esakal | "मी कोरोनामुक्त झालो असलो.. तरी मला याचे विशेष समाधान नाही, कारण..."
sakal

बोलून बातमी शोधा

trimbk kasar collector corona.jpg

"डॉक्‍टर, नर्सेस, पोलिस, आरोग्य व स्वच्छता कर्मचाऱ्यांसह आम्ही कितीही प्रामाणिकपणे व जीव धोक्‍यात घालून मेहनत घेतली तरी आपल्या सहकार्याशिवाय आपण कोरोनाला हद्दपार करू शकणार नाही. 
कोरोनाविरुद्धच्या लढाईच यश-अपयश आपल्या मदतीवर अवलंबून आहे."

"मी कोरोनामुक्त झालो असलो.. तरी मला याचे विशेष समाधान नाही, कारण..."

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक / मालेगाव : महापालिका आयुक्त त्र्यंबक कासार दहा दिवसांनंतर कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांचा दुसरा कोरोना चाचणी अहवाल शुक्रवारी (ता. 22) निगेटिव्ह आला. कासार (ता.13) मेस आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आढावा बैठकीत असतानाच त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यानंतर ते बैठक सोडून बाहेर पडले होते. आयुक्तांनी दहा दिवस होम आयसोलेशन असताना घरून कामकाज पाहिले. सूर्यनमस्कार, योगा, प्राणायाम करत, सकारात्मक विचार व कामकाज करून त्यांनी कोरोनाला परतवून लावल्याचे सांगितले. यावर त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले आहे.

काय म्हणताएत मनोगतात आय़ुक्त...

कोरोनाशी लढताना... 

प्रिय मालेगावकरांनो, 
आपण सगळे जण सध्या कोरोनासारख्या महामारीतून जातो आहोत. कोरोनावर अद्याप लस सापडली नाही. त्यामुळे सध्यातरी त्यासाठी घेण्यात येणारी काळजी हाच त्यावरील प्रभावी उपाय आहे. गेल्या आठवड्यात मला कोरोनाचा संसर्ग झाला. त्यानंतरच्या माझ्या दोन्ही टेस्ट निगेटिव्ह आल्या. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा व आशीर्वादाने मी कोरोनाला पराजित करू शकलो आहे. यासाठी काटेकोरपणे क्वारंटाइनचे पालन, योग्य आहार, पुरेसा व्यायाम, काही औषधे व सकारात्मक विचार ही पंचसूत्री मी अवलंबली. या काळात मला कुटुंबाने, वरिष्ठांनी, मित्रांनी व मालेगावकरांनी धीर दिला हेसुद्धा माझ्यासाठी मोठे औषधच ठरले. 


मी बरा झालो असलो तरी मला याचे विशेष समाधान नाही, कारण जेव्हा संपूर्ण मालेगाव कोरोनामुक्त होईल त्या दिवशी मला अत्यानंद झालेला असेल. शहरात कोरोनाने उच्छाद मांडला आहे. मला वाटते आपण सर्वांनी माझ्याप्रमाणे सर्व नियमांचे पालन केले, पुरेशी काळजी घेतली तर आपण सगळे जण शंभर टक्के या आजारावर मात करू. या आजाराचा संसर्ग टाळू शकू. आपण जर पुरेशी काळजी घेतली नाही तर आपली बेफिकिरी आपल्या, कुटुंबाच्या, जवळील मित्रांच्या, शेजाऱ्याच्या जिवावर बेतू शकते. जे आपले जीव की प्राण आहेत, ज्यांच्यासाठी आपण कष्ट करतो अशा जिवाभावाच्या माणसांच्या चेहऱ्यावर आनंद बघण्यासाठी आपल्या सगळ्यांना काही दिवस काळजी घ्यावीच लागणार आहे. आजार झाल्यावर होणारा त्रास व संभाव्य धोक्‍यापेक्षा काळजी घेणे अगदीच सोपे आहे. 

हेही वाचा > धक्कादायक.."इथं पोलीसाच्या पत्नीलाच मिळेना न्याय; तिथं तुमची आमची बात काय?" पोलिस ठाण्यात कुजबुज


डॉक्‍टर, नर्सेस, पोलिस, आरोग्य व स्वच्छता कर्मचाऱ्यांसह आम्ही कितीही प्रामाणिकपणे व जीव धोक्‍यात घालून मेहनत घेतली तरी आपल्या सहकार्याशिवाय आपण कोरोनाला हद्दपार करू शकणार नाही. 
कोरोनाविरुद्धच्या लढाईच यश-अपयश आपल्या मदतीवर अवलंबून आहे. मालेगाव ही श्रमिकांची, कष्टकऱ्यांची, शेतकऱ्यांची व उद्योजकांची भूमी आहे. आपण सर्वांनी जर एकदिलाने या कोरोनाची हकालपट्टी करण्याचा निर्धार केला, प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन केले, योग्य ती काळजी घेतली तर येत्या काही दिवसांत आपले मालेगाव पूर्वपदावर आलेले असेल याचा विश्‍वास बाळगा. आता या क्षणापासूनच आपण कोरोनाला पळवून लावण्यासाठी कटिबद्ध होऊ या. 

हेही बघा > VIDEO : जेव्हा आर्मीचे अधिकारी करतात पोलीसांचे कौतुक...म्हणतात....व्हिडिओ होतोय व्हायरल


 

go to top