निफाडला परतीच्या पावसामुळे द्राक्षपंढरी हादरली; द्राक्षबागांवर बुरशीजन्य रोगांना पोषक हवामान 

माणिक देसाई
Friday, 9 October 2020

तालुक्यातील उगाव, शिवडी, सोनेवाडी, खडक माळेगाव, नैताळे, लासलगाव, सायखेडा, चांदोरी, दावचवाडी, कारसूळ, कसबे सुकेणे या प्रमुख द्राक्ष उत्पादक पट्ट्यात शुक्रवार सकाळपासूनच परतीच्या पावसाने जोर धरला.

नाशिक/निफाड : तालुक्यात शुक्रवारी (ता. ९) सकाळपासून परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने संकटात असलेले द्राक्ष उत्पादक अजून संकटात सापडले आहेत. मध्यंतरी पावसाने विश्रांती घेतल्याने द्राक्षबागांच्या छाटण्यांना वेग आला असून, नवीन पालवी फुटलेल्या असताना ढगाळ वातावरण आणि संततधारेने द्राक्षबागांवर बुरशीजन्य रोगांना पोषक हवामान तयार झाल्याने द्राक्षपंढरी हादरली आहे. द्राक्षांबरोबरच सोयाबीन, मका पिकांनादेखील परतीच्या पावसाचा फटका बसला आहे. 

पावसामुळे बुरशीजन्य रोगांचा मारा वाढणार

तालुक्यातील उगाव, शिवडी, सोनेवाडी, खडक माळेगाव, नैताळे, लासलगाव, सायखेडा, चांदोरी, दावचवाडी, कारसूळ, कसबे सुकेणे या प्रमुख द्राक्ष उत्पादक पट्ट्यात शुक्रवार सकाळपासूनच परतीच्या पावसाने जोर धरला. पावसामुळे शेतात कापणी करून ठेवलेल्या सोयाबीन मका ही खरीप हंगामाची पिके भिजली आहेत. चालू हंगामात सततच्या पावसामुळे द्राक्षबागांच्या छाटण्यांना एक पंधरवडा विलंब झाला होता. त्यातच छाटण्या केल्यानंतर द्राक्षबागांच्या नवीन आलेल्या कोवळ्या फुटीवर, द्राक्षमालावर या दमट हवामान व पावसामुळे बुरशीजन्य रोगांचा मारा वाढणार आहे. त्यामुळे चालू द्राक्ष हंगामाची पायाभरणीच कमकुवत होत आहे. काही ठिकाणी द्राक्षबागांची छाटणी करून त्यावर फुटव्यासाठी चोळावे लागणारे औषधदेखील पावसामुळे लावता येणार नाही. पावसाचा जोर वाढत गेल्याने द्राक्षपंढरीत खरिपाची पिके भिजली आहेच शिवाय द्राक्ष बागायतदारांचा जीव टांगणीला लागला आहे. 

हेही वाचा >  कैद्याची मास्कच्या नाडीने गळफास लावून आत्महत्या; नाशिक मध्यवर्ती कारागृहातील घटना

पावसामुळे कोवळ्या फुटी व पोंगा अवस्थेतील द्राक्षबागांवर डावणी, बुरशीजन्य रोगांचा मारा वाढून नुकसान होण्याची शक्यता आहे. पावसाची उघडीप होताच द्राक्ष बागायतदारांना अगोदर द्राक्षबागांच्या कोवळ्या फुटीवर असलेले पाणी झटकावे लागणार आहे. त्यानंतर चिखल तुडवत रोगप्रतिकारक औषधांची फवारणी करावी लागणार आहे. 
-बाबूराव सानप, द्राक्ष उत्पादक, सोनेवाडी 
 
उघडीप मिळाल्याने मोठ्या प्रमाणात गोड्याबाराची छाटणी सुरू असताना आज पहाटेपासून परतीचा जोरदार पाऊस सुरू असल्याने द्राक्षबागायतदार हताश झाले आहेत. पावसाने बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असल्याने मोठ्या प्रमाणात फवारणीचा खर्च करणे अपरिहार्य आहे. -योगेश रायते, द्राक्ष उत्पादक

हेही वाचा > विनानोंदणी ऑक्सिजन पुरवठ्यातून नाशिकच्या सात कंपन्याचे पितळ उघड; कंपन्यांवर नियंत्रण कुणाचे? 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: damage of grape crops by rain in niphad nashik marathi news