पहिल्या टप्प्यात साठ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार - राधाकृष्ण गमे

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 16 January 2021

जागतिक पातळीवर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आज देशात सर्वत्र कोविड लसीकरण मोहीमेला सुरुवात झाली आहे. कोविड लढ्यातील हा अत्यंत ऐतिहासिक दिवस आहे. जिल्ह्यात 13 लसीकरण केंद्र निश्चित करण्यात आले असून या केंद्रांच्या माध्यमातून निवड करण्यात आलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यास सुरुवात झाली आहे.

नाशिक : जागतिक पातळीवर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आज देशात सर्वत्र कोविड लसीकरण मोहीमेला सुरुवात झाली आहे. कोविड लढ्यातील हा अत्यंत ऐतिहासिक दिवस आहे. जिल्ह्यात 13 लसीकरण केंद्र निश्चित करण्यात आले असून या केंद्रांच्या माध्यमातून निवड करण्यात आलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यास सुरुवात झाली आहे.

लसीकरण मोहिमेचा नाशिक विभागातील नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगांव आणि नंदुरबार जिल्ह्यात आज एकाचवेळी मोहिमेचा शुभारंभ झाला आहे. नाशिक विभागासाठी 1 लाख 32 हजार डोसेजेस प्राप्त झाले असून विभागात पहिल्या टप्प्यात साठ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार असल्याचे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगितले.

कुठलेही चिंतेचे कारण नाही...

विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे म्हणाले,  नाशिक विभागातील 40 केद्रांवर लसीकरणाची सर्व तयारी झाली असून लसीकरण मोहिमेची सुरवात झाली आहे. कोविड 19 लसीची कोणतेही विपरीत परिणाम होत नसल्याचे शासनाने जाहिर केले असल्याने कुठलेही चिंतेचे कारण नाही. लस दिल्यानंतर प्रत्येक कर्मचाऱ्याला अर्धा तास वेटींग रुम मध्ये थांबविण्यात येणार असून कुणाला लसीकरणाचा काही विपरीत परिणाम झाल्यास उपचारासाठी अत्यावश्यक कक्ष देखील प्रत्येक लसीकरण केंद्रात तयार करण्यात आला असल्याची माहिती, गमे यांनी यावेळी दिली.

हेही वाचा > लॉजमध्ये सापडला प्रेयसीचा मृतदेह अन् घाबरलेला प्रियकर; काय घडले चार भिंतीत?

 पहिला टप्पा आरोग्य कर्मचाऱ्यासाठी..

लसीकरण मोहिमेची सर्व तयारी आरोग्य प्रशासनाने पूर्ण केली असून त्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. तसेच शासनाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार प्रत्येक कर्मचाऱ्याचे लसीकरण होणार आहे. त्यामुळे लसीकरणासाठी येणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याची पूर्ण माहिती घेवूनच त्याचे लसीकरण करण्यात येणार आहे.  पहिला टप्पा आरोग्य कर्मचाऱ्यासाठी असून दुसऱ्या टप्प्यात पोलीस विभाग,महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय, नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या कोविड 19 लसीकरण मोहिमेचा शुभारंभ प्रसंगी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे बोलत होते.

हेही वाचा >  देवी भक्ताच्या बँक खात्यावरही पडली वाईट नजर; महाराष्ट्रात परतताच प्रकार उघडकीस

यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक दिपक पाण्डेय, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, आरोग्य उपसंचालक डॉ. पी.डी.गांडाळ, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीनिवास, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कपिल आहेर, डॉ.सुशील वाघचौरे, निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ.प्रशांत खैरे, लसीकरण नोडल अधिकारी डॉ.आर.जी.चौधरी, नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार उपस्थित होते. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona Vaccination of health workers started in Nashik Division marathi news