thakkar dome.jpg
thakkar dome.jpg

नाशिकचे ठक्कर डोम येथील कोविड केअर सेंटर पुन्हा कार्यान्वित; 350 बेड्सची सुविधा 

नाशिक : ठक्कर डोम येथे ३५० बेड्सच्या कोविड केअर सेंटरची पुनर्निमिती ही  महानगरपालिका व क्रेडाई संस्थेने केलेली अत्यंत दर्जेदार आरोग्य सुविधा असून शेवटचा रुग्ण जोपर्यंत बरा होत नाही तोपर्यंत ही लढाई संपणार नाही. क्रेडाई संस्थेच्या  मार्गदर्शन व प्रेरणेतून इतर संस्थांनी देखील कोरोनाच्या या लढाईत सहभागी व्हावे, असे आवाहन  राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

 ठक्कर डोम येथील कोविड केअर सेंटर पुन्हा कार्यान्वित 

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने बेड्सची संख्या अपुरी पडत आहे. त्यादृष्टीने नाशिक महानगरपालिका व क्रेडाई या संघटनेच्या संयुक्त विद्यमाने नाशिकच्या ठक्कर डोम येथे पुन्हा एकदा ३५० बेड्सचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. या कोविड केअर सेंटरचे लोकार्पण राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज करण्यात आले, त्यावेळी भुजबळ बोलत होते.

कोविडचा प्रादुर्भाव कमी झाल्याने ही व्यवस्था बंद

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, देशात कोविडचा प्रादुर्भाव वाढला त्यावेळी नाशिकमध्ये ठक्कर डोमची व्यवस्था नाशिकमध्ये केली. मध्यंतरीच्या काळात कोविडचा प्रादुर्भाव कमी झाल्याने ही व्यवस्था बंद केली होती. मात्र पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने पुन्हा कार्यान्वित करावी लागत आहे. त्यामुळे प्रादुर्भाव वाढत असून आपण उपाय योजना करत असतांना मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे आपण व्यवस्था करण्यात कमी पडत आहोत ही परिस्थिती आहे. त्यामुळे या कामासाठी खाजगी डॉक्टर, नर्स, परिचारिका यांनी कामासाठी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

वेळेत उपचार व निर्बंधांचे पालन करून सहकार्य करा

यावेळी महापौर सतीश कुलकर्णी म्हणाले की, कोरोनाच्या काळात आवश्यकता लक्षात घेवून पुन्हा एकदा नाशिककरांसाठी क्रेडाई ने कोविड केअर सेंटरची केलेली निर्मिती ही कौतुकास्पद बाब आहे. मनपा आणि शासनाच्या वतीने आवश्यक त्या उपाय योजना करण्यात करण्यात येत असल्याने नागरीकांनी घाबरून न जाता वेळेत उपचार व निर्बंधांचे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन केले.

यावेळी महापौर सतीश कुलकर्णी, माजी खासदार समीर भुजबळ, मनपा गटनेते सतीश सोनवणे, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, मनपा आयुक्त कैलास जाधव, मनपा उपायुक्त मनोज घोडे पाटील, मनपा आरोग्य अधिकारी बापूसाहेब नागरगोजे,डॉ.राजेंद्र भंडारी यांच्यासह क्रेडाईचे अध्यक्ष रवी महाजन, उपाध्यक्ष कृणाल पाटील,रंजन ठाकरे, विष्णुपंत म्हैसधुणे, जितूभाई ठक्कर, सुरेश पाटील, गौरव ठक्कर, अनिल आहेर, सचिन बागड, मनोज खिवसरा, रंजन भलोडीया, राजेश आहेर, हंसराज देशमुख, अनंत ठाकरे, विजय चव्हाणके, सागर शहा, सतीश मोरे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com