गिरणा धरणात मृत मासे आढळल्याने खळबळ; पाण्यात विषारी औषध टाकल्याचा संशय

प्रमोद सावंत
Friday, 16 October 2020

पाटबंधारे, पोलिस व महापालिका प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. कृषिमंत्री दादा भुसे यांनी या प्रश्‍नी आज दुपारी तातडीने शासकीय विश्रामगृहावर बैठक घेऊन मृत एकही मासा विक्री होणार नाही याची खबरदारी घेण्याचे आदेश दिले.

नाशिक/मालेगाव : गिरणा धरणातील मालेगाव विभागाकडील उंबरदे शिवारातील धरण क्षेत्रात मध्यरात्री बारानंतर शुक्रवारी पहाटेपर्यंत पाचशे किलोहून अधिक मासे मृत आढळल्याने खळबळ उडाली आहे. समाजकंटकांनी विषारी औषध वा पावडर टाकल्याने मासे मृत झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याच भागात शहराला पाणीपुरवठा करणारे गिरणा पंपीग स्टेशन असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शहराला आज होणारा पाणीपुरवठा तुर्त थांबविण्यात आला.

प्रशासनाकडून गंभीर दखल

पाटबंधारे, पोलिस व महापालिका प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. कृषिमंत्री दादा भुसे यांनी या प्रश्‍नी आज दुपारी तातडीने शासकीय विश्रामगृहावर बैठक घेऊन मृत एकही मासा विक्री होणार नाही याची खबरदारी घ्या. पाणी नमुने तपासणी अहवाल तातडीने मागवा. मृत मासे तपासणी व कारण शोधण्यासाठी संबंधित यंत्रणेकडे पाठवा. दोषींवर कठोर कारवाई करा असे आदेश दिले. दरम्यान उद्यापासून (ता. १७) नवरात्रोत्सव सुरू होत असल्याने तळवाडे तलावातून पूर्ण क्षमतेने पाणी उचला. शहरातील पुरवठा विस्कळीत होणार नाही यासाठी उपाययोजना करा अशा सूचना भुसे यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या. पोलिसांनी या घटनेची सखोल चौकशी करुन दोषींना अटक करावी. सामान्य नागरिकांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार सहन केला जाणार नाही असा इशारा देतानाच गेल्या पन्नास वर्षात असा प्रकार घडला नाही. झालेला प्रकार दुर्दैवी असल्याचे  भुसे यांनी सांगितले.

पाणीपुरवठ्याचा निर्णय घेता येणार नाही.

पाणी तपासणी अहवाल येईपर्यंत पाणीपुरवठ्याचा निर्णय घेता येणार नाही. मृत माशांमुळे कोणालाही विषबाधा होऊ नये यासाठी धरणक्षेत्रातही माहिती देण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी ‘सकाळ’ला सांगितले. शासकीय विश्रामगृहावर झालेल्या बैठकीस उपमहापौर निलेश आहेर, प्रांताधिकारी विजयानंद शर्मा, महापालिका आयुक्त ञ्यंबक कासार, उपायुक्त नितीन कापडणीस, शहर अभियंता कैलास बच्छाव, पाणीपुरवठा अभियंता सचिन माळवाळ, जयपाल त्रिभुवन, पाटबंधार विभागाचे उपअभियंता हेमंत पाटील, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कदम, सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत पाटील उपस्थित होते.

हेही वाचा >  दुर्दैवी! अस्मानी संकट, निसर्गाचा कहर आणि शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

नदीकाठच्या नागरिकांनाही याबाबत सूचना

गिरणा धरण क्षेत्रात मृत मासे आढळल्याची माहिती समजताच उपमहापौर आहेर, आयुक्त कासार, कापडणीस, त्रिभुवन, स्विय सहाय्यक सचिन महाले आदींनी गिरणा धरणावर भेट देऊन परिस्थितीची पहाणी केली. कासार यांनी पाणी नमुने तपासणीसाठी तातडीने नाशिक व जळगाव येथे पाठविले. अहवाल आल्यानंतरच पाणी दुषित आहे किंवा काय या बाबतची माहिती मिळेल असे  कासार यांनी सांगितले. खबरदारीचा उपाय म्हणून पाणीपुरवठा तुर्त बंद केल्याचे व धरण परिसर तसेच नदीकाठच्या नागरिकांनाही याबाबत सूचना दिल्याचे उपअभियंता पाटील यांनी सांगितले. मृत माशांचा अहवाल येण्यासाठी दोन दिवस लागण्याची शक्यता आहे. नाशिक येथून हे मासे तपासणीसाठी मुंबई येथे पाठविण्यात येणार आहेत. दरम्यान मासेमारीचा ठेका असलेल्या कंपनीने मृत दाेनशे किलोहून अधिक मासे जमा करुन जमिनीत पुरले.

हेही वाचा > "कलेक्टरसाहेब, शहर-जिल्ह्यातील अवैध धंदे थांबवा!" पोलिस आयुक्तांचे तिन्ही विभागांना पत्र

संपादन - रोहित कणसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dead fish were found in the girana dam malegaon nashik marathi news