रस्त्यावर निपचित पडलेली लांडोर आणि परिसरात हळहळ; अंदाज वर्तविणे कठीण 

राजेंद्र बच्छाव
Tuesday, 29 September 2020

अनेक दिवसांपासून इंदिरानगरच्या कॉलनी परिसरात मोरांचे दर्शन होत आहे. अन्नपाण्याच्या शोधात मोरांचा परिवार तिथेच असल्याचे नागरिकांनी सांगितले. वन विभागाने या भागात अजून मोर आहेत की काय, याबाबत शोधमोहीम सुरू करावी, असतील तर त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्याची मागणी नगरसेवक ॲड. बडोदे आणि नागरिकांनी केली.  

नाशिक / इंदिरानगर : इंदिरानगरच्या वडाळा-पाथर्डी रस्त्यावर असलेल्या शिव कॉलनीत सोमवारी (ता. २८) लांडोर मृतावस्थेत आढळल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. रविवारी (ता. २८) ‘अन्नपाण्याच्या शोधात आदर्श कॉलनीत अवतरले मोर’ ही बातमी ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाली. त्या बातमीत उल्लेख केलेल्या मोराच्या परिवारामधील ही लांडोर असण्याची शक्यता नागरिकांनी वर्तविली आहे. 

लांडोरीच्या अंगावर जखमा नाही
नगरसेवक ॲड. श्याम बडोदे यांना येथील स्प्रिंग फील्ड सोसायटीमधील श्री. आभाळे यांनी लांडोर मृत झाल्याचे कळविले. त्यांनी वन विभागाला ही माहिती दिली. वन विभागाच्या ठाकरे आणि कर्मचाऱ्यांनी पंचनामा करून मृत लांडोरीला ताब्यात घेतले. लांडोरीच्या अंगावर जखमा आढळलेल्या नाहीत. त्यामुळे मृत्यू नक्की कशामुळे झाला याचा अंदाज वर्तविणे कठीण झाले आहे. मृत्यूचे कारण शवविच्छेदनानंतर कळेल, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा >  मुख्यमंत्र्यांना दिली चक्क खोटी माहिती; जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

नैसर्गिक अधिवासात सोडण्याची मागणी

अनेक दिवसांपासून इंदिरानगरच्या कॉलनी परिसरात मोरांचे दर्शन होत आहे. अन्नपाण्याच्या शोधात मोरांचा परिवार तिथेच असल्याचे नागरिकांनी सांगितले. वन विभागाने या भागात अजून मोर आहेत की काय, याबाबत शोधमोहीम सुरू करावी, असतील तर त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्याची मागणी नगरसेवक ॲड. बडोदे आणि नागरिकांनी केली.  

हेही वाचा > 'रेमडेसिव्हिर'च्या काळ्या बाजाराला जिल्हाधिकाऱ्यांकडून चाप; मेडिकलबाहेर फलक लावण्याचे निर्देश

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dead female peacock found On Wadala-Pathardi road nashik marathi news