दहेगाव तब्बल १३ वर्षांनंतर भरले; आता गरज नियोजनपूर्वक पुरवठ्याची 

संजीव निकम
Thursday, 1 October 2020

दहेगाव धरणातील  पाण्याचा वापर करताना सार्वजनिक आरोग्याचे प्रश्न गंभीर होऊ नये, यासाठी आधुनिक जलशुद्धीकरणाची यंत्रणा उभारणे गरजेचे आहे. दरडोई सत्तर लिटर पाण्याची आवश्यकता ओळखून पाणी वितरणातील सुसूत्रता करावी लागणार आहे.

नाशिक/नांदगाव : तब्बल १३ वर्षांनंतर नांदगाव शहराला पाणीपुरवठा करणारे पालिकेच्या मालकीचे दहेगाव धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरण पूर्ण भरल्याने नांदगावकरांची तहान भागविली जाणार असून, आता हे पाणी दीर्घ टिकवण्यासाठी काळजीपूर्वक नियोजन करण्याची गरज आहे. 
शहरापासून पाच किलोमोटरवर असलेल्या दहेगाव धरणाचे  वैशिष्ट्य  म्हणजे ग्रॅव्हेटी तत्त्वाने होणारा पाणीपुरवठा. पालिकेच्या मालकीच्या या धरणाने अनेक दशके शहरातील जनतेच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागविली आहे. 

कशामुळे आटले दहेगाव? 

दहेगावच्या परिसरात पावसाचे कमी झालेले प्रमाण हे महत्त्वाचे कारण असले, तरी धरणासाठीच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाणी अडविले गेले आणि  धरण भरण्यालाही मर्यादा आल्या.  अर्थात, पाणलोट क्षेत्रातील पावसाच्या ढासळत्या आलेखाचाही कळत नकळत हा परिणाम होताच त्यामुळे दहेगाव धरण व पाणलोट क्षेत्रात नदीजोड  प्रकल्पातून  किंवा अतिरिक्त स्वरूपातील वाहून जाणारे पूरपाणी  दहेगाव धरणात आणणे हा  उपाय होता व आहे. दहेगाव धरण कोरडे पडले म्हणून दुसऱ्या धरणातील  पाणी शाश्वत आहे  म्हणून गिरणा  योजनेकडे वळावे लागले, याचा विसर न पडू देता आणि गिरणावरील पाण्यावरचा  हक्क अबाधित राखूनच आता आहे, त्या स्थितीत  योजनांचे सुसूत्रीकरण व नियोजन करावे लागणार आहे . 

हेही वाचा > ‘ऍनिमल एम्ब्युलन्सच्या नावाखाली भलताच प्लॅन! नागरिकांची सतर्कता आणि धक्कादायक खुलास

जलशुद्धीकरण यंत्रणा कार्यान्वित करा 

दहेगाव धरणातील  पाण्याचा वापर करताना सार्वजनिक आरोग्याचे प्रश्न गंभीर होऊ नये, यासाठी आधुनिक जलशुद्धीकरणाची यंत्रणा उभारणे गरजेचे आहे. दरडोई सत्तर लिटर पाण्याची आवश्यकता ओळखून पाणी वितरणातील सुसूत्रता करावी लागणार आहे. सध्या गिरणाच्या मिळणाऱ्या पाण्यामागे  पालिकेला मोठ्या प्रमाणात पैसे चुकवावे लागत आहेत. त्यावरून नेहमी जिल्हा परिषद व पालिका प्रशासन यांच्यात वाद होतात. येवला रस्त्याकडे जुन्या जलकुंभाशेजारी पन्नास लाख लिटर क्षमतेच्या  जलशुद्धीकरण योजनेला मध्यंतरी गती मिळाली होती ती  पुन्हा द्यावी लागेल. शहरातील जुन्या जलवाहिन्या न बदलता केवळ जलशुद्धीकरण प्रकल्प उभारला तरी त्यासाठी चार ते पाच कोटी रुपयांचा  खर्च अपेक्षित आहे  . 

हेही वाचा > विवाह प्रमाणपत्र काढण्यास पतीचा वारंवार नकार; पत्नीला मारहाण, सहा जणांविरुद्ध गुन्हा

 

संपादन - रोहित कणसे

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dahegaon dam filled after 13 years nashik marathi news