esakal | नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे उच्चांकी बळी; ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णांत मात्र ३७८ची घट 

बोलून बातमी शोधा

Corona Updates 38 patients died in Nashik District Marathi News

जिल्ह्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्‍यूंचे प्रमाण आटोक्‍याबाहेर जात आहे. सोमवारी (ता. १२) दिवसभरात ३८ बाधितांचा मृत्‍यू झाला. एकाच दिवशी कोरोनामुळे झालेल्या मृत्‍यूंची ही सर्वाधिक संख्या ठरली आहे.

नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे उच्चांकी बळी; ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णांत मात्र ३७८ची घट 

sakal_logo
By
अरुण मलाणी

नाशिक : जिल्ह्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्‍यूंचे प्रमाण आटोक्‍याबाहेर जात आहे. सोमवारी (ता. १२) दिवसभरात ३८ बाधितांचा मृत्‍यू झाला. एकाच दिवशी कोरोनामुळे झालेल्या मृत्‍यूंची ही सर्वाधिक संख्या ठरली आहे. दिवसभरात जिल्ह्यातील तीन हजार ५८८ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत. बरे झालेल्‍या रुग्‍णांची संख्या अधिक असल्‍याने ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णसंख्येत मात्र ३७८ने घट झाली आहे. सद्यःस्‍थितीत जिल्ह्यात ३६ हजार ६४२ बाधितांवर उपचार सुरु आहेत. 

सोमवारी झालेल्‍या ३८ मृत्‍यूंमध्ये सर्वाधिक २२ नाशिकच्या ग्रामीण भागातील आहेत. नाशिक महापालिका क्षेत्रातील १३, तर मालेगावच्‍या दोन व जिल्‍हा बाहेरील एका बाधिताचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला आहे. नाशिक ग्रामीणमध्ये बागलाण, निफाड व मालेगाव तालुक्‍यातील प्रत्‍येकी तीन, नाशिक तालुक्‍यासह चांदवड, सिन्नर येथील प्रत्‍येकी दोन व नांदगाव, येवला, इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वर व दिंडोरी तालुक्‍यातील प्रत्‍येकी एका बाधिताचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला. नाशिक महापालिका क्षेत्रात पंचवटी विभागातील विविध परिसरांत मृतांची संख्या अधिक आहे. दिवसभरात नाशिक शहरातील एक हजार ८८७, नाशिक ग्रामीणमधील एक हजार ५६८, मालेगाव मनपा क्षेत्रातील ९५ तर, अन्य जिल्ह्यांतील ३८ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. 
 
मृतांमध्ये दोन युवती, तीन युवक 

सोमवारी कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांमध्ये दोन युवती आणि तीन युवकांचा समावेश आहे. कळवण तालुक्‍यातील ३४ वर्षीय, तर दाभाडी (ता. मालेगाव) येथील ३७ वर्षीय युवती, तसेच गणेशनगर, सटाणा येथील २९ वर्षीय, मतेवाडी, चांदवड येथील ३५ वर्षीय व याच तालुक्‍यातील अन्‍य एका ३७ वर्षीय युवकाचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला आहे. 

हेही वाचा - सदैव हसतमुख 'मुस्कान' कायमची हिरावली; भावा पाठोपाठ बहिणीच्या मृत्यूने कुटुंबावर मोठा आघात

दहा हजाराहून अधिक अहवाल प्रलंबित 

दरम्यान, प्रलंबित अहवालांची संख्या दहा हजाराहून अधिक राहात आहे. सायंकाळी उशीरापर्यंत दहा हजार १४८ अहवाल प्रलंबित होते. यापैकी चार हजार ९४३ अहवाल नाशिक शहरातील, चार हजार ५८८ अहवाल नाशिक ग्रामीणमधील तर, मालेगावच्‍या ६१८ रुग्‍णांना अहवालाची प्रतिक्षा होती. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरात चार हजार ६७२ रुग्‍ण दाखल झाले आहेत. यापैकी नाशिक महापालिका क्षेत्रात चार हजार ३१६, जिल्‍हा रुग्‍णालयात अकरा, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात तीस रुग्‍ण दाखल झाले. नाशिक ग्रामीणमधील २६६, तर मालेगावमध्ये ४९ रुग्‍ण दाखल झाले आहेत.  

हेही वाचा - काळजी घ्या! नाशिकमध्ये रस्त्याने चालता-बोलता सहा जणांचा मृत्यू