esakal | GOOD NEWS : येवला, दाभाडी, ओझरच्या भाळी कोरोनामुक्तीचा टिळा! 'हा' तालुकाही कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर 
sakal

बोलून बातमी शोधा

corona second patient.jpg

येवला तालुक्‍यात कोरोनाचे जवळपास 32 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले होते. त्यापैकी 29 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला असून, उर्वरित तीन नागरिकांना गुरुवारी डिस्चार्ज मिळणार आहे. त्यामुळे येवला तालुका पूर्णपणे कोरोनामुक्त झाला आहे. प्रशासनाने केलेले नियोजन आणि नागरिकांनी केलेल्या सहकार्यातून हे शक्‍य झाले आहे

GOOD NEWS : येवला, दाभाडी, ओझरच्या भाळी कोरोनामुक्तीचा टिळा! 'हा' तालुकाही कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : आरोग्य विभागासह सर्वच प्रशासकीय यंत्रणांकडून सुरू असलेल्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील विविध गाव, तालुके आणि शहरे कोरोनापासून मुक्त होण्यास सुरवात झाली असून, बुधवारी (ता.20) येवला, दाभाडी आणि ओझर ही जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मोठी शहरे कोरोनामुक्त झाली आहेत. तसेच बागलाण तालुक्‍याचीही कोरानामुक्तीकडे वाटचाल सुरू असून, तालुक्‍यातील केवळ एकाचा अहवाल प्रलंबित आहे. यामुळे जिल्ह्यात आशादायक चित्र निर्माण झाले आहे. 

येवला पॅटर्न चर्चेत 
येवल्यात कोरोनाबाधितांची संख्या 32 वर पोचली होती. मालेगाव व नाशिकनंतर हा तिसऱ्या क्रमांकाचा मोठा आकडा होता. मात्र पालकमंत्री, आमदार, रुग्णांसह नागरिक आणि प्रशासनाने घेतलेल्या मेहनतीला फळ आले असून, बाभूळगाव येथील उपचार केंद्रातील शेवटच्या रुग्णालाही बुधवारी (ता.20) घरी सोडल्याने रुग्णसंख्या शून्य झाली आहे. आता फक्त नाशिकला तिघे उपचार घेत असून, तेही ठणठणीत असल्याने त्यांना गुरुवारी (ता.21) घरी सोडणार आहेत. त्यामुळे येवला पॅटर्न चर्चेत असून, त्याचा आनंद समस्त तालुकावासीयांना आहे. लॉकडाउननंतर तब्बल महिनाभराने येवल्यात 24 एप्रिलला मालेगाव कनेक्‍शनमुळे कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. धाकधूक वाढत असताना एकदा 68, तर दुसऱ्यांना 64 संशयित एकाचवेळी निगेटिव्ह आल्याने संपर्क साखळी तुटण्यास मोठी मदत झाली. गेल्या आठवड्यापासून तर येथे एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नसल्याने तालुक्‍याला मोठा दिलासा मिळाला आहे. 

दाभाडीत आनंदाची लहर 
दाभाडी गावाने अठरा दिवस तणावाखाली काढले. मात्र गावातील चौदाही कोरोना रुग्णांना बुधवारी (ता.20) घरी सोडण्यात आले. गाव कोरोनामुक्त झाल्याने ग्रामस्थांसह संपूर्ण यंत्रणेने सुटकेचा निःश्‍वास सोडताच गावात आनंदाची लहर उमटली आहे. एकही रुग्ण न दगावता गाव कोरोनामुक्त झाल्याने कार्यरत यंत्रणेचे कौतुक होत आहे. 2 मेस दाभाडीत पहिला रुग्ण आढळल्याने परिसरात घबराट पसरून रुग्णांची संख्या वाढत 14 पर्यंत पोचली. उपचारासाठी गावाबाहेर (कै.) इंदूबाई हिरे वसतिगृहात ताप उपचार केंद्र, संशयित विभाग, विलगीकरण विभाग स्थापन झाले व अद्ययावत सुविधा असल्याने रुग्णांना वेळीच उपचार मिळाले. 

ओझरचा एकमेव रुग्णही निगेटिव्ह 
 मुंबई येथून ओझर- सायखेडा रोड येथील प्रतिष्ठित व्यक्ती 14 मेस कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने संपूर्ण ओझर तणावाखाली होते. मात्र या रुग्णाची बुधवारी (ता.20) जिल्हा रुग्णालयात तपासणी केली असता स्वॅब अहवाल निगेटिव्ह आल्याचे आरोग्य सूत्रांनी सांगत त्यांना घरी सोडले. तसेच त्यांच्या संपर्कातील व कुटुंबातील 17 व्यक्तींचा यापूर्वीच रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने बुधवारी ओझर कोरोनामुक्त झाले. परिसरात एकही रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह नसल्याने ओझरकरांना दिलासा मिळाला असून, शासकीय नियमानुसार या व्यक्तीस सात दिवस घरीच थांबून विश्रांतीचा सल्ला दिला आहे. 

बागलाणमध्ये पन्नासवर निगेटिव्ह 
सटाणा शहरातील एकमेव कोरोनाबाधीत पोलिस अधिकाऱ्यासह ताहाराबाद येथील रहिवासी व बागलाण पंचायत समितीचे कोरोनाबाधित वैद्यकीय अधिकारी कोरोनामुक्त झाल्याने त्यांना बुधवारी (ता.20) घरी सोडण्यात आले. तालुक्‍यातील क्वारंटाइन केलेल्या सर्व व्यक्तींचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला असून, त्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्या सर्वांना घरी सोडले आहे. मात्र डांगसौदाणे येथील एका युवकाचा तपासणी अहवाल अद्याप प्रलंबित आहे. यामुळे हा बागलाण तालुकाही कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर आहे. सटाणा शहर व तालुक्‍यातील बाधितांच्या संपर्कात आलेल्या आणि इतर अशा पन्नासहून अधिक जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 

हेही वाचा > पत्रकारावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोर सरपंचावर कोरोनाची मेहेरबानी...की आणखी काही? संशय कायम

पूर्णपणे कोरोनामुक्त
येवला तालुक्‍यात कोरोनाचे जवळपास 32 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले होते. त्यापैकी 29 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला असून, उर्वरित तीन नागरिकांना गुरुवारी डिस्चार्ज मिळणार आहे. त्यामुळे येवला तालुका पूर्णपणे कोरोनामुक्त झाला आहे. प्रशासनाने केलेले नियोजन आणि नागरिकांनी केलेल्या सहकार्यातून हे शक्‍य झाले आहे. - छगन भुजबळ, पालकमंत्री, नाशिक 

हेही वाचा > दिलासादायक! नाशिक शहरात कोरोनाला लागतोय "ब्रेक'...ही आहेत कारणे..