esakal | अवकाळी अन्‌ गारांचा द्राक्षपंढरीला फटका; कांद्याचे नुकसान 150 कोटींच्या पुढे 
sakal

बोलून बातमी शोधा

sakal (48).jpg

कृषीच्या अहवालामध्ये कांद्याच्या रोपांच्या नुकसानीचा समावेश झालेला नसला, तरीही कांद्याच्या रोपांचे नुकसान अधिक झाले आहे. त्यामुळे विशेषतः उन्हाळ कांद्याच्या क्षेत्रात घट ठरली आहे. त्यामुळे नवीन कांद्याची आवक वाढेपर्यंत सध्याचे सरासरी चार हजार क्विंटलपर्यंत पोचलेले भाव व्यापाऱ्यांच्या अंदाजाच्या पंधरा दिवसांच्यापुढे पोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

अवकाळी अन्‌ गारांचा द्राक्षपंढरीला फटका; कांद्याचे नुकसान 150 कोटींच्या पुढे 

sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : अवकाळी आणि गारांचा जिल्ह्यातील द्राक्षपंढरीला ४०० कोटींचा फटका बसल्याचा उत्पादकांचा प्राथमिक अंदाज आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळलेला असताना थंड हवामानामुळे द्राक्षांचे मणी तडकण्याचे प्रमाण डोळ्याला दिसण्यासाठी ४८ तासांचा कालावधी लागतो. याच अनुषंगाने द्राक्षांचे नेमके किती नुकसान झाले, याचा आढावा घेण्यासाठी शनिवारी (ता. २०) दुपारी ओझर (ता. निफाड) येथील द्राक्ष बागायतदार संघाच्या कार्यालयात बैठक होत आहे. 

शेतकऱ्यांना उत्पादनावर पाणी सोडावे लागले
द्राक्षांप्रमाणे रांगडा आणि उन्हाळ कांद्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार कांद्याचे तीन हजार ३४४ हेक्टर नुकसान झाले आहे. प्रत्यक्षात कांद्याचे नुकसान त्याहून अधिक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तरीही कृषीच्या अहवालाचा विचार करता, हेक्टरी ३० टनाप्रमाणे शेतकऱ्यांना उत्पादनावर पाणी सोडावे लागले. सरासरी क्विंटलला दीड हजार भाव धरला, तरीही हे नुकसान दीडशे कोटींच्या पुढे पोचत असल्याचे दिसून येते. कृषीच्या अहवालामध्ये कांद्याच्या रोपांच्या नुकसानीचा समावेश झालेला नसला, तरीही कांद्याच्या रोपांचे नुकसान अधिक झाले आहे. त्यामुळे विशेषतः उन्हाळ कांद्याच्या क्षेत्रात घट ठरली आहे. त्यामुळे नवीन कांद्याची आवक वाढेपर्यंत सध्याचे सरासरी चार हजार क्विंटलपर्यंत पोचलेले भाव व्यापाऱ्यांच्या अंदाजाच्या पंधरा दिवसांच्यापुढे पोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

हेही वाचा - रक्षेसाठी राखी बांधलेले हातच रक्ताने माखलेले! रक्षणकर्ता भाऊच बनला बहिणीसाठी काळ

कांद्याचे नुकसान दीडशे कोटींच्या पुढे 
मागील अवकाळी पावसामुळे द्राक्षबागांत तडकलेले मणी काढून टाकण्यासाठी गुरुवारच्या (ता. १८) अवकाळी पाऊस आणि गारपिटीपर्यंतचा कालावधी लागला होता. हे काम आटोपत नाही तो पुन्हा मण्यांना तडकण्याच्या प्रश्‍नाने ग्रासले जाणार आहे. जिल्ह्यात सर्वसाधारणपणे १५ फेब्रुवारीनंतर द्राक्षांच्या काढणीला वेग येतो. हे क्षेत्र एकूण क्षेत्राच्या ३० टक्के असते. म्हणजेच, जिल्ह्यातील ४० हजार एकर क्षेत्रावरील द्राक्षे काढणीच्या तयारीत होती. अशात, अवकाळीच्या जोडीला गारपीट झाल्याने शेतकऱ्यांना एकरी चार लाखांचा भुर्दंड सहन करावा लागण्याची चिन्हे दिसताहेत. निर्यातीसाठी सद्यःस्थितीत किलोला ५० ते ७० रुपयांचा भाव मिळत आहे. मात्र काढणीच्या अवस्थेत असलेल्या बागेतील मणी तडकल्याने व्यापारी अशा बागांमधील द्राक्षे निर्यातीसाठी घेण्यास धजावत नाहीत. परिणामी, स्थानिक बाजारात १५ ते २० रुपये किलो भावाने द्राक्षांची विक्री करावी लागते. हा फटका किलोला ४० रुपयांपर्यंत जातो. 
 

हेही  वाचा - थरारक! सिटबेल्टमुळे पेटलेल्या गाडीत अडकला चालक; नातेवाईकांना घातपाताचा संशय 

‘हेअर क्रॅकिंग’ची टांगती तलवार 
अवकाळी पाऊस, गारपीट व त्यानंतर गारठा यामुळे द्राक्षांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. घडात पावसाचे पाणी रहात असल्याने ‘हेअर क्रॅकिंग’ होण्याचे प्रमाण वाढते, असा यापूर्वीचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. त्यामुळे शनिवार (ता. २०) आणि रविवारी (ता. २१) द्राक्षांमधील नेमके नुकसान स्पष्ट होणार आहे, असे शेतकऱ्यांना वाटत आहे.