त्र्यंबकेश्‍वरचा पाडवा होणार गोड! मंदिर उघडण्याच्या निर्णय; दिवाळीचा आनंद द्विगुणित 

कमलाकर अकोलकर
Sunday, 15 November 2020

कोरोना लॉकडाउनमुळे अठरा मार्चपासून त्र्यंबकेश्‍वरचे आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकराजाचे मंदिर सोमवारी (ता. १६) दिवाळी पाडव्यापासून उघडणार आहे. त्यामुळे शनिवारी  येथील नागरिकांचा दिवाळीचा आनंद द्विगुणित झाला

त्र्यंबकेश्‍वर (नाशिक) : कोरोना लॉकडाउनमुळे अठरा मार्चपासून त्र्यंबकेश्‍वरचे आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकराजाचे मंदिर सोमवारी (ता. १६) दिवाळी पाडव्यापासून उघडणार आहे. त्यामुळे शनिवारी (ता. १४) येथील 
नागरिकांचा दिवाळीचा आनंद द्विगुणित झाला. मंदिरावर अर्थकारण चालणारे मंदिर सुरू होण्याच्या बातमीमुळे खऱ्या अर्थाने त्र्यंबकेश्‍वराचा दिवाळी पाडवा गोड होणार आहे. 

मंदिर उघडण्याच्या निर्णयाने दिवाळीचा आनंद द्विगुणित 
मंदिराचे दरवाजे भाविकांसह सर्वांनाच दर्शनास बंद करण्यात आले होते. नित्यनियम करणारे सगळ्यांत जास्त नाराज होते. मंदिरावर पूर्ण त्र्यंबकेश्वर नगराची रोजीरोटी चालत असल्याने अतिशय बिकट अवस्था महामारीने दाखविली. मंदिर सुरू व्हावे, यासाठी त्र्यंबकेश्‍वरच्या नागरिकांनी विविध नेत्यांचे उंबरठे झिजविले. अनेकांनी आश्‍वासन दिले. मात्र मंदिर काही सुरू झाले नाही. पुरोहित संघासह स्थानिक राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी नेतेमंडळीसह विविध मंत्र्यांनी निवेदने दिली. सत्तारुढ व विरोधी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेत संपर्क साधला. 

हेही वाचा > अरेच्चा! लासलगावचा कांदा ‘कौन बनेगा करोडपती’वर; लासलगावचे नाव पुन्हा प्रकाशझोतात 

रोज हजार भक्तांचे दर्शन 
अखेर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचे नियम शिथिल करीत, महाराष्ट्रातील मंदिरे पाडव्याला सामान्यांसाठी खुली होणार असल्याचे जाहीर केल्याने खऱ्या अर्थाने दिवाळीचा उत्साह गावात पाहायला मिळाला. मंदिर उघडल्याने गावातील अर्थव्यवस्था सुरू होणार आहे. रोज एक हजार भक्तांना दर्शन देण्याची व्यवस्था त्र्यंबकेश्वर देवस्थानतर्फे करण्यात येत असून, सॅनिटाइझर केल्याशिवाय प्रवेश नसल्याचे व स्थानिकांना नेहमीच्या दरवाजातून नेहमीप्रमाणेच व्यवस्था केली असल्याचे व्यवस्थापनातर्फे सांगण्यात आले. रविवारी (ता. १५) देवस्थानच्या विश्वस्त मंडळाची तातडीची बैठक होणार आहे. ऑनलाइन दर्शनव्यवस्थेचाही विचार होण्याची शक्यता विश्वस्त प्रशांत गायधनी यांनी व्यक्त केली.  

हेही वाचा > विवाहितेच्या अंगावरील स्त्रीधन काढून अपहार प्रकरणी गुन्हा दाखल 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: decision to open the temple makes happy trimbkeshwar Nashik marathi news