अतिवृष्टीने ३६ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान; कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज 

महेंद्र महाजन
Tuesday, 22 September 2020

पावसाने चाळीतील उन्हाळ कांद्याचे नुकसान केले. त्याचवेळी खरीप तथा पोळ कांद्यासाठी टाकण्यात आलेल्या रोपांचे पन्नास टक्क्यांहून अधिक नुकसान झाले आहे. पोळ कांद्याचे उत्पादन एक महिना उशिरा बाजारात येणार आहे. त्यातच आताच्या अतिवृष्टीमुळे नऊ हजार ८६७ हेक्टरवरील कांद्याचे, तर एक हजार ३५७ हेक्टरवरील कांद्याच्या रोपांचे नुकसान झाले

नाशिक : मालेगाव, बागलाण, नांदगाव, कळवण, निफाड, येवला आणि चांदवड तालुक्यांतील २३० गावांमध्ये अतिवृष्टीने ३६ हजार ४९३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात खरीप पिकांच्या २४ हजार ७८४ हेक्टर आणि भाजीपाल्याच्या ११ हजार ६७९ हेक्टरचा समावेश आहे. कृषी विभागाने हा प्राथमिक अंदाज तयार केला आहे. 

अतिवृष्टीने ३६ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान 

तालुकानिहाय नुकसान झालेले क्षेत्र हेक्टरमध्ये असे ः मालेगाव- २५१.८०, बागलाण- २५६.५०, नांदगाव- १७५, कळवण- १७०.५०, निफाड- ४३२, येवला- दोन हजार १८९, चांदवड- ३३ हजार १८. यावरून चांदवड तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाल्याचे दिसून येते. मालेगावमधील २८६, बागलाणच्या ४४४, नांदगावच्या बाराशे, कळवणच्या ४१७, निफाडच्या ५६९, येवल्याच्या तीन हजार १०४ शेतकऱ्यांचा नुकसान झालेल्यांमध्ये समावेश आहे. 

हेही वाचा > थरारक दृश्य! नदीच्या पूरात वाहून गेली कार; अतिघाईच्या नादात घडला थरार; पाहा VIDEO

मका, बाजरी, भुईमूग जमीनदोस्त 
खरिपातील मका, बाजरी, भुईमूग अतिवृष्टीने जमीनदोस्त झाले आहे. चार हजार ४०७ हेक्टरवरील सोयाबीनचे नुकसान झाले आहे. १७ हजार २८३ हेक्टरवरील मका, ३३ हेक्टरवरील जिरायती कापूस, एक हजार ६६४ हेक्टरवरील बाजरी, एक हजार १९४ हेक्टरवरील भुईमुगाचे नुकसान झाले. ३९१ हेक्टरवरील भाजीपाल्याला अतिवृष्टीचा फटका बसला आहे. मालेगावमधील पाच हेक्टरवरील केळी, चांदवडमधील २३ हेक्टरवरील द्राक्षे, येवल्यातील दोन हेक्टरवरील डाळिंबाला अतिवृष्टीने दणका दिला आहे. 

हेही वाचा >  मनाला चटका लावणारी बातमी : मुलाचा विरह अन् आई-वडिलांसह तिघांची निघाली अंत्ययात्रा; परिसरात हळहळ

कांद्याला पुन्हा फटका 
पावसाने चाळीतील उन्हाळ कांद्याचे नुकसान केले. त्याचवेळी खरीप तथा पोळ कांद्यासाठी टाकण्यात आलेल्या रोपांचे पन्नास टक्क्यांहून अधिक नुकसान झाले आहे. पोळ कांद्याचे उत्पादन एक महिना उशिरा बाजारात येणार आहे. त्यातच आताच्या अतिवृष्टीमुळे नऊ हजार ८६७ हेक्टरवरील कांद्याचे, तर एक हजार ३५७ हेक्टरवरील कांद्याच्या रोपांचे नुकसान झाले आहे. येवला तालुक्यातील ५५ आणि चांदवडमधील एक हजार ३०२ हेक्टरचा कांदा रोपांच्या नुकसानीत समावेश आहे. शिवाय येवल्यातील ८०० आणि चांदवडमधील नऊ हजार ८५९ हेक्टरवरील कांद्याचे नुकसान झाले.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Damage to crops due to heavy rains nashik marathi news