कोरोनामुळे यंदा विद्यार्थ्यांना एकच गणवेश! जिल्ह्यात सात कोटी २५ लाखांची बचत  

प्रशांत बैरागी
Friday, 25 December 2020

कोरोनामुळे देशाची ढासळलेली अर्थव्यवस्था लक्षात घेता यंदा केंद्र शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या समग्र शिक्षा अभियानाच्या मोफत गणवेशवाटप योजनेत ५० टक्के कपात करण्यात आली आहे.

नामपूर (जि.नाशिक) : शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेशवाटप करून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याची शिक्षण विभागाची परंपरा आहे. परंतु यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शैक्षणिक वर्षाच्या अंतिम टप्प्यात विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार आहेत. कोरोनामुळे देशाची ढासळलेली अर्थव्यवस्था लक्षात घेता यंदा केंद्र शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या समग्र शिक्षा अभियानाच्या मोफत गणवेशवाटप योजनेत ५० टक्के कपात करण्यात आली आहे. त्यामुळे यंदा जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या सुमारे अडीच लाख विद्यार्थ्यांना एकच गणवेश मिळणार आहे. शासनाच्या काटकसरीच्या धोरणामुळे नाशिक जिल्ह्यात सात कोटी २५ लाखांची बचत होणार आहे. 

नाशिक जिल्ह्यात सात कोटी २५ लाखांची बचत 

समग्र शिक्षा अभियानांतर्गत राज्यातील शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पहिली ते आठवीच्या ३६ लाख ३२ हजार २८१ विद्यार्थ्यांना गणवेशवाटप करण्याची शासनाची योजना होती. यासाठी केंद्र शासनाकडून २१८ कोटींचा निधीही मंजूर झाला होता. परंतु नेमके घोडे कुठे अडले, याबाबत पालकांकडून प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याबाबत राज्यातील विविध प्राथमिक शिक्षक संघटना, पालक संघटना, आदिवासी भागातील पालकांनी आवाज उठविल्यानंतर शासनाने गणवेश योजनेसाठी आर्थिक तरतूद केली आहे. 

गणवेश पुरवठ्याबाबत सर्व अधिकार शाळा व्यवस्थापन समितीला
गटशिक्षणाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांना गणवेश योजनेची अंलबजावणी करण्यासंदर्भात सूचना द्याव्यात. शाळा स्तरावर अनुदान मिळाल्यानंतर १५ दिवसांत उपयोगिता प्रमाणपत्र सादर करावे. गणवेश पुरवठ्याबाबत सर्व अधिकार शाळा व्यवस्थापन समितीला देण्यात आले आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याला एका गणवेशासाठी तीनशे रुपये अनुदान मिळेल. गणवेश योजनेपासून एकही लाभार्थी वंचित राहू नये, याची खबरदारी शाळा व्यवस्थापनाने घ्यावी. - राजीव म्हसकर, शिक्षणाधिकारी, प्राथमिक, जिल्हा परिषद, नाशिक 

हेही वाचा - वडिलांसोबतची लेकीची 'ती' ड्राईव्ह शेवटचीच; पित्याचा ह्रदय पिळवटून टाकणारा आक्रोश  

@ अशी आहे योजना 
* गणवेश खरेदीचे अनुदान जिल्हास्तरावरून थेट शाळा व्यवस्थापन समिती स्तरावर 
* शालेय गणवेशाचा रंग, प्रकार, याबाबत शाळा व्यवस्थापन समिती घेणार निर्णय 
* गणवेशाबाबत राज्य, जिल्हा, तालुकास्तरावर कोणत्याही स्थितीत निर्णयाला प्रतिबंध 
* उत्तम दर्जाचे गणवेश विद्यार्थ्यांना द्यावे लागणार 
* मंजूर तरतुदीपेक्षा अधिकचा खर्च होणार नाही, याची दक्षताही शाळांना घ्यावी लागणार 
* शाळा स्तरावरील स्टॉक रजिस्टरमध्ये गणवेशाबाबत सर्व नोंदी आवश्‍यक 

हेही वाचा - जेव्हा पोटच्या गोळ्यांसह मातेचे मृतदेह दिसले पाण्यावर तरंगताना; शेतकऱ्यांना भरला थरकाप

@ आकडे बोलतात..
तालुकानिहाय लाभार्थी व मंजूर अनुदान असे 
* बागलाण १८५९० ५५, ७७, ००० 
* चांदवड ११४२७ ३४,२८,१०० 
* देवळा ७६८७ २३,०६,१०० 
* दिंडोरी २३२०१ ६९,६०,३०० 
* इगतपुरी १८८६६ ५६,५९,८०० 
* कळवण १३८४५ ४१,५३,५०० 
* मालेगाव २५७२१ ७७,१६,३०० 
* नांदगाव १५३२४ ४५,९७,२०० 
* नाशिक १३००१ ३९,००,३०० 
* निफाड २०८९९ ६२,६९,७०० 
* पेठ १३२०१ ३९,६०,३०० 
* सिन्नर १४३७० ४३,११,००० 
* सुरगाणा १६२६४ ४८,७९,२०० 
* त्र्यंबकेश्वर १६००३ ४८,९०,९०० 
* येवला १३५४२ ४०,६२,६०० 

* एकूण लाभार्थी : दोन लाख ४१ हजार ९४१ 
* एकूण अनुदान : सात कोटी २५ लाख ८२ हजार ३००  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona has given students a single uniform this year nashik marathi news