शहर हादरून सोडल्यानंतर चोरपावलांनी 'त्याचा' गावात प्रवेश...अन् बघता बघता घातला घट्ट विळखा

सकाळ वृत्तसेवा 
Thursday, 21 May 2020

शहर हादरून सोडल्यानंतर त्याने चोरपावलांनी तालुक्‍याच्या ग्रामीण भागात प्रवेश केला आहे. सुरवातीला दाभाडी, नंतर चंदनपुरी व आता रावळगावात  पोचला आहे. हद्दवाढीत महापालिकेत समाविष्ट झालेल्या द्याने, सोयगाव या भागालाही विळखा घातला आहे.

नाशिक / मालेगाव : शहर हादरून सोडल्यानंतर कोरोनाने चोरपावलांनी तालुक्‍याच्या ग्रामीण भागात प्रवेश केला आहे. सुरवातीला दाभाडी, नंतर चंदनपुरी व आता रावळगावात कोरोना पोचला आहे. हद्दवाढीत महापालिकेत समाविष्ट झालेल्या द्याने, सोयगाव या भागालाही कोरोनाने विळखा घातला आहे. द्याने येथे 8 जण कोरोनाबाधित आढळून आले. 4 जण एकाच कुटुंबातील आहेत. शहरानजीकच्या भायगाव, वजीरखेडे, सायने, टेहेरे, मुंगसे, वडगाव आदी गावांनी काळजी घेण्याची गरज आहे. 

चोरपावलांनी ग्रामीण भागात प्रवेश 
शहराच्या चारही बाजूंना कोरोनाने घेरले आहे. सुरवातीला मुस्लिमबहुल असलेल्या पूर्व भागातच रुग्ण आढळून आले. त्यामुळे पश्‍चिम भाग निर्धास्त होता. गेल्या महिन्यात कोरोनाचा पश्‍चिम भागातही हळूहळू शिरकाव होत गेला. तीन दिवसांपासून पश्‍चिम भागातील रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णसंख्या वाढत असताना, रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे, ही समाधानाची बाब आहे. 

हेही वाचा > संशोधकांना सुखद धक्का! काळाराम मंदिरासमोर खोदकामात 'हे' काय आढळले?

शेतकऱ्यांसह सर्वांनाच सतर्कता बाळगावी
ग्रामीण भागात दाभाडीतून कोरोनाला सुरवात झाली. मात्र, दाभाडीकरांनी यशस्वी मात करत कोरोनावर विजय मिळविला. चंदनपुरीचे तीन रुग्ण बरे होण्याच्या मार्गावर आहेत. रावळगावमध्ये पहिला रुग्ण आढळल्यानंतर गाव कमालीचे सतर्क झाले आहे. शहरानजीकच्या गावांना आता अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. ग्रामीण भागातील शेतकरी दूध व भाजीपाला शहरात रोज घेऊन जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांनाच सतर्कता बाळगावी लागणार आहे.

हेही वाचा >  GOOD NEWS : येवला, दाभाडी, ओझरच्या भाळी कोरोनामुक्तीचा टिळा! 'हा' तालुकाही कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona virus came into rural areas of malegaon nashik marathi news