नाशिकमधील कोरोना टेस्टिंग लॅब पुन्हा बंद...अडथळ्यांचे कारण खाजगी लॅब तर नाही?

corona test 1_1.jpg
corona test 1_1.jpg

नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात सुरु करण्यात आलेली कोरोना टेस्टिंग लॅब सुरु ठेवण्यात राज्य सरकारला अपयश आले आहे. लॅबला साहित्याचा पुरवठा कमी पडू दिला जाणार नाही या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आश्‍वासना ला यंत्रणांनी हरताळ फासला आहे. त्यामुळे कोरोना टेस्टिंगच्या खासगी करणाकडे ओढा वाढत चाललाय आहे काय? असा प्रश्‍न जिल्हावासिय उपस्थित करत आहेत. 

आरोग्य मंत्र्यांच्या आश्‍वासनाला यंत्रणांकडून हरताळ 

नाशिक आणि मालेगावमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली होती. मात्र कधी धुळे, तर कधी पुण्याहून "टेस्टिंग रिपोर्ट' येण्यास विलंब होत असल्याने नाशिकमध्ये लॅब सुरु व्हावी अशी मागणी पुढे आली होती. पण गम्मत म्हणजे, खासगी लॅब सुरु करण्यासाठी धडपड सुरु झाली होती. डॉ. पवार महाविद्यालयातील टेस्टिंग लॅबला मिळालेल्या मान्यतेनंतर त्याच्या श्रेयासाठी झालेल्या प्रयत्नांतून ही धडपड लपून राहिली नाही. मात्र नाशिककरांसाठी लॅब मिळाली आहे म्हटल्यावर कुणीही त्यावर प्रतिक्रिया नोंदवली नाही. मात्र ही लॅब सलग आठवडाभर सुरळीत चालेल याची काळजी यंत्रणांनी घेतल्याचे चित्र पाहावयास मिळत नाही. मध्यंतरी लॅबसाठी साहित्य देण्यास होण्यास विलंब होत असल्याची बोंब राज्यस्तरापर्यंत पोचली आणि वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी व्हिडीओ कॉन्फन्सिंगमधून जिल्हा शल्यचिकित्सिक डॉ. सुरेश जगदाळे यांना महाविद्यालयात पाठवले. डॉ. जगदाळे यांनी दिलेल्या शब्दानुसार त्यावेळी साहित्य दुसऱ्या पोचले. 

नमुने गेले धुळ्याला 

कोरोना टेस्टिंग लॅबसाठी पुरेसे साहित्य उपलब्ध होत नाही ही बाब श्री. टोपे हे नाशिकच्या दौऱ्यावर आल्यावर त्यांच्यापर्यंत पोचली होती. त्याबद्दलची दखल घेण्यात येत असल्याचे श्री. टोपे यांनी जाहीर केले. मात्र साहित्य काही केल्या पोचले नसल्याने लॅब शुक्रवारपासून (ता. 22) बंद आहे. नियोजना नुसार हे साहित्य काल (ता. 23) पोचणार होते. मात्र कंपनीकडून साहित्य उपलब्ध झाले नसल्याचे सांगण्यात आले. स्वॅबमधील स्त्राव शोषून तपासणीसाठी नमुने तयार ठेवण्यात आले होते. पण त्यासाठी साहित्य नसल्याने हे नमुने तपासणीसाठी धुळ्याला पाठवण्यात आले आहेत. 

पाठशिवणीच्या खेळात नाशिककरांची फरफट

शब्दांचे बुडबुडे आणि पाठशिवणीच्या खेळात नाशिककरांची फरफट चालल्याचे चित्र पुढे आले आहे. यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार मालेगावचे स्वॅब धुळ्याला तपासणीसाठी पाठवले जातात. नाशिक महापालिकेने खासगीतून स्वॅब तपासणीची तयारी केली आहे. अशा परिस्थितीत जिल्हा सरकारी रुग्णालय आणि ग्रामीण भागातील स्वॅब तपासणीचे काम नाशिकच्या डॉ. पवार रुग्णालयातील लॅबसाठी उरले आहे. अगदी सुरवातीच्या काळात लॅबमधील काम कसे अकार्यक्षम आहे याची बोंब राज्यस्तरापर्यंत पोचवण्यात आली होती. प्रत्यक्षात सचिवांनी घेतलेल्या माहितीत लॅबला साहित्य पुरवले जात नसल्याची बाब उघड झाली. मग आता काय करायचे म्हणून लॅब बंद पाडून खासगी लॅबचा मार्ग मोकळा करण्यासाठी साहित्याच्या विलंबाचा खो-खो खेळला जात असल्याची भावना जिल्हावासियांमध्ये तयार झाली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com