समाजमन सुन्न! निष्पाप चिमुकल्यांशी असे कोणते वैर; गुढ कायमच

अंबादास शिंदे
Friday, 4 September 2020

बुधवारी (ता. २) याच कालव्यात एक वर्षाच्या बालकाचा मृतदेह आढळला होता. महिलेसह दोन चिमुकल्यांचे मृतदेह सापडल्याने हा प्रकार घातपात आहे की आत्महत्या, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. नेमका प्रकार काय?

नाशिक रोड : नाशिक तालुक्यातील चांदगिरी शिवारातील कडवा कालव्यात महिलेसह चिमुकलीचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. बुधवारी (ता. २) याच कालव्यात एक वर्षाच्या बालकाचा मृतदेह आढळला होता. महिलेसह दोन चिमुकल्यांचे मृतदेह सापडल्याने हा प्रकार घातपात आहे की आत्महत्या, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. नेमका प्रकार काय?

आत्महत्या की घातपात?, बुधवारी आढळला बालकाचा मृतदेह 
बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास चांदगिरी शिवारात कडवा कालवा येथे पाण्यात एक वर्षाच्या बालकाचा मृतदेह आढळला होता. या मृतदेहाची तब्बल सहा तासांनंतर ओळख पटली. त्याचे नाव कृष्णा कमलेश पडवी (रा. शिंदे गाव) असल्याचे तपासात निष्पन्न झाले. या घटनेला चोवीस तास उलटत नाही, तोच गुरुवारी (ता. ३) दुपारी एकच्या सुमारास महिला व आणखी एक चिमुकलीचा याच कालव्याच्या पाण्यात मृतदेह आढळला. कृष्णा पडवी या चिमुकल्याची ओळख पटल्यानंतर त्याचे वडील कमलेश पडवी व त्याचा मेहुणा महेंद्र गवळी (रा. अंबड) यांनी दीपाली पडवी (वय २८) व पाच वर्षांची मुलगी राजश्री घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार नाशिक रोड पोलिसांत दिली. या घटनेचा तपास सुरू असताना गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास बेपत्ता असलेल्या दीपाली पडवी व चिमुकली राजश्री यांचे मृतदेह चिमुकला कृष्णाचा मृतदेह ज्या ठिकाणी सापडला, त्याच ठिकाणी आढळले. 

हेही वाचा > धक्कादायक! सासरच्यांनीच लेकीचा घातपात करुन विहिरीत फेकल्याचा पित्याचा आरोप; परिसरात खळबळ

गावकऱ्यांचे तर्कवितर्क

माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक सूरज बिजली, उपनिरीक्षक भालेराव व सहकारी घटनास्थळी पोचले. मृतदेहाचे सोपस्कार पार पाडून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले. महिलेने चिमुकल्यांसह आत्महत्या केली की हा घातपात आहे, याबाबत तर्कवितर्क केले जात आहेत.  

हेही वाचा > गाई चारायला गेलेल्या प्रशांतच्या नशिबी असे दुर्दैव; घटनेनंतर गावात भयाण शांतता

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: death body found of two children with woman nashik marathi news