चिंताजनक! कोरोनाने घेतला पुन्हा पोलीसाचा बळी....सकाळच्या सत्रातच दोघांच्या मृत्युने एकच खळबळ

सकाळ वृत्तसेवा
Monday, 25 May 2020

बंदोबस्ताचा कालावधी आटोपल्यानंतर त्यांना आठवडाभर घरी सोडण्याऐवजी क्वारंटाईन करण्यात आले. यादरम्यान त्यांचा कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आलेला होता. त्यानंतर ते गेल्या आठवड्यात नाशिकमधील राहत्या घरी आले. मात्र चार दिवसांपूर्वी त्यांना ताप आणि श्‍वास घेण्यास त्रास होऊ लागला.

पोलिस हवालदारासह पंचवटीतील एकाचा मृत्यु 

नाशिक : मालेगाव पाठोपाठ आता नाशिक शहरात कोरोना विषाणूचा प्रसार वेगाने होतो आहे. तर, दुसरीकडे सोमवारी (ता. 25) सकाळच्या सत्रामध्येच दोघा कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

पोलिस बंदोबस्तातील बाधित पोलीस हवालदार

मालेगाव येथे पोलिस बंदोबस्तातील बाधित पोलिस हवालदाराचा मविप्रच्या आडगाव येथील वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झाला तर दुसरा 36 वर्षीय पंचवटीतील कोरोनाबाधित रुग्णाचा जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. यामुळे शहरात कोरोनाबाधितांचा बळींचा आकडा सहा झाला असून जिल्ह्यातील मृतांची संख्या 53वर पोहोचली आहे. तर जिल्ह्यातील दुसरा पोलिस कोरोनामुळे मृत्युमुखी पडला आहे. 

आठवडाभर घरी सोडण्याऐवजी क्वारंटाईन
नाशिक शहरात सोमवारी (ता. 25) सकाळी कोरोनाबाधित दोघांचा बळी गेला असून यात नाशिक ग्रामीण पोलिस दलातील हवालदाराचा समावेश आहे. नाशिक ग्रामीण पोलिस स्थानिक गुन्हेशाखेमध्ये कार्यरत पोलिस हवालदार दिलीप घुले यांना मालेगाव येथे पोलिस बंदोबस्त देण्यात आला होता. बंदोबस्ताचा कालावधी आटोपल्यानंतर त्यांना आठवडाभर घरी सोडण्याऐवजी क्वारंटाईन करण्यात आले. यादरम्यान त्यांचा कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आलेला होता. त्यानंतर ते गेल्या आठवड्यात नाशिकमधील राहत्या घरी आले. मात्र चार दिवसांपूर्वी त्यांना ताप आणि श्‍वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे ते डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयात भरती झाले. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. तर उपचारासाठी त्यांना मविप्रच्या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असता, सोमवारी (ता. 25) त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांचा कोरोनामुळे मृत्यु झाला. दिलीप घुले (50) हे मूळचे नायगाव (ता. सिन्नर) येथील रहिवाशी असून त्यांच्या मागे आई, पत्नी, दोन मुले, दोन भाऊ असा परिवार आहे. नाशिक ग्रामीण पोलिस दलातील घुले हे दुसरे पोलिस कर्मचारी आहेत, जे कोरोनाचे बळी ठरले आहेत. यापूर्वी हिरावाडीतील पोलिस हवालदाराही कोरोनामुळे मयत झाले आहेत. 

हेही वाचा > "रेड झोन' आला आडवा...विवाहितेचा मुलासह आत्महत्येचा निर्णय..त्यावर वडिलांची युक्ती सफल!

कोरोनाचा सहावा बळी
तर, पंचवटीच्या पेठरोड परिसरातील 36 वर्षीय इसम कोरोनाचा सहावा बळी ठरला आहे. गेल्या गुरुवारी (ता. 21) ते महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयात दाखल झाले असता, त्यांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह होता. तसेच, ते मधुमेहग्रस्त होते. दाकल झाल्यापासून त्यांना श्‍वसनाचा त्रास असल्याने त्यांना व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आलेले होते. परंतु त्यांची प्रकृती खालावल्याने अधिक उपचारासाठी त्यांना गेल्या रविवारी (ता.24) जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा सोमवारी (ता.25) सकाळी निधन झाले. 

हेही वाचा > CM आदित्यनाथ यांना धमकाविणाऱ्या आणखी एकाला नाशिकमधून अटक...एटीएसची मोठी कारवाई
 
कोरोनाबळींचा आकडा 53 
नाशिक शहरात उपचारादरम्यान गेल्या दोन दिवसात कोरोनामुळे चौघांचा मृत्यु झाला आहे. यात एक परजिल्ह्यातील वृद्धाचा समावेश आहे. सोमवारी (ता. 25) दोघांच्या बळीमुळे शहरातील कोरोनामुळे मृतांचा आकडा 6 झाला असून, जिल्ह्याचा आकडा 53 झाला आहे. तसेच, सोमवारी (ता. 25) सकाळी सिडकोच्या राणाप्रताप चौकातील दोघा कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. हे दोघे पूर्वीच्याच कोरोनाबाधितांच्या कुटूंबियांतील आहेत. त्यामुळे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 97 झाला आहे, तर जिल्ह्याचा आकडा 965 झाला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona virus affected police death again in nashik marathi news