विनानोंदणी ऑक्सिजन पुरवठ्यातून नाशिकच्या सात कंपन्याचे पितळ उघड; कंपन्यांवर नियंत्रण कुणाचे? 

सतीश निकुंभ
Thursday, 8 October 2020

ज्या ऑक्सिजन कंपन्यांची नोंदणीच नाही. त्यांच्याकडे मात्र कुणाचेही लक्ष नाही. त्या कंपन्यात ऑक्सिजन तयार होतो किती व तो कुठे विकला जातो. त्यांचा काळा बाजार होतो का? हे असे अनेक प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत. मात्र, त्याविषयी प्रशासनाचेही मौन आहे. 

नाशिक / सातपूर : ऑक्सिजनअभावी कोरोना रुग्णांना जीव गमवावा लागू नये, म्हणून प्रशासनाने उद्योग क्षेत्राला ऑक्सिजन पुरवठा बंद केला आहे. पण त्याचवेळी औद्योगिक क्षेत्रात नोंदणी नसलेल्या कंपन्यांबाबत मात्र सगळ्यांचे मौन आहे. त्यामुळे विनानोंदणी कंपन्यांना सुगीचे दिवस आले असून, अशा कंपन्यांतील ऑक्सिजन पुरवठ्यावर नियंत्रण कोणाचे, असा प्रश्‍न आता उपस्थित झाला आहे. 

विनानोंदणी ऑक्सिजन पुरवठ्यातून उखळ पांढरं 
कोरोना काळात ऑक्सिजनची प्रचंड मागणी वाढल्याने अन्न व औषध प्रशासनाने त्यांच्याकडे नोंदणी असलेल्या मोजक्या सात पुरवठादारांना औद्यागिक क्षेत्रातील ऑक्सिजन बंद करून सगळा ऑक्सिजन फक्त रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्याचा आदेश काढला. तसेच संबंधित नोंदणीकृत ऑक्सिजन कंपन्यांचा पुरवठा अन्न व औषध प्रशासनाने त्यांच्या निगराणीखाली घेतला. उद्योग संचालनालय व पोलिस प्रशासनाने ऑक्सिजन पुरवठ्यावर नियंत्रणासाठी विशेष पथक नेमून काळा बाजार रोखण्यासाठी प्रयत्न केले. हे सगळे सुरू असताना ज्या ऑक्सिजन कंपन्यांची नोंदणीच नाही. त्यांच्याकडे मात्र कुणाचेही लक्ष नाही. त्या कंपन्यात ऑक्सिजन तयार होतो किती व तो कुठे विकला जातो. त्यांचा काळा बाजार होतो का? हे असे अनेक प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत. मात्र, त्याविषयी प्रशासनाचेही मौन आहे. 

हेही वाचा > दिघावकर साहेब लक्ष असू द्या! व्यापाऱ्याकडून धूळगावच्या शेतकऱ्यांची फसवणूक 

मागणीनंतर पितळ उघड 
औद्योगिक क्षेत्राचा ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्यानंतर उद्योजकांच्या ‘निमा’, ‘आयमा’ उद्योग संघटनांनी उत्पादन बंद पडू नये म्हणून तात्पुरत्या स्वरूपात ऑक्सिजन पुरवठ्याच्या मागणीसाठी जिल्हा यंत्रणेला निवेदन दिले. त्यात काही ऑक्सिजन पुरवठादार संस्थांचा उल्लेख निवेदनात आल्यानंतर बहुसंख्य कंपन्यांची नोंदणीच नसल्याचे समोर आले. मात्र हा विषय अन्न औषध 
प्रशासनाशी संबंधित असल्याने नोंदणीच नसलेल्या कंपन्यातील ऑक्सिजनचा साठा जातो कुठे ? ऑक्सिजन तुटवड्याच्या काळात संबंधित कंपन्यांनी त्यांनी निर्माण केलेला ऑक्सिजन विकला कुठे? काळ्या बाजारात विकला गेला का? हे आणि असे अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत. 

हेही वाचा > धर्मांतर घोषणेच्या वर्धापन दिनी मुक्तिभूमी राहणार सुनीसुनी! 

अ-नोंदणीकृत ऑक्सिजन कंपन्यांवर नियंत्रण कुणाचे? ​

नाशिक जिल्ह्यात ऑक्सिजन उत्पादकांकडून औद्योगिक क्षेत्रातील लागणाऱ्या ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याने ज्या उद्योगांना ऑक्सिजन लागत असेल, त्यांनी जिल्हा उद्योग केंद्राकडे अर्ज करावा, त्यांना त्वरित ऑक्सिजनचा पुरवठा करण्याबाबत ऑर्डर देण्यात येणार आहे. पण अद्याप कोणत्याही पुरवठादार संस्थेला औद्योगिक अथवा रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा करण्याची परवानगी दिलेली नाही. 

नोंदणीकृत सहाच कंपन्या 
रवींद्र ऑक्सिजन, सातपूर 
सनी इंड्रस्ट्रिअल गॅसेस अंबड 
अक्षय ऑक्सिजन, चेहेडी पंपिंग 
पिनॅकल इंडस्ट्रीज अंबड 
यश इंडस्ट्रीज, सिन्नर 
नाशिक ऑक्सिजन सातपूर 

 

नाशिकमध्ये नोंदणी असलेल्या फक्त सहाच ऑक्सिजन उत्पादक कंपन्यांकडून सप्लाय करण्याचे तूर्तास जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत. - सतीश भामरे (नोडल आधिकारी, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, नाशिक) 

ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या कंपन्यांवर देखरेख करण्यासाठी अन्न, औषध प्रशासनावर जबाबदारी निश्‍चित केली आहे. त्यामुळे नोंदणीकृत कंपन्यांशिवाय नोंदणीच नसलेल्या ऑक्सिजन पुरवठादार 
कंपन्या आहेत का, याची माहिती घ्यावी लागेल. संबंधित विभागाकडून त्याविषयी माहिती घेईन. - सूरज मांढरे (जिल्हाधिकारी, नाशिक)  

 

संपादन - ज्योती देवरे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seven companies supply unregistered oxygen satpur nashik marathi news