जिल्ह्यात बाह्यरुग्ण विभागात घेतला जाणार स्वॅब; शिक्षकांनंतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोनाविषयक चाचणी 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 23 December 2020

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवीन विषाणूचा संसर्ग वाढल्याच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांशी संवाद साधत चाचण्या वाढविण्याची सूचना केली. त्यास प्रतिसाद म्हणून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात रुग्णांचा स्वॅब घेण्यात येणार आहे.

नाशिक : ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवीन विषाणूचा संसर्ग वाढल्याच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांशी संवाद साधत चाचण्या वाढविण्याची सूचना केली. त्यास प्रतिसाद म्हणून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात रुग्णांचा स्वॅब घेण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये ही सूचना आज वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. 

जिल्ह्यात बाह्यरुग्ण विभागात घेतला जाणार स्वॅब 
थंडी वाढताच सर्दी-खोकला-तापाचे रुग्ण वाढले आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयात या आजाराचे उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या दहा ते वीस टक्क्यांनी वाढली आहे. पण, आतापर्यंत बाह्यरुग्ण विभागात तपासणी केल्यानंतर रुग्णांना चाचणीसाठी कोरोना केअर सेंटर अथवा कोरोना डेडिकेटेड रुग्णालयात पाठवले जायचे. बहुतांश जण ही चाचणी करून घेत नसल्याने जिल्ह्यातील कोरोना विषाणू चाचणीचे प्रमाण २५० पर्यंत कमी झाले आहे. यापूर्वी दिवसाला दोन हजार चाचण्या करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. प्रत्यक्षात तेवढ्या चाचण्या होत नसल्याने आता बाह्यरुग्ण विभागात स्वॅब घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. कपिल आहेर यांनी दिली.

हेही वाचा >> डॉक्टरांचे ऐकले असते तर आज 'त्यांचे' प्राण वाचले असते! परिसरात हळहळ

शिक्षकांनंतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोनाविषयक चाचणी 

ॲन्टिजेन टेस्टसाठी २५ हजार आणि स्वॅबसाठी १५ हजार किट उपलब्ध आहेत. शिवाय जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेने दिलेल्या मान्यतेनुसार चाचण्यांचे किट खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. हे एकीकडे होत असताना ४ जानेवारी २०२१ पासून जिल्ह्यातील नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्याअनुषंगाने प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयात जिल्ह्यातील या वर्गांच्या शिक्षकांच्या आणि त्यानंतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या चाचणी करण्याच्या सूचना आजच देण्यात आली आहे. 

हेही वाचा >> पित्याच्या सांगण्यावरून अखेर घटनेचा ११२ दिवसांनी उलगडा; धक्कादायक माहिती समोर
सात हजार ७३६ शिक्षकांची चाचणी होणार 

जिल्ह्यातील भाषा, गणित, विज्ञान, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र आणि इंग्रजी विषयाच्या एकूण सात हजार ७३६ शिक्षकांची कोरोनाविषयक चाचणी केली जाणार आहे. त्यात माध्यमिकच्या पाच हजार ७९३ आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या एक हजार ९४३ शिक्षकांचा समावेश आहे. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्याच्या सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. 

हेही वाचा >> डॉक्टरांचे ऐकले असते तर आज 'त्यांचे' प्राण वाचले असते! परिसरात हळहळ

गावांना घ्यावी लागणार कठोर भूमिका 
मुख्यमंत्र्यांनी मास्क वापरणे बंधनकारक करावे, वेळप्रसंगी दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सूचनेचे पालन करण्यासाठी गावांना कठोर भूमिका घ्यावी लागणार आहे. यापूर्वी लोकप्रतिनिधींच्या सहभागातून कोरोना विषाणू संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी ग्रामपंचायतीतर्फे प्रयत्न करण्यात आले होते. त्याची पुनर्रावृत्ती जिल्ह्यात होणे आता आवश्‍यक बनले आहे. ग्रामपंचायतींच्या निवडणुका सुरू असलेल्या गावांमध्ये प्रशासकांना राजकीय धुलवडीत महत्त्वाची भूमिका बजवावी लागणार आहे. 

हेही वाचा >> पित्याच्या सांगण्यावरून अखेर घटनेचा ११२ दिवसांनी उलगडा; धक्कादायक माहिती समोर

दहा अंश सेल्सिअसचा अंदाज 
हवामान विभागाने बुधवार (ता. २३)पासून रविवार (ता. २७)पर्यंत आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता वर्तविली आहे. तसेच बुधवारी (ता. २३) आणि गुरुवारी (ता. २४) व शनिवारी (ता. २६), रविवारी (ता. २७) किमान तापमान दहा अंश सेल्सिअस, तर शुक्रवारी (ता. २५) ११ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज विभागाचा आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona testing of non teaching staff after teachers nashik marathi news