > थरारक दृश्य! नदीच्या पूरात वाहून गेली कार; अतिघाईच्या नादात घडला थरार; पाहा VIDEO

दहा पथकांमागे एक डॉक्टर उपचार व संदर्भसेवा देईल. 
दोन टप्प्यांत ही मोहीम राबविणार असून, हे पथक सर्वेक्षणादरम्यान मधुमेह, हृदयविकार, किडनी आजार, लठ्ठपणा असणाऱ्यांनी घ्यावयाची काळजी व तापमान मोजण्यासंदर्भात सल्लाही देईल. डॉ. ठाकरे, डॉ. निकम यांनी शहर व तालुक्यातील सद्यःस्थितीचा आढावा दिला. या वेळी पंचायत समितीचे माजी सभापती शशिकांत निकम, जनसंपर्क अधिकारी दत्तात्रेय काथेपुरी उपस्थित होते. 

 

येथील सामान्य रुग्णालयात सीटी स्कॅन यंत्र कार्यान्वित झाले आहे. शहर व तालुक्यासाठी एकच स्वॅब सेंटर होते. ग्रामीण भागातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता आठवड्यापूर्वी दाभाडी येथेही स्वॅब तपासणी सेंटर सुरू केले आहे. तपासणीसाठी ॲन्टिजेन किट व अन्य साहित्यांची कमतरता भासू नये, याची दक्षता संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी. रुग्णांनी सामान्य रुग्णालयात सीटी स्कॅन करावे. खासगी डॉक्टरांनी माफक व निर्धारित दर आकारावेत. - दादा भुसे, कृषिमंत्री  

संपादन - ज्योती देवरे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cooperate with the health workers said by dada bhuse