esakal | पांढऱ्या सोन्याचे उत्पादन घटणार! कपाशीचे पीक आता रोगाच्या कचाट्यात
sakal

बोलून बातमी शोधा

kapus 1.jpg

पावसाने जोमात आलेले कपाशीचे पीक आता रोगाच्या कचाट्यात सापडले आहे. सततच्या पावसामुळे सुरवातीला लागलेली बोंडे आता काळवंडत सडली असून, सर्वाधिक नुकसान कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने होत आहे.

पांढऱ्या सोन्याचे उत्पादन घटणार! कपाशीचे पीक आता रोगाच्या कचाट्यात

sakal_logo
By
संतोष विंचू

येवला (जि.नाशिक) : पावसाने जोमात आलेले कपाशीचे पीक आता रोगाच्या कचाट्यात सापडले आहे. सततच्या पावसामुळे सुरवातीला लागलेली बोंडे आता काळवंडत सडली असून, सर्वाधिक नुकसान कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने होत आहे. सोबतच फुलकिडे, पांढरी माशी आणि बोंडआळीही विळखा घालत असल्याने यंदा जिल्ह्यात कपाशीच्या उत्पादनात एकरी दोन ते चार क्विंटलपर्यंत घट होणार असल्याने उत्पादकासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. 

हजारो एकरांवर लाल्याचा विळखा; बोंडेही काळवंडले 
मालेगाव, नांदगाव, येवला या तालुक्यांत नगदी पीक म्हणून कपाशीचे क्षेत्र वाढले आहे. चांगला पाऊस झाल्याने कपाशीची वेळेत लागवड झाली आणि वेळोवेळी पाऊस पडत गेल्याने कपाशीची उंचीसह झाड वाढल्यानंतर बोंडेही चांगल्या प्रमाणात लागल्याने शेतकरी समाधानी होते. मात्र, मुसळधार पावसाने कपाशीवर हल्ला केला आहे. बोंडे सडत असून, कपाशीची झाडे लाल्या रोगाने वेढली असल्याने नुकसान होत आहे. 

हेही वाचा > गुजरातहून औरंगाबादला पोहचवायचे होते 'घबाड'; पोलिसांच्या कारवाईने फिस्कटला प्लॅन

दोन-तीन वेचणीत संपणार 
जमिनीलगत असेलेली पाच ते दहा बोंडे अतिपावसामुळे काळी पडून सडली. ज्या कापसाची वेचणीलायक बोंड फुटली आहे तोसुद्धा खराब प्रतिचाच आहे. अतिपावसामुळे झाडांवर करपासदृश्य रोगाने झाडांची पानं लाल- पिवळी होऊन पान, फूल, पत्ती गळचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे एक-दोन वेचणीत कापूस आटोपून जाईल. कापसाचे जिरायती क्षेत्रात एकरी पाच ते आठ क्विंटल, तर बागायती क्षेत्रात १२ क्विंटलच्या दरम्यान, तर सरासरी दहा क्विंटल उत्पादन निघते. या वर्षी मात्र दोन ते चार क्विंटलपर्यंत उत्पादन घटण्याची भीती आहे. 

हेही वाचा > ...म्हणून अधिकृत मेडिकलमधूनच खरेदी करा औषधे! रुग्ण व नातलगांना सतर्कतेचा इशारा
 
जिल्ह्यातील क्षेत्र व झालेली लागवड 
तालुका प्रस्तावित क्षेत्र झालेली लागवड टक्के 
मालेगाव १७,७५१ २०,२२३ ११४ 
सटाणा ७८ १६६ २१३ 
नांदगाव ९,१६४ ८,२७० ९०.२५ 
निफाड ५७ ४२ ७४ 
सिन्नर १,२६५ १,४२९ ११३ 
येवला १२,००६ ८,९७५ ७५ 
एकूण ४०,३२२ ३९,१०५ ९७ 

या वर्षी सुरवातीला कपाशीचे पीक अतिशय जोमदार होते. अतिपावसामुळे हलक्या व मध्यम प्रतीच्या जमिनीतील कपाशीवर लाल्या रोगाचा मोठा आघात झाला असून झाडांची पाने लाल-पिवळी होऊन कपाशी वाळत चालली असून, पत्तीची पूर्ण गळ झाली आहे. लाल्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे अपेक्षेपेक्षा खूप कमी उत्पन्न राहील. -भागूनाथ उशीर, संचालक, राज्य कापूस उत्पादक पणन महासंघ सल्लागार समिती 

सप्टेंबरमधील पावसासह ढगाळ वातावरणामुळे लाल्यासह रसशोषक किडीदेखील वाढले आहे. फुलकिडे, पांढरी माशी आणि बोंडआळीचा देखील झाडांवर परिणाम होताना दिसतोय. दर वर्षी पाऊस नसल्याने अन् यंदा ज्यादा पावसाने मोठे नुकसान होणार आहे. -दत्ता सानप, कापूस उत्पादक, राजापूर 

 

संपादन - ज्योती देवरे