CoronaFighters : "आधी लढा कोरोनाशी नंतरच लगिन!''...असा निर्धार 'त्यांचा' पक्का

भाग्यश्री गुरव : सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 एप्रिल 2020

मुंबईतील डॉ. संदीप पुराणे व डॉ. हेमांगी देवराज यांचा विवाह पूर्वनियोजनानुसार येत्या 26 एप्रिलला होणार होता. मात्र, "लॉकडाउन' आणि एकूणच परिस्थितीचा विचार करून विवाह पुढे ढकलत ते मुंबईतील केईएम रुग्णालयात कर्तव्य बजावत रुग्णांना दिलासा देताहेत. डॉ. पुराणे मुळचे नाशिकचे असून, अस्थिरोगतज्ज्ञ व शल्यचिकित्सक आहेत. आपल्या कृतीतून त्यांनी नवा आदर्श निर्माण केला आहे.

नाशिक : "आधी लगीन कोंढाण्याचं, मग रायबाचं' हे तानाजी मालूसरेंचे वाक्‍य आणि त्याच्याशी संबंधित अख्खा इतिहास अवघ्या महाराष्ट्राला तोंडपाठ आहे. त्याच धर्तीवर डॉक्‍टर असलेल्या नियोजित वधू-वरांनी कोरोनाविरुद्धच्या लढाईत उतरताना, "आधी लढाई कोरोनाशी, लग्नाचे नंतर बघू' असा निर्धार करत रुग्णसेवेचा मार्ग अवलंबला आहे. 

कर्तव्य बजावत रुग्णांना दिलासा देताहेत

मुंबईतील डॉ. संदीप पुराणे व डॉ. हेमांगी देवराज यांचा विवाह पूर्वनियोजनानुसार येत्या 26 एप्रिलला होणार होता. मात्र, "लॉकडाउन' आणि एकूणच परिस्थितीचा विचार करून विवाह पुढे ढकलत ते मुंबईतील केईएम रुग्णालयात कर्तव्य बजावत रुग्णांना दिलासा देताहेत. डॉ. पुराणे मुळचे नाशिकचे असून, अस्थिरोगतज्ज्ञ व शल्यचिकित्सक आहेत. आपल्या कृतीतून त्यांनी नवा आदर्श निर्माण केला आहे. तर व्यवसायाने डॉक्‍टर असलेल्या हेमांगी देवराज यांनीही लग्नापूर्वी कोरोनाविरुद्ध दोन हात करण्याचा निर्धार केला आहे. 

रुग्णांना लवकरात लवकर बरे करून घरी कसे जाता येईल हाच विचार

राज्यात कोरोना संशयित रुग्णांची संख्या रोजच वाढत आहे. अशा वेळी डॉक्‍टर, पोलिस, परिचारिका यांच्यासह अत्यावश्‍यक सेवा पुरविणारे अनेक जण झोकून काम करीत आहेत. विशेषतः शहरातील रुग्णालयांमधील डॉक्‍टर अविरत काम करीत आहेत. मुंबईच्या केईएम रुग्णालयात सेवा करत असलेले हे नियोजित दांपत्य चार दिवसांआड सलग बारा तास रुग्णसेवा देत आहेत. याबाबत डॉ. पुराणे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, की कोरोना वॉर्डात प्रवेश करण्यापूर्वी क्वार्टरमधून बाहेर पडताना स्वतःच्या संरक्षणासाठी किट परिधान करावे लागते. त्यात हेड कव्हर, गाऊन, गॉगल, हॅन्ड ग्लोव्हज, शू कव्हर, एन 95 मास्कचा उपयोग केला जातो. एकदा हे किट परिधान केले, की सहा तास पाणी, जेवण तसेच प्रसाधनगृहातही ते जाऊ शकत नाही. माझ्याबरोबर माझी होणारी सहचारिणीदेखील कोरोना वॉर्डातच रुग्णांची सेवा करत आहे. मनात कुठलीही भीती न बाळगता रुग्णांना लवकरात लवकर बरे करून घरी कसे जाता येईल, यासाठी आम्ही अथक परिश्रम घेत असल्याचेही त्यांनी या वेळी नमूद केले. 

अशी घेतात काळजी 

क्वार्टरकडे येण्यापूर्वी संपूर्ण किट काढून कचऱ्यात टाकले जाते. त्यानंतर प्रथम पाण्याने व नंतर सॅनिटायझरने स्वच्छ केले जातात. रूमवर आल्यानंतर सर्व प्रथम गरम पाण्याने अंघोळ केली जाते. अंगावरचे कपडेही गरम पाण्यानेच धुतले जातात. त्यानंतर पुन्हा सॅनिटायझरने हात स्वच्छ केले जातात. त्यानंतरच गरम पाणी व जेवण करता येते. कपडे धुतल्यानंतर तीन ते चार दिवस उन्हातच ठेवावे लागतात. 

हेही वाचा > लॉकडाउन दरम्यान पहाटे संशयास्पद कंटेनरला पोलीसांनी अडवला...झडती घेतली तेव्हा धक्काच!

नागरिकांनी घराबाहेर जाणे पूर्णपणे टाळावे. शक्‍यतो घरातच थांबवे. वारंवार हात धुवावेत. सामाजिक अंतर राखावे. सरकारने घातलेल्या नियमांचे पूर्णपणे पालन केले पाहिजे. मुंबई, पुण्यात जी अवस्था झाली, ती नाशिकमध्ये होऊ नये म्हणून आम्ही तुमच्यासाठी काम करत आहोत. तुम्ही आमच्यासाठी घरीच राहा व सुरक्षित राहा. - डॉ. संदीप पुराणे, ऑर्थोपेडिक सर्जन 

हेही वाचा > 'ज्या शेतकऱ्यांचे द्राक्षे बाकी आहेत, त्यांनी बेदाणा निर्मिती करावी!' - आमदार दिलीप बनकर

येत्या 26 एप्रिलला आम्ही विवाहबंधनात अडकणार होतो. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे आता लग्नापेक्षा अत्यावश्‍यक सुविधा देणे आणि देशाला कोरोनापासून वाचवणे महत्त्वाचे आहे. देशहितासाठी अनेक विवाह रद्द झाले; पण हे संकट निवारण करण्यासाठी रुग्णांना सेवा पुरविणे अत्यावश्‍यक वाटते. लग्न नंतरही करू शकतो, आता देशाला वाचविण्याचे ध्येय पूर्ण करायचे आहे. - डॉ. हेमांगी देवराज, एमबीबीएस  

हेही वाचा > घरबसल्या कोरोनावर फॉरवर्ड केलेला मेसेज 'असा' अंगाशी आला...! की थेट रवानगी जेलमध्येच


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CoronaFighters : now fight with Corona is more important than marriage ; this couple is doing the treatment on patients nashik marathi news