देवळा तालुक्यात कांद्याचे नुकसान; बुरशी, मावा व करप्या रोगाचे आक्रमण

अनिल सावंत
Saturday, 3 October 2020

आठवडाभर विश्रांती घेतलेल्या पावसाने तीन दिवसांपासून देवळा शहर व परिसरात जोरदार हजेरी लावल्याने येथील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषतः कांदारोप व कांद्याच्या पिकाचे जास्त प्रमाणात नुकसान झाले आहे. 

महालपाटणे (जि.नाशिक) : आठवडाभर विश्रांती घेतलेल्या पावसाने तीन दिवसांपासून देवळा शहर व परिसरात जोरदार हजेरी लावल्याने येथील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषतः कांदारोप व कांद्याच्या पिकाचे जास्त प्रमाणात नुकसान झाले आहे. 

बुरशी, मावा व करप्या रोगाचे आक्रमण
देवळा, गुंजाळनगर, सुभाषनगर, भावडे, कापशी, वाखारी, खुंटेवाडी, पिंपळगाव, मेशी, महालपाटणे, देवपूरपाडे, रणादेवपाडे, निंबोळा आदी गावांमध्ये परतीचा पाऊस चांगलाच बरसत आहे. सध्या खरिपाच्या पिकांची कापणी सुरू आहे. गेल्या पंधरवड्यात अशाच पद्धतीने जोरदार पाऊस झाल्याने बाजरीचे पीक आवरताना शेतकऱ्यांचा चारा शेतातच सडला, आता उरलासुरला मका पदरात पाडून घेण्याची लगबग सुरू आहे. परंतु रोज पाऊस येत असल्याने हेही पीक हातचे जाते की काय, अशी अवस्था आहे. तालुक्यातील नगदी पीक म्हणून कांदा ओळखला जातो. मात्र जास्त पावसाने कांद्याचे पीक जमीनदोस्त झाले असून, संपूर्ण तालुक्यातील कांदा पिकावर बुरशी, मावा व करप्या रोगाने आक्रमण केले आहे. त्यामुळे कांदा यंदा तरी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. 

शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई द्यावी
आधीच शेतकऱ्यांकडे व कंपनीकडे कांदा बियाणे शिल्लक नाही. दोन-तीनदा कांदा उळे टाकल्यावरही अतिवृष्टीने ते खराब झाले आहेत. त्यामुळे शेतकरी पूर्ण हतबल झाला आहे. यंदा सगळीकडे विक्रमी पाऊस आहे. पण त्यामानाने शेतीचे उत्पन्न नसल्याने बळीराजा दुःखी आहे. शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. 

हेही वाचा > पोलिसांच्या नाकावर टिच्चून अवैधरित्या वाहतूक; औरंगाबाद-अहवा महामार्गावरील धक्कादायक प्रकार

पूर्ण पीक नष्ट होण्याच्या मार्गावर

माझ्या दोन एकर शेतात दीड महिन्यापूर्वी लाल कांदा लावला. अतिशय प्रतिकूल हवामानात उळे टाकण्यापासून, तर आतापर्यंत कांद्याची काळजी घेतली. परंतु सध्या कोसळणाऱ्या पावसाने पूर्ण पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. शासनाने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, एवढीच अपेक्षा.- 
भगवान जाधव (राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना, सुभाषनगर, ता. देवळा) 

हेही वाचा > माजी सरपंचाच्या पुतण्याचा खून; नदीपलीकडे मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ

संपादन - ज्योती देवरे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Damage of onion in Deola taluka nashik marathi news