गावोगावच्या कारभाऱ्यांचे भवितव्य आज! नाशिक जिल्ह्यातील ५६५ ग्रामपंचायतींसाठी १३ तहसीलमध्ये मतमोजणी 

विनोद बेदरकर
Monday, 18 January 2021

कोरोनाच्या लॉकडाउनच्या थंडाव्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकांनिमित्ताने जिल्हाभर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांच्या मोर्चेबांधणीच्या अंगाने निवडणुका लढल्या गेल्या. अपवादाच्या ग्रामपंचायती वगळता सगळीकडे मोठ्या उत्साहात मतदान झाले.

नाशिक : जिल्ह्यातील ६२१ पैकी ५६५ ग्रामपंचायतींसाठी जिल्हाभरात ११ हजार ५६ उमेदवार नशीब अजमावीत आहेत. शुक्रवारी (ता. १५) दहा लाख ९५ हजार १३४ मतदारांपैकी आठ लाख ८० हजार ६२ (८०.३६ टक्के) मतदारांनी त्यांच्या गावाचे कारभाऱ्यांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात निश्चित केले. सोमवारी (ता. १८) मतपेटीतून कुणाचा भाग्योदय होतो, हे दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे. 

५६५ ग्रामपंचायतींसाठी १३ तहसीलमध्ये मतमोजणी 
शुक्रवारी ५६५ ग्रामपंचायतींत चार लाख तीन हजार ४१२ महिला, चार लाख ७० हजार ६४९ पुरुष या प्रमाणे आठ लाख ८० हजार ६२ उमेदवारांनी त्यांच्या गावाच्या कारभाऱ्यांचे भवितव्य मतदान यंत्रात निश्चित केले. त्यामुळे रविवारी दिवसभर जिल्हाभरातील १३ केंद्रांवरील १४२ टेबलांवर ७४० मतमोजणी कर्मचाऱ्यांचे नियोजन सुरू होते. पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. मतमोजणी आणि त्यानंतरचे काही तास महत्त्वाचे असतात. जय-पराजय हा मुद्दा महत्त्वाचा असतो. त्यामुळे संवेदनशील समजल्या जाणाऱ्या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. 

८० टक्के मतदान 
कोरोनाच्या लॉकडाउनच्या थंडाव्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकांनिमित्ताने जिल्हाभर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांच्या मोर्चेबांधणीच्या अंगाने निवडणुका लढल्या गेल्या. अपवादाच्या ग्रामपंचायती वगळता सगळीकडे मोठ्या उत्साहात मतदान झाले. सरासरी ८० टक्क्यांहून अधिक मतदान झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांत वादावादीचे प्रसंग उद्‌भवले. प्रस्थापित विरुद्ध तरुणाई, अशा स्वरूपाच्या या लढतीत राजकीय चित्र स्पष्ट होईल. 

तालुका मतमोजणी केंद्र टेबल कर्मचारी 
नाशिक तहसील कार्यालय नाशिक १४ ५६ 
त्र्यंबकेश्वर तहसील कार्यालय त्र्यंबकेश्वर एक चार 
दिंडोरी शासकीय धान्य गुदाम, तहसील दिंडोरी १५ ८६ 
इगतपुरी नवीन प्रशासकीय इमारत, इगतपुरी तहसील चार १२ 
निफाड के.जी.डी.एम. महाविद्यालय निफाड १३ ५२ 
सिन्नर तहसील कार्यालय सिन्नर २४ १५७ 
येवला तहसील कार्यालय येवला दहा ४० 
मालेगाव नवीन तहसील कार्यालय मालेगाव १६ ८२ 
नांदगाव प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय १२ ६० 
चांदवड मध्यवर्ती प्रशासकीय इमारत १६ ७९ 
कळवण मध्यवर्ती प्रशासकीय इमारत १४ ४२ 
बागलाण तहसील कार्यालय बागलाण दहा ४० 
देवळा नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, नऊ ३० 

तुरळक अपवाद वगळता जिल्हाभर शांततेत निवडणुका पार पडल्या. सोमवारी (ता. १८) मतमोजणीसाठी पुरेसा बंदोबस्त लावण्यात आला आहे. अतिसंवेदनशील आणि संवेदनशील केंद्रांवर अतिरिक्त कुमक तैनात करण्यात येणार आहे. -सचिन पाटील, पोलिस अधीक्षक, नाशिक  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Counting of votes for gram panchayats in Nashik district marathi news